सासष्टी: मडगाव शहरातील पार्किंग समस्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नगरपालिकेच्या इमारतीमागे प्रस्तावित पार्किंग प्रकल्प तब्बल ११ वर्षांपासून रखडलेला असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. १५ सप्टेंबर २०१५ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र, आजतागायत या जागेवर कोणतीही ठोस उभारणी झालेली नाही.
शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगची तीव्र कमतरता भासत आहे. जुने बसस्थानक आणि पिकअप स्टँड ही दोन पर्यायी ठिकाणे असतानाही प्रशासनाने त्यांचा उपयोग करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे नागरिकांना रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत उद्योजक विवेक नाईक यांनी सांगितले की, पूर्वी जबाबदार नगरसेवक निवडून येत होते. मात्र, आता राजकारणामुळे स्वार्थाला प्राधान्य दिले जात असून शहराच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदार यांनी या प्रश्नावर गांभीर्याने प्रयत्नच केले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पार्किंगसाठी राखीव ठेवलेली जागा सध्या कचरा टाकण्याचे ठिकाण बनली आहे. अनेकदा येथे कचऱ्याला आग लागल्याच्या घटना घडल्या असून मोठ्या दुर्घटनेचा धोका कायम आहे. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
विकासाभिमुख प्रतिनिधींची निवड करा!
विद्यमान कौन्सिलने या ठिकाणी हायड्रोलिक पार्किंग प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नाही. उलट सायंकाळच्या वेळी काही खाद्यपदार्थ विक्रेते येथे तात्पुरती दुकाने उभारून ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था करतात.
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जबाबदार आणि विकासाभिमुख प्रतिनिधींची निवड करावी, तसेच पार्किंगसारख्या मूलभूत समस्यांवर ठोस भूमिका घेणाऱ्यांनाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन विवेक नाईक यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.