Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: लोबोंची सुप्त इच्छा..

गोमन्तक डिजिटल टीम

लोबोंची सुप्त इच्छा..

कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे नवा राजकीय पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत, अशा आशयाच्या वावड्या काही उठल्या. याविषयी लोबो यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी थेट नकारही दिला नाही किंवा बातमी खोटी आहे, असेही म्हटले नाही. उलट प्रत्येकाला अन् विशेषतः पत्रकारांना मते मांडण्याचा अधिकार आहे, असे लोबो बोलले. मुळात लोबो हे महत्वकांक्षी नेते आहेत, ते काहीही करू शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. कारण गेल्या निवडणुकीवेळी त्यांनी देवासमोर प्रतिज्ञा घेतली होती की, आम्ही भाजपात जाणार नाही. मात्र, पुन्हा भाजपात आले. आता पुढील निवडणुकीवर डोळा ठेवूनच कदाचित ते किमान नऊ ते दहा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करून आपली पकड मजबूत करू पाहताहेत. हा खटाटोप मुख्यमंत्री बनण्यासाठीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जरी लोबोंनी पक्षाबाबत ठोस उत्तर दिले नसले तरी, लोबोंना उकळ्या फुटल्या हे त्यांच्या हावभावावरून स्पष्ट जाणवले. ∙∙∙

फादर बॉलमेक्‍सचा सल्‍लाही धुडकावला

मागच्‍या शनिवार मडगावात सुभाष वेलिंगकर यांना अटक करा ही मागणी करून लोक रस्‍त्‍यावर आल्‍याने अनेकांना त्रास सहन करावे लागले, त्‍यात शाळेला जाणारे विद्यार्थी आणि म्‍हाताऱ्या व्‍यक्‍तींचा समावेश होता. त्‍यामुळे आता काहीजण हे आंदोलन भडकाविणाऱ्या नेत्‍यांना दोष देऊ लागले आहेत. या अशा नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे, प्रतिमा कुतिन्‍हो. असे म्‍हणतात, लोकांना रस्‍त्‍यावर आणून इतर लोकांना वेठीस धरू नका, असा सल्‍ला शुक्रवारी रात्रीच फा. बाेलमॅक्‍स परेरा यांनी प्रतिमा कुतिन्‍हो यांना फोन करून दिला होता. मात्र, आंदोलनाच्‍या मूडमध्‍ये असलेल्‍या प्रतिमाबाईंनी तो सल्‍ला साफ धुडकावून लावला. आपले नेतेपण सिद्ध करण्‍यासाठी प्रतिमाबाईनी सामान्‍यांनाही वेठीस धरले, असे याला म्‍हणायचे का?

सुदिन यांचा रथ ‘सुसाट’?

वीज मंत्री सुदिन ढवळीकर हे सध्या मडकई मतदारसंघातील विकासकामे जोमाने करताना दिसताहेत. परवा त्यांनी या मतदारसंघातील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण केले. तत्पूर्वी त्यांनी बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावरच्या सौर ऊर्जेचे दिवे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करून दिला. आता काय होते की, सुदिन यांनी कोणतेही कार्य केले किंवा त्यांचा कार्यकम असला की, त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘गोमन्तक’ मधला ''तो'' अजून सुदिन मुख्यमंत्री का झाले नाहीत? हा लेख आठवायला लागतो. आणि मग असा कार्यक्षम आमदार मुख्यमंत्रिपदी हवाच, असा सूर आळवायला सुरुवात होते. सुदिन यांच्या कार्यकर्त्यांची त्यांना मुख्यमंत्रिपदी बघण्याची इच्छा फलद्रूप होते की, काय ती. पण सध्या सुदिनांचा रथ ‘सुसाट’ सुटल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जाम खुशीत दिसताहेत.

डिचोली पोलिसांची बनवाबनवी

सेंट झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांना ढाल करून सरकारला धडा शिकवण्यासाठी दक्षिण गोव्यात काही ख्रिस्ती बांधव व काही राजकारण्यांनी ठरवले होते. त्यामध्ये काही अंशी यशस्वीही ठरले, मात्र आज उच्च न्यायालयाने वेलिंगकर यांना पोलिस अटकेपासून संरक्षण देऊन आंदोलकांचा फुगाच फोडला आहे. सरकारने फादर बोलमॅक्स पेरेरा याच्याविरुद्ध जी प्रक्रिया केली गेली होती, तीच याबाबतीतही केली जाईल असे स्पष्ट केले होते. पेरेरा यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता, त्यामुळे वेलिंगकर यांनाही मिळेल या दिशेनेच पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. पोलिसांनी बजावलेली नोटीस वेलिंगकरांनी स्वीकारून ते चौकशीस हजर राहिले नाहीत तर त्यांना न्यायालयात जाऊन त्यांच्या अटकेसाठी अर्ज करण्याची संधी होती. मात्र, पोलिसांनी ती घेतली नाही. ते नोटिसा मागून नोटीस बजावत राहिले. याच मुद्द्यावर आज उच्च न्यायालयाने बोट ठेवले व पोलिस यंत्रणेची तपासकामातील तफावत दाखवून दिली. त्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली व अटक करणार नाही, असं सांगण्याची नामुष्की ओढवली.

