Goa Politics: खरी कुजबुज, एकीची खरी गरज काँग्रेसलाच

Khari Kujbuj Political Satire: राजेश नाईक हे बुधवारी निवृत्त होणार होते. ते एका वर्षाच्‍या मुदतवाढीवर होते. निवृत्त झाल्‍यानंतर त्‍यांना कार्मिक खात्‍यात हजर राहण्‍यास सांगणे हा विनोदच आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

एकीची खरी गरज काँग्रेसलाच

बाकी काही असले तरी काँग्रेसने परवा पणजीत ‘संविधान बचाव’ अभियानाचे आयोजन केले. त्यात एरवी अशा उपक्रमांपासून दूर पळणाऱ्या अनेक नेत्यांचीही उपस्थिती होती. या अभियानाचा खरा हेतू संविधान बचावपेक्षा ‘भाजप हटाव’ असाच दिसून आला. भाजप असाच सत्तेला चिकटून राहिला तर खरेच संविधान शिल्लक राहील काय, ही चिंता अन्य कोणाला नसली तरी काँग्रेसवाल्यांना लागून राहिली आहे. पण मुद्दा तो नाही. या अभियानावेळी बहुतेक नेत्‍यांनी ‘लोकांनी संघटित राहून भाजपला धडा शिकवा’ असे आवाहन केले. पण आझाद मैदानाबाहेर उभे राहून हे अभियान पाहणाऱ्यांना मात्र प्रश्‍‍न पडला की, गोव्यात काँग्रेसमध्ये एकजूट नाही व हे नेते जनतेला एकजुटीने राहण्याचे आवाहन कसे काय करतात? या पक्षाच्‍या इनमीन तीन आमदारांची तोंडे तीन दिशांना असताना होत असलेले एकजुटीचे आवाहन हा विनोदच असल्याचे काहींना वाटले. ∙∙∙

बालिश आदेश कोणी काढला?

टीसीपीचे प्रमुख नगररचनाकार राजेश नाईक यांना त्‍यांच्‍या सेवा काळाला दोन तास राहिले असताना निलंबित करणे आणि कार्मिक खात्‍यात उद्यापासून हजेरी लावण्‍यास सांगण्‍याचा प्रकार हा अत्‍यंत ‘बालिश’ असल्‍याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्‍यक्त झाली आहे. राजेश नाईक हे बुधवारी निवृत्त होणार होते. ते एका वर्षाच्‍या मुदतवाढीवर होते. निवृत्त झाल्‍यानंतर त्‍यांना कार्मिक खात्‍यात हजर राहण्‍यास सांगणे हा विनोदच आहे. यावर एक अधिकारी म्‍हणाला की, कार्मिक खात्‍याने राजेशविरोधात हा आदेश जारी करताना एक जुनाच आदेश ‘कट-पेस्‍ट’ केला. त्‍यामुळे हा घोळ झाला. त्‍यांना निलंबित करताना त्‍यांच्‍या निवृत्तीनंतरच्‍या सवलती, वेतन रोखून धरणे हा आदेशाचा भाग असतो. परंतु त्‍यांना कार्मिक खात्‍यात बोलावणे हा बालिश प्रकार झाला, कारण ते उद्यापासून नियमित हजेरी लावू लागले तर त्‍यांना ‘पगार’ही द्यावा लागणार आहे!

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षण आहे, नोकऱ्यांचे काय?

काँग्रेसमध्‍ये मानापमान

‘संविधान बचाव’ अभियानाच्या सभेला सुमारे ६०० लोकांची गर्दी जमविण्यात काँग्रेस पक्षाला यश आले खरे, परंतु ऐन सभेच्या वेळीच स्थानिक नेत्यांमध्ये मानापमानाचे नाट्य रंगल्याने उपस्थितांचे मनोरंजन झाले. व्यासपीठावर लावलेल्या मोठ्या फलकावर काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीशरावांचा फोटो नसल्याने काहीजणांनी थेट माणिकरावांकडे तक्रार केली. ऐनवेळी मग त्यांचा फोटो इतर नेत्यांच्या शेजारी चिकटविण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले रमाकांतभाई व माजी मुख्‍यमंत्री सार्दिनबाब यांची कोपऱ्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्‍यामुळे सार्दिनबाब संतप्‍त बनले. त्‍यांनी म्हणे सभेचे संयोजक कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची सर्वांसमोरच खरडपट्टी काढली. सभेला कवठणकर, जनाभाई वगैरे दिसले नाहीत. परंतु नाडर, कुमार, चौधरी अशा आडनावांचे कार्यकर्ते मात्र जातीने हजर होते. जे कुणी आले होते ते गोंयकारांपेक्षा भायलेच दिसत होते असे कॉाँग्रेसवालेच म्हणू लागले आहेत.

