पणजी: मुरगाव बंदर ते सांकवाळ दरम्यानच्या इंधनवाहू वाहिनीच्या परिसरात उभी राहिलेली बांधकामे हटवावी लागणार आहेत. शंभराहून अधिक बांधकामे या वाहिनीच्या दुतर्फा उभी राहिलेली आहेत.
झुआरी इंडस्ट्रीज लि., आणि इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स यांनी झुआरी आयएव्ही ही कंपनी स्थापन केली असून ती मुरगाव बंदर ते सांकवाळ दरम्यान इंधनवाहू वाहिनीचे काम पाहते.
२००२ मध्ये घालण्यात आलेली १४ किलोमीटर लांब २० इंच रुंदीची ही वाहिनी आता बदलण्यात येणार आहे. या वाहिनीवर असलेले दाबोळी वडाकडे या भागातील घर हटवण्यात आले आहे. आता इतर बांधकामे हटवावीत यासाठी कंपनीने महसूल खात्यासह इतर यंत्रणांना (ज्यात केंद्रीय मंत्रालयाचाही समावेश आहे) पत्रे पाठवली आहेत.
वाहिनीतून वाहून आणण्यात येणारे इंधन साठवण्यासाठी सांकवाळ येथे ७१ हजार ३५० किलो लीटर क्षमतेच्या टाक्या आहेत. नाफ्ता, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, विमान इंधन वाहून नेण्यासाठी ही वाहिनी आहे. आठ दिवस या वाहिनीचा वापर केल्यानंतर १५ दिवस ती बंद असते. त्या दरम्यान टप्प्याटप्याने ही वाहिनी आहे त्याच जागी बदलण्यात येणार आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, मुरगाव बंदरात धक्का क्र. ८ ते सांकवाळ या दरम्यान ही वाहिनी आहे. मध्यंतरी या वाहिनीला लागलेली गळती शोधण्यासाठी १५ दिवस लागले होते.
त्यावेळी केलेल्या खुदाईवेळी ही वाहिनी जीर्ण झाल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर कंपनीने सरकारला पत्र लिहून ही वाहिनी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर आता सरकारच्या मान्यतेनंतर वाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. या वाहिनीला पर्याय म्हणून हेडलॅण्ड - सडा येथे ४० हजार किलो लीटर क्षमतेच्या इंधन साठवणूक टाक्या उभारण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात आला होता. मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून त्या जागेशेजारी कचरा संकलन केंद्र सुरू केल्यावर तो विचार मागे पडला. रेल्वेमार्गे इंधन वाहून नेता येईल का याचीही चाचपणी करण्यात आली होती. सांकवाळ, बाळ्ळी, वेर्णा आणि सांकवाळ येथे रेल्वेने इंधन नेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचेही अभ्यासाअंती कंपनीच्या लक्षात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इंधनवाहू वाहिनीवर सध्या घरांचे बांधकाम नाही, पण परिसरात घरांची बांधकामे आहेत आणि वाहिनी बदलताना त्यांचा अडथळा होणार आहे. त्याबाबत सर्व संबंधितांशी पत्र व्यवहार केला आहे. वाहिनी बदलण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.शिवप्रसाद नाईक, कंपनीचे अधिकारी
वाहिनी वापरात नसेल त्या कालावधीत काही भागातील वाहिनी बदलली जाणार आहे. या वाहिनीला समांतर वाहिनी घालण्यासाठी जागाच नसल्याने असा निर्णय घेतला आहे. राज्याला इंधन पुरवठा व्यवस्थितरीत्या सुरू रहावा यासाठी वाहिनी बदलण्याची गरज आहे.संजीव गडकर, नागरी पुरवठा सचिव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.