पणजी महापालिकेचे गुपित

पणजी मासळी मार्केटमधील इमारत धोकादायक असल्याचे घोषित करून ती पाडण्याच्या नावाखाली तेथील व्यापारांना तेथून दोन महिन्यापूर्वी हटवण्यात आले. प्रत्यक्षात आजपासून या इमारतीच्या शेजारी असलेल्या मासळी मार्केटची शेड पाडण्यास तसेच काही इमारतीचा भागही तोडण्यास सुरूवात झाली आहे. ही इमारत पाडून तिथे नवी इमारत बांधण्याचा सध्या कोणताच प्रस्ताव पणजी महापालिकेकडे नाही. सध्या मासळी विक्रेत्यांना पार्किंग जागेत शेड घालून तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना किती वर्षे काढावी लागणार आहेत अशी चर्चा या मासळी विक्रेत्यांमध्ये आहे. पणजी नवीन मार्केटच्या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी अनेक वर्षे उलटून गेली तरी तिसऱ्या टप्पाच्या बांधकामाला महापालिकेला मुहुर्त मिळत नाही. त्यामुळे एखादे बांधकाम पाडल्यानंतर तेथे वेळेत नव्याने बांधकाम होण्याची शक्यता कमी आहे. महापालिकेचे इमारत पाडण्यामागील गुपित दडलेले आहे. दुकानधारकांनी न्यायालयात दाद दिली आहे मात्र अजूनही महापालिका हे गुपित उघड करत नाही.

पोलिस स्थानकांत गजबज

राज्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामानिमित्त भाड्याने गोव्यात राहतात. परंतु त्यांची योग्य ती माहिती सरकारकडे नव्हती. पंरतु आता भाड्याने राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत. सर्व पोलिस स्थानकांवर, चौकींवर पोलिस कार्ड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. इतके दिवस सरकार अनेकदा भाडोत्री रहात असलेल्या नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन करत होते. पंरतु त्याची नोंदणी होत नव्हती, परंतु आता सरकारने नोंदणी न केलेले भाडेकरू सापडल्यास घर मालकांना दहा हजार रूपये दंड ठोठावणार, असे घोषित केल्याने भांडेकरूंचे धाबे दणाणले आहे. घर मालक स्वतःहून भाडेकरूंना तात्काळ पोलिस पडताळणी करून कार्ड बनवण्यासाठी पाठवत आहेत. नोंदणी न केलेले भाडेकरू सापडले तर फुकटचा दहा हजाराचा गंडा कोण सहन करेल?त्यामुळे कधी नव्हे ती, पोलिस स्थानके नागरिकांच्या गर्दीने गजबजली आहेत. म्हणतात ना, नाक दाबले की तोंड उघडते, तेच खरे!

कमबॅकची रणनीती अन् राजकारण...

थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकरांनी आगामी २०२७विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून, थिवीतूनच आपण उभे राहणार, असे त्यांनी जाहीर केले. गेल्या विधानसभेवेळी कांदोळकर हे थिवीऐवजी हळदोणेतून उभे राहिले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वेळी थिवीतून निवडणूक लढवावी, असा सल्ला काही निकटवर्तीयांनी कांदोळकरांना दिलेला होता. मात्र त्यांनी आपल्या मनाचे ऐकले व त्यांच्यावर सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याची वेळ ओढवली. आता कांदोळकरांना उपरती झाली आहे व ते पुन्हा थिवीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सध्या कांदोळकर बाब कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाहीत. तसेच कांदोळकरांचे प्रतिस्पर्धी मंत्री नीळकंठ हळर्णकरांसोबत सध्या त्यांचा राजकीय कलगीतुरा सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणूक रंगतदार होणार, याचे संकेत मिळताहेत. कारण कांदोळकरांनी मंत्री हळर्णकरांवर वैयक्तिक टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हळर्णकरबाब कांदोळकरांच्या टीकेला कसे प्रत्युत्तर देतात, याकडे थिवीकरांच्या नजरा लागल्या आहेत.

आवाज विरला तरी...

सेंट फ्रान्सिस झेवियरविरोधातील सुभाष वेलिंगकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सबंध राज्यभर ख्रिश्‍चन बांधवांनी उठवलेला आवाज आता विरला असला तरी सध्याच्या सरकारविरोधातील खदखद मात्र अजून निवळलेली नाही. न्यायालयाने सुभाष वेलिंगकर यांना काही अंशी दिलासा दिल्यामुळे अखेर वेलिंगकर यांनी पोलिस स्थानकात हजेरी लावली, पण तेवढ्याने ख्रिश्‍चन बांधवांचे समाधान झाल्याचे काही दिसलेले नाही. सध्या ख्रिश्‍चन बांधवांकडून या प्रकरणाची त्यांच्यातील गटातच जोरदार चर्चा सुरू असून सरकार दुतोंडी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येत आहे. पोलिसांना वेलिंगकर सापडत नाहीत की, तसा बनाव केला गेला, अशीही शंका उपस्थित करण्यात येत असून पुढील निवडणुकीत या प्रकरणाचा जबरदस्त फटका सत्ताधाऱ्यांना बसेल,अशी चर्चा रंगली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT