Khari Kujbuj Political Satire  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; मुंगूल गँगवॉरचा ‘खरा सूत्रधार’ कोण?

Khari Kujbuj Political Satire: रवी नाईक यांचे एक बरं असतं. ते कायम ‘फोकस’ मध्ये असतात. कधी भाषणामुळे तर कधी पूर्वीच्या कामगिरीमुळे. आता सध्या चर्चेत असलेल्या ‘गॅंगवार’मुळे ते पुन्हा एकदा गाजू लागलेत.

Sameer Panditrao

मुंगूल गँगवॉरचा ‘खरा सूत्रधार’ कोण?

मुंगूल-मडगाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्‍या गँगवॉरमध्‍ये फातोर्डा पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे, तर कुख्‍यात अशा तलवार ब्रदर्सच्‍या विरोधात फरारनामा जारी केला आहे. सध्‍या फरार असलेले हे तलवार ब्रदर्सच या गँगवॉरमधील मुख्‍य संशयित असा सांगण्‍याचा प्रयत्‍न सध्‍या पोलिसांकडून प्रत्‍यक्षपणे नसला तरी अप्रत्‍यक्षपणे होत आहे. पोलिसांची ही कृती पाहिल्‍यास खऱ्या सूत्रधारांना पोलिस पाठीशी घालू तर पहात नाहीत ना, असे वाटते. जर मडगावात रहाणारे तलवार ब्रदर्स हे जर मुख्‍य आराेपी होते तर पोलिसांनी केपे, फाेंडा आणि मेरशी या भागात का छापे टाकले? याचे उत्तर कुणी देऊ शकेल का? की वेंन्झी म्‍हणतात तसे, या गुंडांना पोलिसांचेच अभय असल्‍यामुळे त्‍यांची मजल इथपर्यंत पाेहोचू शकली? ∙∙∙

रविंचा ‘दरारा’?

कृषिमंत्री रवी नाईक यांचे एक बरं असतं. ते कायम ‘फोकस’ मध्ये असतात. कधी भाषणामुळे तर कधी त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीमुळे. आता सध्या चर्चेत असलेल्या ‘गॅंगवार’ प्रकरणामुळे ते पुन्हा एकदा गाजू लागलेत. नाही म्हणजे तसा त्यांचा व या सुरू असलेल्या ‘गॅंगवार’चा काहीएक संबंध नाही हो. पण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांना गुन्हेगार कसे चळाचळा कापायचे, याची लोकांना यामुळे आठवण येऊ लागली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे वस्त्रहरण सुरू झाल्यामुळे रविंच्या ‘त्या’ कारकिर्दीची आठवण येणे साहजिकच आहे म्हणा.‘याद न जाये, बीते दिनों की’ अशी सध्या लोकांची स्थिती झाली आहे. फोंड्यात तर यावर खमंग चर्चा सुरू असून ‘पात्राव तो पात्रावच’ असेही म्हटले जात आहे. पण काय फायदा हो? पात्रावाच्या त्या दराऱ्याचे पूर्णतः अनुकरण केले जाईल, तोच खरा सुदिन.. नाही का? ∙∙∙

दिगंबरसाठी शुभसूचक नांदी?

स्‍वातंत्र्‍य दिनानिमित्त तालुका पातळीवर जो शासकीय सोहळा आयोजित करतात त्‍यावेळी ध्‍वजवंदनाचा मान त्‍या तालुक्‍यातील मंत्र्यांना दिला जातो. यापूर्वी सासष्टीतील अशा कार्यक्रमाला आलेक्‍स सिक्‍वेरा उपस्‍थित रहायचे. मात्र त्‍यांची प्रकृती बरी नसल्‍याने आज होणाऱ्या १५ ऑगस्‍टच्‍या ध्‍वजवंदनासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत हे उपस्‍थित रहाणार आहेत. असे म्‍हणतात, की १५ ऑगस्‍टनंतर किंवा जास्‍तीत जास्‍त सप्‍टेंबरपर्यंत गोवा मंत्रिमंडळात बदल होणार आहे. त्‍यामुळे आजची दिगंबर यांना मिळालेली ही संधी भविष्‍यातील मंत्रिपदाची शुभसूचक अशी नांदी तर ठरणार नाही ना? ∙∙∙

पणजीत नेपाळी मतदार!

