

पणजी/मडगाव: राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या गोवा पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांच्या गुन्हेगारी भूमिकेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ माजली आहे. मडगाव पोलीस ठाण्यातील एडबर्ग पेरेरा मारहाण प्रकरण आणि पेडणेतील वाळू उपसा गोळीबार प्रकरणामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला जबर धक्का बसला असून, संबंधित पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
नावेली येथील एडबर्ग पेरेरा (३७) यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. तर हवालदार मिगेल वाझ आणि पोलीस अजय झिंगली यांना दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांच्या राखीव दलात हलवण्यात आले आहे.
या दोघांवर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच पुढील चौकशीसाठी हे प्रकरण क्रईम ब्रँचकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पेरेरा सध्या गोमेकॉ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो व अँथनी सिल्वा यांनी मडगाव पोलिस ठाण्यात येऊन या मारहाण प्रकरणाचा तपासाचा आढावा घेतला.
उगवे (पेडणे) येथे वाळू उपसाच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला. त्यामुळे ऋषिकेश महाले आणि गंगाराम महाले या दोघांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
दोन्ही पोलीस कर्मचारी या गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींमध्ये सामील आहेत. या घटनेत दोन मजूर जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.