Goa Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue Cases: सावधान! कांदोळी, चिंबल, मुरगाव डेंग्‍यूचे ‘हॉटस्‍पॉट’; 16 संशयास्पद मृत्यू

Goa Dengue Cases: २ महिन्‍यांत ४,५११ प्रकरणे; सतर्कतेचा सल्‍ला

दैनिक गोमन्तक

Dengue Cases In Goa: राज्यात पुन्हा एकदा डेंग्यूने उसळी मारली असून गेल्या दोन महिन्यांत ४५११ तपासण्या रॅपिड पॉझिटिव्ह आल्या असून त्यापैकी १५२ चाचण्या एल्झा चाचणीत निश्चित झाल्या आहेत.

वर्षभरात १६ रुग्णांचा डेंग्यूने संशयास्पद मृत्यू झाला असून याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी डेंग्यूपासून सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

यावेळी राज्य साथ रोग प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. राज्यभर वाढणाऱ्या डेंग्यूची प्रकरणे लक्षात घेऊन आरोग्य खात्याने आज उच्चस्तरीय तातडीची बैठक घेतली.

यात सर्वच प्राथमिक, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांतील प्रमुख यांचा समावेश होता. या सर्वांना डेंग्यूबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्री राणे म्हणाले, केंद्र सरकारने प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये आमच्या सर्वच खात्याने सहभाग नोंदवावा यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत राज्यभर वाढणाऱ्या डेंग्यू नियंत्रणावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या वर्षभरात आत्तापर्यंत ११०१० रॅपिड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून यापैकी २६२ प्रकरणे एलायझा चाचणीतून डेंग्यू म्हणून निश्चित झाली आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये हे प्रमाण खूपच वाढल्याने राज्य सरकारने याबाबत तातडीची उपाययोजना सुरू केली आहे.

पणजीतील टीबी रुग्णालयाचे स्थलांतर

सध्या पणजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा कमी पडत आहे. यासाठी नॅशनल थिएटरच्या मागील जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून सांतिनेज येथील टीबी रुग्णालय बांबोळी येथे हलवण्याचा आमचा प्रयत्न असून तसे झाल्यास तेथील जागेत अद्ययावत आरोग्य केंद्र उभारण्यात येईल, असेही मंत्री राणे म्हणाले.

या भागांत जास्‍त फैलाव

डेंग्यू राज्यभर पसरला असला तरी प्रामुख्याने कांदोळी, कळंगुट, चिंबल, दक्षिण गोव्यातील वास्को आणि मुरगाव परिसरात डेंग्यूची वाढ झपाट्याने होताना दिसत आहे. डेंग्यूचा प्रसार डासांमुळे होत असल्याने अन्य ठिकाणांहूनही रुग्ण समोर येत आहेत.

फॉगिंग निष्प्रभ

  1. डेंग्यू प्रामुख्याने डासांपासून प्रसारित होणारा रोग आहे. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी डासांवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक असते.

  2. पावसाळ्याच्या दरम्यान हवामानात होणारे बदल आणि साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते.

  3. ती रोखण्‍यासाठी फॉगिंग मशीनचा वापर केला जात होता. अर्थात या मशीन आता निष्प्रभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  4. त्यामुळे आपल्या परिसराबरोबर घरातील स्वच्छता महत्त्वाची आहे असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

तापाकडे दुर्लक्ष नको

डेंग्यूच्या संभाव्य लक्षणांमध्ये सुरवातीला ताप येणे हे प्रमुख लक्षण मानले जाते. त्यामुळे ताप आल्यास जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डेंग्यूची रॅपिड चाचणी करून घ्यावी.

जर अशक्तपणा वाढला, उलट्या आणि अन्य लक्षणे दिसल्यास रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे.

दक्षिण गोवा रुग्णालयात सुधारणा करणार ः राणे

  1. दक्षिण गोवा रुग्णालयात अनेक सुधारणा करणे अपेक्षित असून यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. टेली आयसीयूसाठी रिलायन्सबरोबर करार करण्यात येत असून लवकरच कॅथलॅबसारख्या सुविधा उभारण्यात येत आहेत.

  2. सध्या दक्षिण गोवा रुग्णालयात आयसीयू सुविधा उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्थलांतर केले जाते. मात्र, लवकरच दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न आहेत.

  3. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. याबरोबरच दक्षिण गोव्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय उभारून त्यांच्या सेवेचा राज्य सरकारच्या सेवेसाठी फायदा करून घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

पुढील ६ महिन्यांत नवीन नगर नियोजन कायदा

नगर नियोजन आणि शहर विकास खात्याचा सध्या अस्तित्वात असलेला कायदा ७० च्या दशकातील असून यात बदलाची गरज आहे. यासाठी सरकार येत्या ६ महिन्यांत नवीन शहर आणि नगर नियोजन (टीसीपी) कायदा आणण्याचा विचार करत आहे, अशी माहिती नगर नियोजन आणि शहर विकासमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

ते म्हणाले, माझे वडील प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुरवातीला तयार करण्यात आलेल्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

प्लास्टिकपासून इंधन प्रकल्प ३० ऑक्टोबरपूर्वी

पेडण्यात प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करणारा प्रकल्प ३० ऑक्टोबरपूर्वी सुरू करण्यात येणार आहे. तशी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सध्या प्लास्टिकचा कचरा तुकडे करून कर्नाटकातील सिमेंट कंपन्यांत जाळण्यासाठी पाठवण्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT