पेडणे: ओंकार हत्तीच्या हालचालींमुळे गोवा-महाराष्ट्र सीमेवर तणाव निर्माण झाला असून, डोंगरपाल येथे गुरुवारी सायंकाळी दोन्ही राज्यांच्या वन खात्यांमध्ये अप्रत्यक्ष संघर्ष उफाळून आला. पेडणे वन विभागाचे कर्मचारी हत्तीला गोवा हद्दीबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत असताना सिंधुदुर्ग वन खात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या मजुरांकडून दगडफेक करण्यात आली. सुदैवाने पेडणे वन खात्याचे कर्मचारी यातून बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्तीचा मुक्काम कडशी-मोपा परिसरात होता. वन अधिकारी हरीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे वन खात्याने हत्तीला डोंगरपाल सीमेपर्यंत आणले. मात्र, महाराष्ट्राच्या बाजूने असलेल्या मजुरांनी हत्तीला परतवण्यासाठी दगडफेक केल्याची घटना घडली. हे मजूर बाहेरून आणल्याची चर्चा स्थानिकांत सुरू आहे.
दरम्यान, हत्ती महाराष्ट्रात प्रवेश करू नये म्हणून सिंधुदुर्ग वन खात्याने सीमेवर ठिकठिकाणी लाकडे जाळून आगीचे जाळ तयार केले. या प्रकारामुळे हत्ती बिथरला असून तो सीमेवरच थांबला आहे.
याशिवाय, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ड्रोन वापरण्यास बंदी असतानाही सिंधुदुर्ग वन खात्याकडून बेकायदेशीररित्या ड्रोनद्वारे हत्तीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारांबाबत पेडणे वन खात्याने पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सध्या हत्ती पुढे सरकू नये यासाठी पेडणे वन खात्याचे कर्मचारी सतर्कपणे पाळत ठेवून आहेत. ओंकार हत्तीच्या हालचालींमुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ड्रोन वापरावरून नागरिकांचा आक्षेप
महाराष्ट्रातील वन खात्याचे काही कर्मचारी ड्रोनच्या साहाय्याने हत्तीचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ड्रोन वापरण्यास निर्बंध असतानाही असे चित्रीकरण सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.