Vasco Accident Case वास्कोच्या मुख्य बाजारपेठेत भरदिवसा क्रेटा कारच्या चाकाखाली एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कारचालक जतीन सरदेसाई याला कारखाली एक व्यक्ती असल्याची कल्पना नव्हती, त्यांनी सुमारे 100 मीटर गाडी चालवत नेल्यामुळे कारखाली झोपलेल्या त्यामुळे त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना गुरुवारी दुपारी 3.50 च्या सुमारास घडलीय.
याबाबत वास्को पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, क्रेटा कारचालक जतीन सरदेसाई (वय 50) यांनी वास्को भाजी मार्केट समोरील ब्रँड्स शोरूमजवळ कार उभी केली होती आणि ते काही कामानिमित्त कारपासून लांब गेले होते.
दरम्यानच्या कालावधीत एक व्यक्ती त्यांच्या क्रेटा कारखाली झोपला. सरदेसाई काम आटोपून आपल्या कारजवळ आले मात्र त्यांना तो माणूस झोपलेला निदर्शनास आला नाही. सरदेसाई यांनी गाडी सुरू केली आणि उजवीकडे वळण घेत ते बाटा शोरूमजवळ पोहोचले.
यादरम्यान कारखाली झोपलेली ती व्यक्ती ब्रँड्स शोरूमपर्यंत कारसोबत फरफटत गेली. ही गंभीर बाब त्या ठिकाणी असलेल्या काहींच्या लक्षात आली. त्यांनी लगेच कारचालकाचे लक्ष वेधून घेत कार थांबविण्यास भाग पाडले.
नागरिकांनी त्या पादचाऱ्याला कारखालून बाहेर काढले, मात्र त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारांसाठी बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अशोक चलवाडी उर्फ मंग्या, (वय 45 ) असे मृताचे नाव आहे. चलवाडी हे झुआरीनगर येथील रहिवासी आहेत तर सरदेसाई हे वास्कोचे रहिवासी असून व्यावसायिक आहेत.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार आशिष नाईक यांनी पंचनामा केला. वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्क्रांतराव देसाई यांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. वास्को पोलिसांनी भादंसच्या 279 आणि 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.