मडगाव: राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी (6 नोव्हेंबर) मडगाव येथे आरोग्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या सुविधेचे उद्घाटन केले. यावेळी, त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठे वक्तव्य केले. राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असताना त्यांच्या या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
दरम्यान, शहरी भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मडगाव येथे 'अर्बन आयुष्मान आरोग्य मंदिर' या वेलनेस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत हे देखील उपस्थित होते. आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत स्थापन झालेले हे नवीन सेंटर शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करेल. या सेंटरद्वारे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतील.
यादरम्यानच बोलतान मंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी राजकीय भाष्य केले आणि विरोधी पक्षांना थेट आव्हान दिले. राणे यांनी ठामपणे सांगितले की, गोव्यात पुढील सरकार त्यांच्याच पक्षाचे असेल.
त्यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर टीका करताना म्हटले, "फक्त एकत्र येऊन आणि हात वर करुन तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही." निवडणूक जिंकण्यासाठी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि विश्वास संपादन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. ते पुढे म्हणाले की, ''जर सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षातील आमदारांना चांगली पदे देऊ केली, तर निवडणुकीत निवडून आल्यानंतर विरोधी पक्षाचे अनेक आमदार त्यांच्या पक्षात सामील होतील.''
मंत्री राणे यांच्या या विधानातून गोव्यातील (Goa) राजकारणात पक्षांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून सत्ताधारी पक्ष आगामी निवडणुकीसाठी केवळ विकासकामांवरच नव्हे, तर राजकीय रणनीतीवरही भर देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.