याला म्हणतात ‘यू टर्न’

‘उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा आणि प्रजा आंधळी, अधांतरी दरबार’ हे फार जुने गाणे आपल्या मोदी सरकारला व भारतीय जनतेला लागू पडते. पहलगाम हल्‍ल्याचा भारत बदला घेणार, भारत पाकिस्तानला धडा शिकविणार, मोदी सरकार आता आरपारची लढाई लढणार, अशा बातम्या लाईमलाईटवर होत्या व आहेत. मात्र तो विषय आता बाजूलाच पडला. भाजप सरकारने कालपर्यंत स्वतःच विरोध करत असलेला जातीय जनगणनेचा विषय पोतडीतून बाहेर काढून सगळ्यांनाच अचंबित केले. मोदींनीही आपण पाकिस्तानावर हल्ला करण्याचे सोडून भलताच बॉम्ब टाकला. याला म्हणतात ‘यू टर्न’ ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: खरी कुजबुज, मांडवीत 112 मीटर कॅसिनो जहाज?

आता महत्त्‍व काय?

जातिनिहाय जनगणना निर्णयामुळे गोमंतक भंडारी समाजातील देवानंद नाईक गटात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या विरोधी असलेल्या उपेंद्र गावकर गटाने बुधवारी भंडारी समाजापुरत्या जनगणनेस सुरवात केली आहे. सरकार जनगणना करणार असल्याने या समाजाच्या पातळीवर होणाऱ्या खासगी जनगणनेस महत्त्‍व राहणार नसल्याने हे आनंदाचे वातावरण आहे. गावकर यांनी जनगणना जाहीर करून देवानंद यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. केंद्र सरकारच्या निर्णयाने त्याची परस्पर वासलात लागल्याने हा निर्णय त्यांना भलताच आवडला आहे.

भंडारी समाजाच्‍या नेत्‍यांचे ‘मौलिक’ कार्य

बहुजन समाजात भंडारी समाज संख्येने फार मोठा आहे. जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी भंडारी समाजाच्या नेत्यांनी लावून धरली आणि आता तर स्वतः पुढाकार घेत जनगणना करण्यासाठी प्रारंभही केला आहे. वास्तविक ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी फार पूर्वीपासूनची होती, पण त्याची कार्यवाही होत नव्हती. मागच्या काळात भंडारी समाजाच्या नेत्यांनी यासंबंधीची निवेदने सर्व राजकीय पक्षांना दिली होती. आता तर केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला आहे. अर्थातच या प्रकाराला भंडारी समाजाने चालना दिली आहे. त्यामुळे भंडारी समाजाच्या नेत्यांचे बहुजन समाजाने आभार मानले आहेत. कारण जातिनिहाय जनगणना केल्याशिवाय राज्यातील जातींचे अस्तित्व आणि आकडा काय आहे हे स्पष्ट होत नाही. काही का असेना, भंडारी समाजाच्या नेत्यांनी जातिनिहाय जनगणना करण्यास प्रारंभ केला हीच खूप मोठी गोष्ट आहे, अशा प्रतिक्रिया केवळ भंडारीच नव्हे तर बहुजन समाजातील इतर जातींकडूनही व्यक्त होत आहेत.

बाबाजी सर, हा राजकीय मेळावा का?

‘मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है?’ हे अमिताभ बच्चनचे जुने गाणे आपण ऐकलेच असणार. दोन दिवसांपूर्वी अखिल गोवा उच्च माध्यमिक विद्यालय संघटनेने उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत यांनी या मेळाव्यात मुख्यमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, गोवा शालान्‍त मंडळाचे अध्यक्ष, एससीआरटीच्या संचालिका सगळ्यांना आमंत्रित केले होते. मात्र या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना सन्मानित पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याचे कारण काय? अशी कुजबुज शिक्षकांत सुरू होती. बाबाजी आपण बाबूला आमंत्रित करून शिक्षकांच्या मेळाव्याला भाजपच्या मेळाव्याच्या स्वरूप दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. कदाचित बाबाजी सावंत व तुयेकर विसरले असणार की तो कार्यक्रम भाजप शिक्षक विभागाचा नव्हता तर अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचा होता. बाबाजी हे भाजप शिक्षक विभागाचेही प्रमुख आहेत म्हणून कदाचित हा घोळ झाला असावा, असे आम्ही नव्हे शिक्षक म्हणत आहेत.

