पणजी: भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार नैऋत्य मान्सून गुरुवारी (४ जून) केरळमध्ये दाखल झाला. येत्या रविवारपर्यंत तो गोव्यात धडकण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण गोवा व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, गोवा वेधशाळेने राज्यात पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
सध्या पूर्व-मध्य अरबी समुद्र तसेच गोव्यालगतच्या परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर वरच्या वातावरणात चक्रीय वारे सक्रिय आहेत. या हवामान प्रणालीमुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होण्यास मदत होत आहे. त्यामुळे गोव्यात लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला आहे. आज गुरुवारी संध्याकाळी आकाशात दाट ढगांची गर्दी झाली होती. राजधानी पणजीसह राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडला.
दिवसभर दमट वातावरण होते. किनारी भागातील लोकांना सतर्कतेेचे आवाहन पुढील चार दिवसांच्या कालावधीत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. किनारी भागातील नागरिक, मच्छीमार तसेच प्रवाशांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे नैऋत्य मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र, दरवर्षी त्याचे आगमन ठरलेल्या तारखेलाच होईल याची शाश्वती नसते. समुद्रातील हवामानाची स्थिती, नैऋत्य वाऱ्यांचा वेग, एल-निनो यांसारख्या घटकांवर मान्सूनची प्रगती अवलंबून असते. गोव्यात साधारणपणे ५ ते ७ जून रोजी मान्सून दाखल होतो.
मात्र केरळातील आगमनास विलंब झाल्यास गोव्यातील आगमनालाही उशीर होऊ शकतो. अनेकदा मान्सून कारवारपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा वेग मंदावतो आणि गोव्यात दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस लागतात.
मान्सूनची सध्याची वाटचाल समाधानकारक
सध्या मान्सूनची वाटचाल केरळ ओलांडून कर्नाटकच्या दिशेने सुरू आहे. मात्र अनेकदा गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी मान्सून कारवार परिसरात काही काळ स्थिरावतो. त्यामुळे गोव्यातील त्याचे आगमन काही दिवस लांबू शकते. मात्र सध्याची स्थिती अनुकूल आहे. मान्सूनची प्रगती अशीच राहिल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून गोव्यात दाखल होईल, असे ‘एनआयओ’चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. एम. आर. रमेशकुमार यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
देवभूमीत अवतरले आनंदघन
मान्सून केरळममध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून ही आहे. त्या तुलनेत यंदा तो तीन दिवस उशीरा दाखल झाला. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोव्यासह दक्षिण कोकणापर्यंत मजल मारू शकतो.
यंदा मान्सून २६ मे रोजी, म्हणजे सर्वसाधारण तारखेच्या सहा दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तविला होता. मात्र, अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे अंदाज वर्तविलेल्या तारखेच्या तुलनेत मान्सूनचे आगमन नऊ दिवस लांबले.
सध्या मान्सूनची प्रगती आणि तीव्रता पाहता रविवारपर्यंत तो गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवडाभर पावसाचा जोर वाढू शकतो. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
- नहुष कुलकर्णी, संचालक (गोवा वेधशाळा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.