पणजी: गोव्यात सध्या ईफ्फीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ईफ्फीची तयारी अंतिम टप्प्यात असून 15 नोव्हेंबर पर्यंत तयारी पूर्ण होईल आणि 18 नोव्हेंबरपासून तयारीची तपासणी केली जाईल.
कला अकादमीमध्ये मात्र यंदाच्या वर्षी सुद्धा चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार नाही. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी चित्रपटांचे स्क्रीनिंग केले जाणार नाही. गोव्यातील कला अकादमी हा चित्रपट प्रेमींसाठी एक आकर्षणाचे केंद्रबिंदू असतो पण सुरु कामामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
काल (दि. 4 नोव्हेंबर) रोजी झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या सभागृहाचा वापर मास्टर क्लास घेण्यासाठी केला जाईल तसेच चित्रपटांचे स्क्रीनिंग पार्किंग परिसरात होईल अशी माहिती दिली. याशिवायचे आग्वाद आणि व्हागातोर येथील हेलिपॅडचा वापर चित्रपटांच्या स्क्रीनिंगसाठी केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणालेत.
लँड स्क्रीनिंगसाठी मिरामार समुद्र किनारा तसेच रवींद्र भवनचा वापर केला जाईल, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) येथे मूव्ही स्क्रिनिंग आणि ज्युरी मूल्यमापनासह प्रमुख कार्यक्रम आयोजित केले जातील मात्र इथे सामान्य लोकांसाठी प्रवेश मर्यादित ठेवलेला असेल. यंदाच्या ईफ्फीचा एकूण खर्च 26 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यंदा इफ्फीच्या निमित्ताने ईएसजी ते कला अकादमी पणजी पर्यंत रोड परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत इफ्फीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे. शनिवार (दि. 2 नोव्हेंबर) पर्यंत महोत्सवासाठी तब्बल 3,659 जणांनी नोंदणी केली. इफ्फीबद्दल अनेकांच्या मनात आकर्षण असते त्यामुळे यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधींची नोंदणी होण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.