Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

Khari Kujbuj Political Satire: विधानसभा निवडणुकीला सव्वा वर्षे असले तरी फोंडा मतदारसंघात ‘कांटे की टक्कर’ होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

ते ‘सायब’ खरेच निवडणुकीत उतरणार ?

इच्छा सगळ्यांनाच असते, मात्र सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतातच, असे नाही. कुंकळ्ळीत आता अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडायला लागली आहेत. राज्य पोलिस दलातून पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून सेवा निवृत्त झालेले दोघे कुंकळ्ळीचे सुपुत्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार, अशी चर्चा आहे. सेवा निवृत्त ‘एसपी’ टोनी फर्नांडिस व सेवा निवृत्त एसपी सॅमी तवारीस हे विद्यमान आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्या विरोधात निवडणूक लढणार अशी चर्चा रंगत आहे. तसे दोघांनाही कुंकळळीत मोठे समर्थन आहे. सर्व जाती धर्मात स्वीकृत असलेल्या या दोघांपैकी एक जरी मनापासून निवडणुकीत उतरला तर येणाऱ्या निवडणुकीत चांगली लढाई पाहायला मिळू शकते. मात्र, त्यासाठी भूतकाळाच्या कर्तृत्वावर निर्भर राहून चालणार नाही, मैदानात उतरायला लागेल, असे लोक म्हणू लागलेत. आता पाहूया ‘रिटायर एसपीं’ चे वलय राजकारणात चालते की नाही? ∙∙∙

फोंड्यात ‘कांटे की टक्कर’?

विधानसभा निवडणुकीला सव्वा वर्षे असले तरी फोंडा मतदारसंघात ‘कांटे की टक्कर’ होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. वाढदिवसाला झालेली प्रचंड गर्दी पाहून या मतदारसंघातील एक इच्छुक उमेदवार विश्वनाथ दळवी हे सध्या आकाशात विहार करत असून त्यांचे कार्यकर्ते दळवी हेच फोंड्याचे भावी आमदार असे सांगताना दिसू लागलेत. दुसऱ्या बाजूला ‘मगो’ नेते केतन भाटीकर हेही आपल्या परीने प्रयत्न करताना दिसताहेत. सध्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी आपली अस्त्रे बाहेर काढली नसली तरी ते परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलताहेत. या तीव्र स्पर्धेमुळे प्रत्येक मताला महत्व प्राप्त झालेय एवढे खरे. त्यामुळे मतदारांची आवक-जावक आतापासूनच सुरू झाली असून ‘कभी आर, कभी पार’ अशी स्थिती दिसत आहे. आता कोणाची नाव किनाऱ्याला लागते, हे कळायला थोडा अवधी असला तरी तर्क-वितर्क ना सध्या फोंडा शहरात ऊत आलाय.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

गणेश गावकर समर्थक जोशात

सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचे समर्थक सध्या जोशात आहेत. मंत्रिमंडळ फेररचनेत गावकर यांना महामंडळाच्या अध्यक्षपदावरून थेट मंत्रिपदी बढती मिळू शकते, असे त्यांना वाटते. मतदारसंघातील सरपंच, पंचांनी तशी थेट मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर त्यांनी त्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते. त्याची आठवण मुख्यमंत्र्यांना असेल आणि याखेपेला ते भाऊंना मंत्री करतील असे त्यांना वाटते. धारबांदोडा तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान त्यांच्या रुपाने मिळावे असे अनेकांना वाटते. त्यासाठी गोविंद गावडे या आदिवासी मंत्र्याला वगळल्यानंतर त्या जागी आदिवासी समाजाचेच असलेल्या गावकर यांना संधी द्यावी, असाही युक्तिवाद ऐकू येत आहे.

कोण ही भाजपची स्टार रानीया!

