Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: वीरेश दिल्लीत, कार्यकर्त्यांत खळबळ

Khari Kujbuj Political Satire: रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजी) अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍यातील वाद शिगेला पोहोचलेला असतानाच आमदार बोरकर यांनी दिल्ली गाठलेली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव न्‍यू मार्केटमधील गळती

अडचणी या जणू पाचवीलाच पुजल्‍या आहेत, अशी परिस्‍थिती असलेल्‍या मडगावच्‍या न्‍यू मार्केटची काही महिन्‍यांपूर्वी दुरुस्‍ती करण्‍यात आली होती. मागच्‍या पावसात अशी दुरुस्‍ती न झाल्‍यामुळे पावसाचे पाणी मार्केटात शिरून दुकानदारांचे हाल झाले हाेते. त्‍यामुळे यावेळी तरी आम्‍हाला हा पावसाचा त्रास सहन करावा लागणार नाही, असे या मार्केटातील व्‍यापाऱ्यांना वाटले होते. मात्र, या मार्केटचे नवीन छत घालताना पुरेशी खबरदारी न घेतल्‍याने दोन दिवसांपूर्वी पडलेल्‍या पावसाचे पाणी पुन्‍हा एकदा मार्केटात शिरल्‍याने व्‍यापाऱ्यांची तारांबळ उडाली. यापूर्वी या मार्केटच्‍या छतासाठी जे पत्रे वापरले ते निकृष्‍ट दर्जाचे, अशी टीका करण्‍यात आली होती. आणि आता ही दुरुस्‍तीही योग्‍यप्रकारे झाली नसल्‍याचे दिसून आले आहे. या पावसात या मार्केटवाल्‍यांचे काय हाल होतील, ते आता दामबाबालाच ठावे, असे हे व्‍यापारी म्‍हणू लागले आहेत.

तवडकरांची नवीन प्रतिमा

आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी नव्याने स्वीकारलेली ‘अजातशत्रू’ भूमिका त्यांच्या विशाल आणि संयमी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. सध्या काणकोणचे हे नेते नव्या आवेशाने वावरू लागले आहेत. कोणी टीका केली तरी कटुतेने नव्हे, तर शांततेने पुढे जाण्याचा स्वभाव त्यांनी स्वीकारला असून तो आजच्या राजकारणात वेगळेपणाने उठून दिसतो. ‘वाईट शब्द त्यांच्याकडेच राहू द्यावेत’ हा त्यांचा विचार संतवृत्तीची आठवण करून देतो. शब्दांच्या संघर्षापेक्षा कामातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करताना त्यांनी सौम्यता, विकासदृष्टी आणि लोकाभिमुख नेतृत्व यांचा सुंदर संगम घडविण्याचा संकल्प केला आहे.

सरकारी कारभाराची अफलातून गती

रात्रीच्या चोऱ्या रोखण्यासाठी जागरूक नागरिकांनी सरकारला सूचना पाठवल्या; पण त्या पोलिसांपर्यंत पोहोचायला तब्बल एक महिना लागला! चोरांनी घरफोडी करण्यापूर्वी एवढा विचार केला नसता, जितका विचार प्रशासनाने ईमेल ‘फॉरवर्ड’ करण्यासाठी केला. ५ एप्रिलला आलेला ईमेल गृह खात्याच्या अवर सचिवांनी ४ मे रोजी पोलिसांकडे पाठविला. म्हणजे चोर पकडण्यापेक्षा ईमेलचा प्रवासच अधिक थरारक ठरला! सरकार नेहमी ‘प्रशासन गतिमान आहे’ असे सांगत असते; पण येथे गतिमानतेचा वेग इतका अफलातून होता की एका क्लिकसाठी पूर्ण महिना खर्ची पडला. जर नागरिकांनी ‘चोर घरात घुसले आहेत’ असा ईमेल केला असता, तर तो पुढच्या महिन्यात पोलिसांकडे पोहोचला असता काय, असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत. गुन्हेगार रातोरात काम उरकतात; पण प्रशासन अजूनही ‘लोडिंग...’ अवस्थेतच दिसत आहे. ईमेल फॉरवर्ड करण्याच्या या विक्रमामुळे आता गृह खात्याने कासवाला आपला अधिकृत शुभंकर घोषित करावे, अशी उपरोधिक मागणी सोशल मीडियावर होऊ लागली तर आश्चर्य वाटायला नको!

