

Kedarnath Yatra Viral Video Woman: आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटना कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्याची नवी लाट आली. लोकांना जेव्हा काही अजब, चुकीचे किंवा लक्षवेधी दिसते, तेव्हा ते लगेचच त्याचा व्हिडिओ बनवतात आणि इंटरनेटवरील जनतेला जर तो आवडला किंवा धक्कादायक वाटला तर तो वेगाने व्हायरल होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिला (Women) पर्यटकाचा अहंकार आणि उद्दामपणा पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
केदारनाथ यात्रेच्या पवित्र मार्गावर एका खच्चर चालकासोबत किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर या महिलेने आपल्या पदाचा आणि ओळखीचा गैरवापर करत त्याला थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला खच्चरवर बसलेली दिसत असून तिच्यासमोर खच्चरचा मालक उभा आहे. दोघांमध्ये कोणत्या कारणावरुन वाद सुरु झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही कारण हा व्हिडिओ मध्यातून रेकॉर्ड करण्यात आला. मात्र, जिथून व्हिडिओ सुरु होतो, तिथे ती महिला अत्यंत उद्धट भाषेत खच्चर चालकाला म्हणते, 'ही तुझी चूक आहे. काय तुझ्या बापाचा रस्ता आहे का, जो तुला सहज जागा मिळेल? मला सिलेंडर लागला... तुला माहीत नाही मी कोण आहे ते? माझ्या एका फोन कॉलवर तू सरळ जेलमध्ये जाशील, फक्त एक फोन. मला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त एक कॉल करेन आणि थेट इथल्या एसपींना बोलावून आणेन.' पवित्र धार्मिक स्थळावर एका गरीब मजुराशी अशा प्रकारे हुज्जत घालतानाचा हा प्रकार अत्यंत अशोभनीय मानला जात आहे.
हा धक्कादायक व्हिडिओ 'एक्स'वर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. बातमी मिळेपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'केदारनाथला जाणाऱ्या एका महिलेचा खच्चर चालकासोबत एका छोट्याशा गोष्टीवरुन वाद झाला. माझ्या एका फोन कॉलवर तुला अटक होईल, तुला माहीत नाही मी कोण आहे, अशा धमक्या तिने दिल्या. एका पवित्र स्थळावर स्वतःच्या श्रीमंतीचा आणि ओळखीचा रुबाब दाखवणारी महिला.'
केदारनाथसारख्या पवित्र आणि श्रद्धेच्या ठिकाणी येऊन आपल्या कथित पैशांची किंवा ओळखीची घमेंड दाखवणाऱ्या या महिलेवर सोशल मीडियावरील जनता कडाडून टीका करत असून, अशा व्हीआयपी संस्कृतीला आणि अहंकाराला देव कधीही माफ करणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.