‘नशिबाने खावे’ असा एक शब्द प्रयोग आहे. काही लोक एवढे नशिबवान असतात की, कष्ट न करताच त्यांच्या मागे यश आपणहून धावून येते. कुंकळ्ळी मतदार संघातील रानीया नावाची अशीच एक युवा पंच सदस्य भाजपच्या स्टार कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत. या मॅडम माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर सत्तेत असताना कवळेकर यांच्या कार्यालयात काम करीत होत्या. बाबूंच्या आशीर्वादाने त्या पंचसदस्य बनल्या. एवढेच काय भाजपात प्रवेश केल्यावर एका वर्षात रानीया मॅडमची भाजपच्या राज्य प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली. आता मॅडम म्हणे ‘झेडपी’च्या निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी करीत आहेत.त्यांनी बाबू कवळेकर यांच्या माजी ‘पीए’ला कामावर ठेवले आहे. मॅडम रानीया भाजपात एवढ्या मोठ्यावर कशा पोहचल्या? याचाच विचार निष्ठावान भाजप कार्यकर्ते करताहेत.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: अमित पाटकर इफेक्‍ट?

कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

मंत्रिमंडळ फेररचनेत कोणाचा पत्ता कट आणि कोणाला संधी याविषयी राजकीय वर्तुळातच नव्हे राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री आज दिल्लीतून आल्यावर कोणाला भेटतात याकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पंचायत निवडणूक, पालिका निवडणूक, जिल्हा पंचायत निवडणूक आचारसंहितेच्या काळात कामे करण्यास मर्यादा येतील. यामुळे दीड वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत किती वेळ कामासाठी मिळतील असा हिशेब काहींनी घालणे सुरू केले आहे. तूर्त मंत्रिपद नसल्याच बरे, २०२७ मध्ये राजकीय समीकरणे जुळवून आणू आणि चांगले पद मिळवू असा हिशेबही घातला जात आहे. त्यामुळे मंत्रिपद न स्वीकारणारेही काही असू शकतात, अशी चर्चा आहे.

‘त्या’ पोलिसांची बदली...

पर्यटकांच्या सुरक्षेतेसाठी तैनात काही आयआरबी (राखीव पोलीस बळ) पोलिसांकडून किनार्‍यांवर जी-पे चा वापर होऊ लागल्याची चर्चा पोलीस खात्यात होती. उत्तरेतील किनारी भागात उल्लंघनाच्या नावाखाली पर्यटकांकडून गुगल-पे द्वारे रक्कम वसूल करण्याचे सत्र आयआरबी पोलिसांनी राबवले होते. यातील काही पोलिसांची अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित उल्लंघनकर्त्यांची दक्षिण गोव्यात बदली करण्यात आली आहे. वरील हे काही बेशिस्त आयआरबी पोलिसवाल्यांनी भीतीविना किनारपट्टीवर मिळेल त्या पर्यटकांना लुबाडण्याचे सत्र अवलंबविल्याने गोव्याची प्रतिमा मलिन होत होती. मात्र, या बदलीनंतर अशा बेशिस्त पोलिसांना काहीप्रमाणात शिस्तीचे धडे मिळाले असतील, अशी अपेक्षा आहे.

कावळ्यांपेक्षा कबुतरांची संख्या जास्त!

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी एक शोध लावला असून त्यांच्या मते गोव्यात कावळ्यांपेक्षा कबुतरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता श्राद्धाला सुद्धा कावळे मिळेनासे झालेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आसामींना गोव्यात संरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा केल्यानंतर सरदेसाई यांनी वरील शोधाची माहिती पत्रकारांना दिली. कबुतरे घराबाहेरील वातानुकूलन बॉक्सवर बसतात, त्यामुळे त्यातून खोलीत दूषित हवा येत असते, असेही सरदेसाई सांगतात. मुंबई मनपानेही ६० कबुतर खाने बंद केलेत. पण गोव्यात आता कबुतरे वाढलीत. एकदा बादशाहाने बिरबलाला विचारले आमच्या राज्यात किती कावळे आहेत?. तेव्हा बिरबलाने सरळ एक आकडा सांगितला. बादशाहलाही आश्र्चर्य वाटले की, बिरबलाने राज्यातील कावळेही मोजून ठेवलेत. बादशाहाने राज्यातील कावळे मोजण्याचे फर्मान सोडले. तेव्हा लगेच बिरबलाने सांगितले, जर आपण सांगितलेल्या संख्येपेक्षा कावळे जास्त झाले, तर ते बाहेर गावातून आल्याचे समजावे. जर कमी आढळले, तर आमच्या राज्यातील कावळे दुसऱ्या राज्यात गेलेत असे समजावे, यावर बादशाहा काय बोलणार! मात्र विजयबाबने उल्लेख केल्याप्रमाणे गोव्यातील कबुतरे कोण व कावळे कोण, हे स्पष्ट होत नाही, व ते शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले पाहिजेत म्हणे! ∙