आता नावेलीत धीरयो!

सासष्टीत धीरयो काही थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेबांध-नावेली येथे रेड्यांच्या झुंजी झाल्या. पोलिसांनी मात्र नेहमीप्रमाणे डोळेझाक केली. कारण उघड होते म्हणा. हफ्ता आधीच हाती चिकटवला होता, त्यामुळे धीरयोवाले बिनधास्त होते. मडगाव पोलिस ठाण्यातील एक पोलिस सध्या केवळ कलेक्शनचे काम करतो. त्याच्याशी सेटिंग करून ही झुंज लावली गेली होती. यापूर्वी कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धीरयो होत होत्या. तेथे आता पोलिस कारवाई होत असल्याने धीरयोवाल्यांनी आपला मोर्चा आता नावेलीकडे वळविला असावा.

नगराध्यक्ष झाले भावूक!

मडगाव नगरपालिका कौन्सिलची कदाचित बुधवारी शेवटची बैठक झाली. २६ मे रोजी विद्यमान कौन्सिलचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आहे. तेव्हा केव्हाही सरकार प्रशासक नियुक्त करू शकते. बुधवारच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर भावूक झाले. त्यांनी सांगितले की, पावणेचार वर्षांच्या कार्यकाळात काही चुका झाल्या असतील तर सर्वांची माफी मागतो. पण आपण सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. देवाकडूनही चुका झाल्या आहेत, आम्ही तर माणसे आहोत. तसेच आगामी नगरपालिका निवडणूकही लढवणार, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

आणि त्‍यांना एकटे पाडले!

काही नेत्‍यांना आपण कशाप्रकारे जवळ आहोत, हे दाखविण्‍यासाठी काही नगरसेवक धडपडत असतात. मडगाव पालिकेचे नगरसेवक कामिल बार्रेटाे आणि नगरसेविका श्‍वेता लोटलीकर यांचाही त्‍यात समावेश होत असावा. हे दोन्‍ही नगरसेवक भाजप नेते दामू नाईक यांच्‍या जवळचे, असे मानले जाते. काल मडगाव पालिकेत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सुचविलेले काही विकासकामांचे प्रस्‍ताव चर्चेत आले असता, पालिकेत नगरसेवक असताना आमदारांचे प्रस्‍ताव का? अशातऱ्हेचा आक्षेप कामिल आणि श्‍वेता या दोघांनी घेतला. त्‍यावेळी गोवा फॉरवर्डचे नगरसेवक त्‍या दोघांवर तुटून पडले. आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे, हे सर्व घडत असताना भाजपच्या बाकी नगरसेवकांपैकी एकहीजण या दोघांच्‍या मदतीला धावून आला नाही. त्‍यामुळे ते दोघेही जवळपास एकटे पडले. या नगरमंडळात भाजपचे काही ज्‍येष्‍ठ नगरसेवक असताना त्‍यांनीही या दोन नगरसेवकांना साथ का दिली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कुंकळ्ळी मतदारसंघात तिसरा मोर्चा?

