

Meta Smart Glasses: मेटा कंपनीचे 'रे-बॅन' स्मार्ट चष्मे सध्या जगभरात फॅशन आणि तंत्रज्ञानाची नवी क्रेझ ठरत आहेत, परंतु या चष्म्यांच्या माध्यमातून तुमचे प्रायव्हेट क्षण हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तींकडून पाहिले जात असल्याचे एका धक्कादायक रिपोर्टमधून समोर आले. स्वीडिश वृत्तपत्र 'गोटेबोर्ग्स-पोस्टन' आणि 'स्वेन्स्का डॅगब्लाडेट' यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, केनियाची (Kenya) राजधानी नैरोबी येथील डेटा वर्कर्स तुमच्या या चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ फुटेज तपासत आहेत.
मेटा कंपनीच्या या उपकरणांमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवलेले असून, त्याद्वारे रेकॉर्ड झालेले डेटा लेव्हलिंग आणि एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी या डेटा वर्कर्सकडे पाठवले जाते. 'समा' (Sama) नावाच्या कंत्राटदार कंपनीतील हे डेटा अॅनोटेयटर्स ग्राहकांच्या खाजगी आयुष्यात अक्षरशः डोकावत असल्याचे यातून उघड झाले.
या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आजवर अत्यंत अस्वस्थ करणारे व्हिडिओ पाहिले आहेत. यामध्ये लोक शौचालयाचा वापर करताना, कपडे बदलताना किंवा शरीरसंबंध ठेवतानाची दृश्ये या चष्म्यांनी टिपली आहेत आणि ती या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे दिसत आहेत. एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही लोकांच्या लिव्हिंग रुमपासून त्यांच्या नग्न शरीरापर्यंत सर्व काही पाहतो.
चष्मे घातलेल्या व्यक्तीने चित्रीत केलेली शरीरसंबंधांची दृश्येही आमच्या समोर येतात. हे रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तींना बहुधा याची कल्पना नसावी की त्यांचे हे क्षण कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती पाहणार आहे, अन्यथा त्यांनी असे चित्रीकरण कधीच केले नसते. याव्यतिरिक्त, अनेक फुटेजमध्ये लोकांची बँक कार्डे आणि अत्यंत संवेदनशील कागदपत्रे स्पष्टपणे दिसतात. हे व्हिडिओ जर लीक झाले, तर मोठे संकट ओढवू शकते, अशी भीती या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे कर्मचारी केवळ कामाचा भाग म्हणून हे सर्व पाहत आहेत. जर त्यांनी या गोपनीयतेच्या उल्लंघनाबद्दल प्रश्न विचारले, तर त्यांना थेट कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते. एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत खाजगी आयुष्यात डोकावणे आम्हाला पटत नसले, तरी केवळ नोकरी टिकवण्यासाठी आम्हाला हे काम मुकाट्याने करावे लागत आहे, अशी हतबलता एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली.
मेटा कंपनीचे नियम आणि अटी पाहिल्या तर, कंपनी असा दावा करते की युजर्सच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाते. मात्र, त्यांच्या गोपनीयतेच्या धोरणात अत्यंत अस्पष्ट भाषेत असे नमूद केले की, एआयसोबतच्या तुमच्या संवादाचे किंवा मेसेजचे पुनरावलोकन मानवी पद्धतीने केले जाऊ शकते. तसेच, कंपनीने ग्राहकांना असा सल्लाही दिला की, त्यांनी अशी कोणतीही संवेदनशील माहिती शेअर करु नये जी त्यांना एआयने जतन केलेली नको आहे.
मेटा आणि चष्मे बनवणारी दिग्गज कंपनी 'एसिलर लक्सोटिका' यांच्या सहकार्याने तयार झालेले हे चष्मे 2025 मध्ये तब्बल 70 लाख युनिट्स विकले गेले. "हे मेटा" असा आवाज देताच हे चष्मे सक्रिय होतात आणि फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतात. मात्र, तंत्रज्ञानाच्या (Technology) या झगमगाटात ग्राहकांच्या गोपनीयतेचा बळी दिला जात असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. चष्मे वापरणाऱ्यांना कल्पनाही नसते की त्यांचा प्रत्येक क्षण सातासमुद्रापार कोणाच्या तरी स्क्रीनवर झळकत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता 'स्मार्ट' तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आणि डेटा सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.