मुंडकार वर्ग २ चे मानकरी!

आजवरच्या सरकारांनी कुळ मुंडकार कायद्याची किती प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली हे खटल्यांची तुंबलेली संख्याच सांगते. मुंडकार कायद्याखाली घर आणि घराखालील जमिनीची मालकी अर्जदाराला मिळते. मात्र तो वर्ग २ चा मालक बनतो. याचा अर्थ मालकी सरकारची असते आणि ताबा अर्जदाराचा असतो. अशा जमिनींचा व्यवहार वर्ग २ चा मालक करू शकत नाही. सरकारने अलिकडे मंजूर केलेल्या विधेयकांनुसार कोमुनिदाद व सरकारी जमिनींवरील अतिक्रमण केलेल्यांना वर्ग १ ची मालकी मिळणार आहे. त्यामुळे त्या जमिनी ते सरकारच्या परवानगीविना उद्या विकू शकतील. मुंडकाराला तसे करता येणार नाही. मात्र अतिक्रमण करणाऱ्यांवर सरकार मेहरबान झाल्याने त्यांना थेट मालकी मिळणार आहे. त्यामुळे मुंडकारांनी सरकारचे काय घोडे मारलेय, अशी विचारणा खासगीत का होईना होऊ लागली आहे.

इजिदोर फर्नांडिस मैदानात !

राजकारण हे व्यसनासारखे असते. एकदा राजकारणात पडल्यावर ते सोडणे अशक्य बनते. काणकोण मतदारसंघाचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस हे राजकारणातून दीर्घ रजेनंतर पुन्हा राजकीय आखाड्यात उतरलेत.जिल्हा पंचायत निवडणूक जवळ आली असून इजिदोर आपल्या समर्थकांना झेडपी निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यासाठी सज्ज झाले आहेत. इजिदोर यांनी काणकोण मतदारसंघातील गांवडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले. सभापती रमेश तवडकर यांचा एक राजकीय शत्रू सक्रिय झाला, आता पुढे पाहू इजिदोर रमेश सरांना कोणत्या प्रकारचे आव्हान देतात. एक मात्र खरे, राजकारणी कधी म्हातारा होत नाही!

मंत्रिमंडळ फेरबदलाची कथा

मंत्रिमंडळ फेरबदल होणार, असे सांगणारी व्यक्ती राज्यात कुठेही भेटते. मात्र तो कधी होणार हे कोणीच सांगू शकत नाही. शपथविधी सोहळ्याची तयारी सरकारचा सर्वसाधारण प्रशासन विभाग करतो. त्यासाठी मुख्य सचिवांना मंत्री नियुक्तीचा आदेश वाचण्याची भूमिका असते. हा विभाग असो किंवा मुख्य सचिव दोघेही मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अंधारात आहेत. राजभवनावर शपथविधी होणार असल्याची पूर्वकल्पना आधी दिली जाते. राज्यपालांच्या कार्यक्रमात आवश्यक ते फेरबदल करण्यासाठी ती सूचना असते. तशी सूचना अद्याप राजभवनावर गेलेली नाही. असे असतानाही कोण मंत्री होणार याच्या चर्चेने मात्र करमणूक होणे थांबलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com