राजकारणात काहीही अशक्य नसते. राजकारणात मूल्य, विवेक, सत्य, सभ्यता या गुणांपेक्षा साम-दाम-दंड-भेद या गुणांना जास्त महत्त्व असते. कुंकळ्ळी मतदारसंघात पुढील निवडणुकीत तिसऱ्या मोर्चाचा उमेदवार निवडणुकीला उभा राहणार, अशी चर्चा सुरू आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पर्याय म्हणून जनतेला मान्य असेल, असा तिसऱ्या मोर्चाचा उमेदवार निवडणुकीत उतरविण्याची कवायत सुरू झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी संपूर्ण गोव्यात काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले असताना कुंकळ्ळीच्या मतदारांनी जनता पक्षाचे उमेदवार फर्दिन रिबेलो यांना निवडून दिले होते. त्यानंतर युनायटेड गोवन्स पक्षाचे उमेदवार आरेसियो डिसोझा निवडून आले होते. आता युरी आलेमाव यांना धडा शिकविण्यास तिसऱ्या आघाडीचा उमेदवार तयार केला जात असल्याची चर्चा आहे. आता पाहूया कुंकळ्ळीकर पुन्हा एकदा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन तिसऱ्या आघाडीला विजयी करतात की युरी आलेमाव यांच्यावर विश्वास कायम करतात.

वीरेश दिल्लीत, कार्यकर्त्यांत खळबळ

रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजी) अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍यातील वाद शिगेला पोहोचलेला असतानाच आमदार बोरकर यांनी दिल्ली गाठलेली आहे. त्‍यामुळे ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांत खळबळ माजलेली आहे. आमदार बोरकर पक्ष ताब्‍यात घेण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याचा दावा परब करीत आहेत. दुसरीकडे ते काँग्रेसच्‍या वाटेवर असल्‍याचे बोलले जात आहे; पण आपण पक्षापासून दूर गेलो नसल्‍याचे बोरकरच सांगत आहेत. अशा स्‍थितीत ते दिल्लीला गेल्‍याने या दौऱ्याचे नेमके कारण शोधून काढण्‍याचे प्रयत्‍न परब गटाकडून सुरू असल्‍याची चर्चा आहे.

पावसाची तयारी काय?

अवेळी पावसाने एकच चपराक मारली आणि घे तारांबळ उडाली. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यावर झाडांची पडझड, वीज खंडित होणे, जनजीवन विस्कळीत होणे हे नेहमीचे. तयारी अगोदरच पूर्ण होणे गरजेचे आहे. नाही तर पणजीत जे पाणी साचते त्यामुळे १८ जून रोडवर किंवा मिनेझिस ब्रागांझा हॉलखाली रहदारी खंडित होते. नाले स्वच्छ नसल्यास पाणी तुंबते. संबंधित सर्व खाती विभाग तत्पर, सज्ज असले पाहिजेत. लोकांना हवामानाच्या सूचना लागलीच फेसबूक, इन्स्टा किंवा एक्स ट्विटरवरून व रेडिओ, टीव्ही यावरून दिल्या गेल्या पाहिजेत. रेल्वे, विमान उड्डाणे यांची वेळापत्रके बदलतात त्यांच्याही सूचना लोकांपर्यंत तत्काळ पोहोचविल्या पाहिजेत. पावसाळी पर्यटन हा विकसित करण्याजोगा विषय. गावांतील हरित पदर नेत्रदीपक असतो; पण तितकी तयारी हवी.

वेगाचे तमाशे!

म्हापसा महामार्गावर रात्री उशिरा काही तरुणांनी रस्त्यालाच जणू खासगी शर्यतीचा ट्रॅक बनवला आहे. कानठळ्या बसवणारे सायलेन्सर, वेगाची विकृत हौस आणि नियमांना दाखवलेली सरळ तिलांजली यामुळे सामान्य वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुणी कुटुंबासह घरी परतत असतो, तर कुणी कामावरून दमून येत असतो; पण या ‘रस्त्याच्या शहाण्यांना’ मात्र इतरांच्या जीवाची किंमत शून्यच. पोलिसांच्या नजरेसमोरच हे वेगाचे तमाशे सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. अपघात झाल्यावर शोकसभा आणि कडक कारवाईची भाषा केली जाते; पण तोपर्यंत महामार्गावर मृत्यूशी स्पर्धा सुरूच राहते. नियम पाळणाऱ्यांनाच भीती वाटावी आणि नियम तोडणारेच रस्त्यावर मोकाट फिरावेत, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

तवडकरांना मानले पाहिजे...