विरोधकांचा गनिमी कावा

२०२७च्या निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाली आहे. प्रत्यक्ष युद्धाला अजून वेळ असला तरी भाजपने सर्व हत्‍यारे सुसज्ज ठेवली आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांनी गनिमी काव्याचा मार्ग अवलंबला आहे. विरोधकांकडून मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. काही इच्छुक तर पक्षाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवू लागले आहेत. पण नेते ज्या इच्छुकांवर कृपा दाखवत आहेत, त्यांच्या मागे जनता आहे का? हाच खरा प्रश्‍‍न आहे. आता जे बरेच इच्छुक आहेत त्यांचा स्वार्थ जास्त आणि जनसेवा कमी अशीच चर्चा आहे. तरीही, विरोधी पक्षातील नेते अशा इच्छुकांच्या मागे धावत असल्याने पक्षाचे भविष्य अंधारात सापडले आहे अशी चर्चा पक्षाच्‍या कार्यकर्त्यांमध्‍येच सुरू आहे. त्‍यामुळे विरोधकांचा गनिमी कावा विरोधकांवरच उलटेल असे दिसते.

कुठल्या पक्षात?

लहान मुलांनी ‘आरजी’ पक्षाचे सदस्य व्हावे असे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर जबर टीका झाली होती. या वादात आता साळगावचे आमदार केदार नाईक यांनी उडी घेत, लहान मुलांना राजकीय पक्षाचे सदस्य व्हायला सांगणे ही बाब चुकीची आहे असे म्‍हटले आहे. खरे म्हणजे बारावीनंतर विद्यार्थ्यांनी राजकारणात यावे, खासकरून भाजपची सदस्यता त्यांनी घ्यावी असे मत केदारराव यांनी व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. केदाररावांनी विद्यार्थ्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला असला तरी त्यांनी प्रथम काँग्रेसमध्ये यावे आणि नंतर भाजपमध्ये उडी घ्यावी, कारण केदाररावांनी असेच केले होते. त्यामुळे सल्ला उलट केदाररावांच्या अंगलट आल्याचे दिसले. ∙∙∙

बाबू व सुभाष एकत्र!

राज्यात सगळ्यांत गरीब व दुर्बल कोणती जमात असेल तर ती धनगर. धनगर या नावात ‘धन’ असले तरी मोजक्याच जणांना सोडल्यास बहुसंख्य धनगर गरीब व दुर्बल. मात्र या जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्त झालेला नाही. धनगरांना ‘एसटी’चा दर्जा मिळणार अशी वचने भाजपने अनेकदा दिली. या समाजाचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर सरकारमध्‍ये असताना धनगरांना न्याय मिळाला नाही तो आता मिळणार का? काही का असेना एकाच पक्षात असतानाही दोन दिशांना पाहणारे भाजपचे मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर धनगर समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी एकत्र आले आहेत. बाबू व सुभाषला धनगर समाजाने एकत्र आणले हेही नसे थोडके.

लोबोंची ‘फिल्डिंग’

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी अचानक मायकल लोबो यांना मंत्रिपद देण्याची मागणी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. बार्देश भाजपसाठी मजबूत होईल, असे केदार म्हणाले. पण या ‘मजबुती’चा अर्थ काय, हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. राजकीय गोटात आता चर्चा सुरू झाली आहे की, केदार नाईक हे मायकल लोबो यांच्‍यासाठी नाकातून तीर मारू लागले आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, लोबो यांनीच केदार यांना आपले नाव घेऊन मंत्रिपदाची मागणी करायला लावली. ‘मायकलने बोलावलं आणि केदार बोलले’ अशी चर्चा ऐकायला मिळते. खरे काय, खोटे काय हे त्‍या दोघांनाच माहीत. पण या घटनेने मायकल लोबो यांनी मंत्रिपदासाठी लावलेली ‘फिल्डिंग’ मात्र पुन्‍हा एकदा उघड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com