मोदी सरकार पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार , पाकिस्तानाला अद्दल घडवणार, अशा बऱ्याच गर्जना झाल्या. मात्र, या सगळ्या गर्जना ‘टांय टांय फिस’ झाल्या, असे नेटिझन म्हणू लागलेत. सरकार बदला घेण्यात अपयश आल्यामुळे आम जनता पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात रस्त्यावर उतरत आहे. काणकोण येथे रस्त्यावर म्हणे अज्ञातांनी पाकिस्तानी झेंडे रंगविले त्यावर लाल रंगाने क्रॉस अशी खूण केली.आता हे झेंडे पाकिस्तान समर्थकांनी रस्त्यावर रंगविले की, पाकिस्तानचा विरोध करण्यासाठी? झेंडे रस्त्यावर रंगविणारे भारत समर्थक की विरोधक, अशी चर्चा आहे. पाकिस्तान समर्थकांनी ही झेंडे लावल्याचा संशय असल्यामुळे सभापती रमेश तवडकर व भाजप मंडळाने पोलिसांत तक्रार नोंदवलीय तर दुसरीकडून काँग्रेस च्या सुनील कवठणकर यांनीही पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. झेंडे लावले कोणी, हे शोधून काढल्यावर कळेल की झेंडे समर्थकांनी लावले की विरोधकांनी. ∙∙∙
बांबोळीतील दोन प्रकल्पांची नियमबाह्य कामे बंद पडल्यास भाग पाडल्याचा आनंद ‘आरजी’ने साजरा केला. या प्रकरणी आंदोलन करणारे आमदार वीरेश बोरकर अर्थात त्याच्या केंद्रस्थानी होते. आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी गुरुवारी पणजीत आनंदोत्सव सादरा करताना ज्या उस्फूर्तपणे बोरकर यांना उचलून घेतले यावरून बोरकर यांचे महत्व पक्षासाठी किती आहे, हे दिसून येते. आजच्या गळेकापू राजकीय स्पर्धेत त्यांचे हे वागणे निश्चितच लक्षणीय होते. ∙∙∙
वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांच्या ‘चाकोरीबद्ध’ कामाच्या पद्धतीमुळे काही आठवड्यांपूर्वी सरकारची झोप उडाली होती. राज्यातील केबल ऑपरेटर्सकडे वीज विभागाचे ११० कोटी रुपये थकीत आहेत. एवढी मोठी रक्कम एकदम भरणे केबलधारकांच्या नाकीनऊ येऊ शकते. केबल प्रकरणांवर येत्या काही दिवसांत न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु बील वसुलीद्वारे किंवा मालमत्ता जप्त करून थकबाकी वसूल करण्याचा नियम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून शेट्ये यांनी कारवाई करताना नियम-अटी-शिक्षा यांचा चांगलाच अभ्यास केला आहे, त्यामुळे आतापर्यंत मोफत सुविधा घेणाऱ्या केबलधारकांना कायमचा धडा मिळाला आहे. नियमानुसार केबल धारकांना ११० कोटींची रक्कम भरावी तरी लागणार किंवा वसुलीच्या प्रक्रियेला तोंड द्यावे लागणार असेच दिसते. काही झाले तरी शेट्ये यांच्या धडक मोहिमेमुळे वीज खात्याचा फायदा होत आहे, हे काही कमी आहे का? ∙∙∙
पणजी शहरात गेली काही वर्षे स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. शहरातील गटार व्यवस्था सुधारणार, वाहतूक व्यवस्था सुधारणार, अशा अपेक्षेने होत असलेली गैरसोय पणजीवासीय सोसत आहेत. वारंवार खोदले जाणारे रस्ते हा तर नित्याचाच खेळ बनला आहे. शिवाय त्यामुळे उडणारी धूळ, होणारा त्रास यातून सुटका कधी होणार, असा प्रश्न नेहमीच पडतो. यंदा पावसाळा लवकर सुरू होणार,अशी वदंता पसरली असल्याने स्मार्ट सिटीच्या कामांमुळे होणाऱ्या त्रासात आणखी भर पडणार की, तत्पूर्वी ही कामे पूर्ण होणार, याचीच चिंता पणजीवासीयांना सतावतेय! ∙∙∙