ज्यावेळी एखादी व्यक्ती नेतेपदी किंवा मंत्रिपदावर पोहोचते त्यावेळी अशा व्यक्तींकडून आपली चूक झाली, असे विधान कधी ऐकू येत नाही; परंतु आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकरांनी मोठ्या मनाने मान्य केले की समाजातील नेत्यांमधील मतभेद ही मोठी चूक होती. ‘देवही चुकतो, आम्ही तर साधी माणसे...’ या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. समाजातील नेतेमंडळीत एकमत, एकजूट आणि एकसाथ असणे कितपत गरजेचे आहे याची जाणीव त्यांना झाली आणि माध्यमांसमोर त्यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या. यासाठी लागणारे धारिष्ट्य, धमक लागते ती तवडकरांनी दाखविल्यामुळे त्यांना मानले पाहिजे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ∙

पालिका निवडणुकीचे अंतर्गत राजकीय डावपेच!

म्हापसा पालिका मंडळाचा कार्यकाळ याच चालू महिन्यात संपुष्टात येत आहे. सध्या या पालिकेवर भाजपप्रणित आघाडीची सत्ता असली, तरी सत्ताधारी गटात अंतर्गत पातळीवर अनेक तीव्र मतभेद आणि छोटे-मोठे गट तयार झाले आहेत. काही विद्यमान सदस्यांनी तर आगामी पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच आपले धोरण निश्चित केले आहे. सत्ताधारी आघाडीच्या पॅनलसोबत न जाता, स्वतःची स्वतंत्र चूल मांडून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यातील काही गट सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि राजकीय खेळींवर तीव्र नाराज आहेत. आगामी काळात या नेत्यांचे मंडळ पुन्हा पालिकेवर येऊ नये, यासाठी पडद्यामागे जोरदार अंतर्गत राजकारण आणि मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आता पालिकेच्या निवडणुका कधी जाहीर होतात आणि प्रत्यक्ष मैदानात हे राजकीय डावपेच कसे खेळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संकुलाचे मालक कोण?

राज्यात विविध जातीच्या संघटना आहेत. काही जातीय संघटनांनी आपल्या संकुलासाठी सरकारकडून कमी दामात जमिनी घेतल्या होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारने पर्वरी येथील कोमुनिदाद मालकीची जमीन अनेक सामाजिक संघटनांना व जातीय संघटनांना कार्यालय व शिक्षण संकुल उभारण्यासाठी दिली होती. अशाच एका जातीय संघटनेला दिलेल्या जमिनीचा काही भाग त्याच समाजातील काही सदस्यांनी बेकायदेशीरपणे स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करून आपल्या नावावर केल्याचा आरोप आता त्या जातीय संघटनेकडून व्हायला लागला आहे. समाजाच्या जमिनीवर समाजाच्या नावाने उभारलेल्या त्या व्यावसायिक संकुलाचे मालक कोण? असा प्रश्न आता समाज विचारायला लागला आहे.

लोकशिक्षणाची रिल्स हवी

गोव्यात कलाकार खूप. प्रतिभावंत, कल्पक. तंत्रज्ञान अंगीकारून, कवेत घेऊन अनेकजण छोटीशी रिल्स जारी करतात; पण त्यांचे विषय, आशय बालिश असतात. आर्थिक ऑनलाईन टोप्या घालण्याचे सत्र सुरू आहे. त्याबाबत लोकशिक्षण देऊन रिल काढता येते. वृध्दांचा घरात, इतरत्र छळ चालतो त्याविषयी कायद्याची माहिती देता येते. घरगुती हिंसा कायदा काय सांगतो, ही माहिती नाट्यरूपात रिलमध्ये देणे शक्य आहे. स्वच्छतेचे, रस्ता सुरक्षेचे, ठकवणाऱ्यांपासून सुरक्षा असे अनेक विषय आहेत. सृजनशील, सघन संहितेनिशी हे शक्य आहे. दिग्दर्शक आणि नट आपणच लेखक होतात तेव्हा दर्जा बाष्कळतेकडे घसरणे हे साहजिक आहे. रिलमधून विचार देता येतो आणि हे लेखकच करू जाणे. ते व्हावे. कारण आज शब्द वाचण्यापेक्षा ते पाहिले जातात. दिग्दर्शकांनी अशोक समेळ थाटात लेखक बनू नये.