पणजीतील नेपाळी नावांचा मतदारयादीत समावेश झाल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे. यापूर्वी उत्पल पर्रीकर यांनी नेपाळी नावे यादीत समाविष्ट केल्याने आवाज उठवला होता. आता तर नेपाळींची मतदार यादीत दाखवलेल्या नावांनुसार काँग्रेसने त्यांच्या पत्त्यावर जाऊन खातरजमा केली. त्यात हे लोक तिथे नसल्याचेच दिसले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची त्यांचा आरोप खरा ठरल्याने निश्‍चित छाती फुगली असेल. महत्त्वाचे म्हणजे ताळगाव व पणजीतील श्रीमंतांच्या घरी घरकाम करणाऱ्यांत नेपाळीच अधिक आहेत. उत्पल यांनी आरोप केल्यानंतर नेपाळी लोक भाजप नेत्यांना मुख्यालयात भेटायला गेले होते. आता काँग्रेसने नेपाळी नावे यादीत असल्याचे उघड केल्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आता धावपळ करावी लागणार, हे स्पष्ट आहे. विशेष बाब म्हणजे नेपाळचा कोणता राष्ट्रीय कार्यक्रम असल्यास हा समाज एकत्रित येतो, तेव्हा हजारोंच्या संख्येने तो समाज गोव्यात वास्तव्य करून असल्याचा दावा खरा ठरतो, नाही का?. ∙∙∙

दामूंची राज्यपाल भेट

माजी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सहकाऱ्यांसह भेट घेतली होती. नवे राज्यपाल पदारुढ होऊन कित्येक दिवस झाले तरी दामू राजभवनावर कसे फिरकले नाहीत याची चर्चा होती. अखेर दोन प्रदेश सरचिटणीसांना सोबत घेऊन दामू गुरुवारी राजभवनावर अवतरले. त्यांनी मोठा पुष्पगुच्छ सोबत नेला होता. अर्थात अशा सदिच्छा भेटीत सगळी चर्चा ही वरवरची असते. मात्र मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे सदस्य राज्यपालांना स्वतंत्रपणे भेटणे सुरू होण्याआधी दामू राजभवनावर पोचले याची वेगळी चर्चा मात्र आहे. ∙∙∙

युरीच्या यशाचे समर्थकांकडून सेलिब्रेशन!

‘जो जिता वही सिकंदर’ असे म्हटले जाते. कठोर परिश्रमाने मिळालेल्या यशाचे कौतुक होणे अपेक्षित असते. कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभा गाजवली, याचे प्रमाणपत्र वेगळे देण्याची गरज नाही.आपल्या अभ्यासू व आक्रमक शैलीत युरी यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणले हे सत्य आपण नाकारू शकत नाही.युरी विरोधी पक्ष नेता म्हणून कमी पडत आहे, असा जो आरोप होत होता. तो युरीनी विधानसभेत केलेल्या कामगिरीने खोटा ठरविला. युरी च्या या यशाचे सेलिब्रेशन त्याच्या कार्यकर्त्यांनी केले.युरी ने तयार केलेल्या नव्या फळीच्या कार्यकर्त्यांनी युरीचा सन्मान केलाच. युरी समर्थक नगराध्यक्ष व नगरसेवकांनीही युरीला शुभेच्छा दिल्या. काही का असेना युरी आलेमाव भाजपच्या जवळ जाताहेत, ही अफवा त्यांनी खोटी ठरवलीय. ∙∙∙

सुदिनना गरजच काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मडकई मतदारसंघात जो ११९ बोगस मतदार असल्याचा आरोप केला आहे, त्याची चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे. सुदिन यांना बोगस मतदारांची गरजच काय, अशी विचारणा या मतदारसंघातील लोक करू लागलेत. आणि गेल्या पाच निवडणुकीतील त्यांना मिळालेली मते पाहता हा दावा खरा वाटू लागतो. गेल्या निवडणुकीत भाजपबरोबर युती नसूनही सुदिन यांनी तब्बल दहा हजारांची आघाडी घेतली होती. आणि विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसच्या लवू मामलेदारांच्या खात्यात फक्त ९५० मते जमा झाली होती. यातली मजेची गोष्ट म्हणजे दर निवडणुकीगणिक या मतदारसंघात सुदिन यांची मते वाढताहेत तर काँग्रेसची मते घटताहेत. आता अशी वस्तुस्थिती असताना पाटकरसाहेब उगाच ‘अंधेरे मे तीर’ का मारता हो? हे आम्ही नाही बोलत हं, मडकईतील लोकच बोलताहेत. बघू आता पाटकर काय उत्तर देतात ते. नाही का?... ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

Asia Cup 2025 Winner Prediction: आशिया कप कोण जिंकणार? आकाश चोप्राचे भाकित चर्चेत! म्हणाला...

Kolkata Crime: कोलकाता पुन्हा हादरलं! बर्थ डे पार्टीतच 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्रच ठरले कर्दनकाळ

Bomb Blast In Pakistan: पाकिस्तानमध्ये LIVE क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी Watch Video

Affordable 350CC Bikes: स्पोर्टी लूक, दमदार परफॉर्मन्स...! 'या' धमाकेदार बाइक्समध्ये मिळतंय सर्व काही, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT