

पणजी: गोव्यात जल मेट्रो सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई आणि नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली.
दिल्लीतील बैठकीत प्रकल्पाला केंद्र सरकारकडून आवश्यक आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी गोवा सरकारला जल मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या.
डीपीआर सादर झाल्यानंतर केंद्र सरकारकडे आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोव्यातील जलवाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, कोची येथे यशस्वीपणे कार्यरत असलेल्या जल मेट्रोच्या धर्तीवर गोव्यातही आधुनिक बोट सेवा, अत्याधुनिक जेटी आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा विचार सुरू आहे. डीपीआर पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचा खर्च, मार्ग, टर्मिनल्सची संख्या आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक निश्चित होणार असून, त्यानंतर केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळविण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.