जुन्या, नव्या शिक्षकांना प्रशिक्षण

माध्यमिक शिक्षकांना उजळणी, कोचिंगची फार गरज आहे. मार्गदर्शक उत्कृष्ट पाहिजेत. भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशी विषयवार वर्गवारी करून हे प्रशिक्षण वेळोवेळी घेतले पाहिजे. शिक्षकी पेक्षा म्हणजे बॅंकेतील कारकुनाची नोकरी नव्हे. तो पिढ्या घडवतो अन्यथा बिघडवतो. अनेक लोक आपल्या गाडीचे वा स्कूटीचे सर्व्हिसिंग करत नाहीत. एक दिवस गाडी मध्येच बंद पडते. शिक्षकी यंत्रणेचेही तसेच आहे. त्याला ॲकॅडेमिक वातावरणाचे वंगण तेल लागते. नाही तर ते एका साच्यात अडकल्याने गंजू लागते. अद्ययावत ज्ञान देऊन ते ग्रहण करत राहण्याच्या खिडक्या शिक्षकांना दाखवल्या पाहिजेत. गणित शिक्षकाला ०.२, ०.०२, ०.२० यातील फरक सांगता येत नसल्यास तो बिनकामाचा असे समजायचे. केमिस्ट्री विषयातील पदवीधर गणित शिकवतो. इथेच अर्धीअधिक वाट लागते. गोव्यातील शिक्षकांचा निर्देशांक बंगळूर प्रशिक्षणावेळी खालावला असल्याचे उघड झाले होते. तो वाढवावा ही पालकांची मागणी.

नावेलीत उल्हासभाईंना पसंती

बुधवारी नावेली भाजप महिला मोर्चा समितीची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला या मतदारसंघातील महिलांची मोठी गर्दी होती. वक्त्यांनी तर नावेलीत २०२७मध्ये उल्हास भाईंनाच परत निवडून आणण्याचा निर्धार स्पष्ट केला. उल्हास भाईंनीही स्मितहास्य करून त्याला दुजोरा दिला. त्याचबरोबर पुढील सात महिने भरपूर काम करावे लागेल, याची जाणीव उपस्थित महिलांना करून दिली. नावेलीत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यासाठी इतर काही इच्छुक आहेत; पण उल्हास भाईंना महिलांचा पाठिंबा व त्यांच्याबद्दल आदर पाहिल्यावर भाजपश्रेष्ठी त्यांनाच पसंती देतील, असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market: डिचोली बाजारात आकर्षक रेनकोट, छत्र्या उपलब्ध; 15 टक्के दर वाढले, तरीही खरेदी उत्साहात सुरू

Labh Drishti Yog 2026: मंगळ-गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी योग'! 3 राशींचे लोक होणार मालामाल; नोकरीत मिळणार मोठी पगारवाढ

Viral Post: 'कंजूष' कंपनीची करामत!पगारवाढीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दिलं 1 लीटर पाणी अन् बिस्किट! पोस्ट होतेय व्हायरल

Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकात बेशिस्तपणा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या धोक्याने प्रवासी त्रस्त

Goa Politics: आमदार वीरेश बोरकरने मनोजला दिले आव्हान! संस्थापक सदस्य, समित्य‍ांशी चर्चेअंतीच पुढील निर्णय

SCROLL FOR NEXT