गोव्यात पर्यटक संख्येबाबत जसे मतभेद आहेत तसेच आता शॅक्सचे व्यवहार कधीपर्यंत म्हणजे किती काळ चालू ठेवावेत, यावरही मतभिन्नता आहे. मात्र त्यावर अजून संबंधित यंत्रणेने म्हणजे पर्यटन खात्याने कोणतेच भाष्य केलेले नाही. दक्षिण गोव्यातील हे व्यावसायिक यंदा तीव्रतर उष्म्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावलेली असून त्यामुळे अनेकांनी शॅक्स गुंडाळल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात किनारी भागांत लोकांची झुंबड उडालेली दिसते. दुसरीकडे काही शॅकवाले मे अखेरपर्यंत नव्हे तर पावसाचा अंदाज घेऊन जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शॅक खुले ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करतात. मात्र, या एकंदर पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेचे म्हणणे काय, खरोखरच पर्यटक संख्या रोडावलेली आहे, की शॅकवाल्यांची नेहमीचे रडगाणे गाऊन सरकारकडून शुल्कात सवलत मिळविण्याची की क्लृप्ती आहे, ते कळायला मार्ग नाही. चर्चा अशी आहे की, काश्मीरमधील घटनेनंतर देशी पर्यटकांचे पाय गोव्याकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. ∙∙∙
बेकायदा बांधकामांबाबत सध्या एकच गोंधळ चाललेला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने जो नवा निवाडा दिला आहे त्यामुळे बेकायदा बांधकामांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोवा सरकारने अशी बांधकामे व अतिक्रमणे यासंदर्भात आजवर जेजे निर्णय घेतले आहेत व घोषणा केल्या आहेत, त्या कुचकामी ठरल्याची चर्चा सध्या राज्यात जोरात चाललेली आहे. सरकारने एकदा केवळ खासगी जमिनीतील बांधकामे कायदेशीर होतील, असे म्हटले होते व त्यानंतर हल्लीच कोमुनिदाद जमिनीतील विना परवाना म्हणजेच बेकायदा बांधकामांना अभय दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाड्याने त्या सर्वांवर पाणी फेरल्याचे बोलले जात आसून त्यामुळे सर्वसामान्य लोक तसेच अशी बांधकामे केलेले गोंधळात सापडलेले असून ते राजकारण्यांच्या दारी रांगा लावू लागलेत. ∙∙∙
एखाद्या सरकारी कामाचे उद्घाटन हे राजकारणीच करतात, पण पत्रकारांनी अशा कामाचे उद्घाटन करण्याची राज्यातील पहिलीच घटना फोंड्यात घडली आहे. फोंड्याच्या पात्रावने हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याची संधी पत्रकारांना देऊन एक आगळावेगळा पायंडा पाडला आहे. समाजहिताच्या दृष्टीने पत्रकार लिहितात, त्यामुळे त्यांचाही सहभाग अशा विकासकामात आवश्यक आहे, असे रवी पात्राव म्हणाले. सध्या तरी या उद्घाटनाची चर्चा फोंडाभर सुरू आहे. तसे पाहिले तर फोंड्यातील दोन दिग्गज राजकारणी एक म्हणजे रवी पात्राव आणि दुसरे म्हणजे सुदिन साहेब हे पत्रकार मित्र आहेत, कारण पत्रकारांबद्दल या दोन्ही राजकारण्यांचा ‘सॉफ्ट कॉर्नर'' असतो. ∙∙∙
माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांच्यासमोर शुक्रवारी राजकीय धर्मसंकट उभे ठाकले होते. समयोचितपणा दाखवत यांनी ती परिस्थिती हाताळली. जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य झाल्याने कॉंग्रेसचे नेते भाजप कार्यालयाच्या खाली आनंदोत्सव साजरा करत होते. मिठाई वाटतानाच कुंकळ्येंकर कुठेतरी जाण्यासाठी खाली आले. ते जाऊ लागल्यावर कॉंग्रेसचे एक नेते मिठाई देण्यासाठी धावले. कुंकळ्येंकर कॉंग्रेसवाल्यांकडून मिठाई स्वीकारणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली असताना आता घाईत आहे, मिठाई कार्यालयात द्या, असे सांगत कुंकळ्येंकर यांनी तेथून दुचाकीवर बसून निघून जाणे पसंत केले. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.