Samuel Braganza Dainik Gomantak
गोवा

Samuel Braganza Case: सॅम्युअल आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! तपासाभोवती संशयाचे दाट धुके, 'देशी कट्टा' आणि अडीच तासांचे गूढ; म्हापसा पोलिसांची कोंडी!

samuel braganza suicide case: गावसावाडो-म्हापसा येथील २२ वर्षीय सॅम्युअल ब्रागांझा या युवकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असली, तरी या प्रकरणाभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: गावसावाडो-म्हापसा येथील २२ वर्षीय सॅम्युअल ब्रागांझा या युवकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असली, तरी या प्रकरणाभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र तपास करणारे पोलिस अधीक्षक विश्‍वेश कर्पे यांच्यासमोर अनेक अनुत्तरीत आणि गूढ प्रश्‍नांची उकल करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सॅम्युअलच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या अंतर्गत चौकशीला वेग आला असून, गेल्या दोन दिवसांपासून म्हापसा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांच्यासह घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या सर्वच पोलिसांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस अधीक्षक कर्पे हे आपल्या दालनात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत, प्रत्येक अधिकाऱ्याची वैयक्तिकरीत्या उलटतपासणी घेऊन स्वतः त्यांचे जबाब नोंदवून घेत आहेत. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही ही प्रक्रिया सुरू होती, तर म्हापसा पोलिस निरीक्षकांची चौकशी सगळ्यात शेवटी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, सॅम्युअल कचरा फेकत असल्याचा कथित व्हिडिओ नेमका कोणी चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर (Social Media) का व्हायरल केला? यामागचा मुख्य सूत्रधार अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. संबंधित व्यक्तीचे सॅम्युअलसोबत काही जुने वैर होते का, यादृष्टीनेही तपास केला जात आहे. दुसरीकडे, पोलिस ठाण्यात सॅम्युअलला कशी वागणूक देण्यात आली, हा या प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा ठरत आहे.

पोलिस ठाण्यातून घरी परतल्यानंतर अवघ्या अडीच तासांच्या आत सॅम्युअलने हे टोकाचे पाऊल उचलले; त्यामुळे या अडीच तासांच्या कालावधीत नेमके काय घडले आणि त्याच्या मानसिकतेत इतका टोकाचा बदल कसा झाला, हा तिसरा गंभीर प्रश्न आहे. त्यातच, आत्महत्येसाठी वापरलेले पिस्तूल त्याच्याकडे कुठून आले, हाही मोठा प्रश्न असून पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हे पिस्तूल बेकायदेशीर असलेला एक ‘देशी कट्टा’ आहे, ज्यामुळे परवान्याचा प्रश्नच उद्भवत नाही. घटनेच्या दिवशी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नसून, त्यांची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘सीसीटीव्ही’ फुटेज ठरेल महत्त्वाचा व निष्पक्ष दुवा

‘आम्ही सॅम्युअलला मारहाण किंवा शिविगाळ केली नाही,’ असा दावा पोलिसांकडून केला जात असला, तरी सॅम्युअलच्या उजव्या डोळ्याभोवती आलेली सूज नक्की कशामुळे होती, हा संशय कायम आहे. त्यामुळे पोलिसांच्या दाव्यातील सत्यता पडताळण्यासाठी पोलिस ठाण्यातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज हाच सर्वात महत्त्वाचा आणि निष्पक्ष दुवा ठरणार आहे.

पोलिस अधीक्षक भेटणार सॅम्युअलच्या कुटुंबीयांना

पोलिस अधीक्षक विश्‍वेश कर्पे हे येत्या एक-दोन दिवसांत सॅम्युअलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन चौकशी करणार आहेत. आता या सखोल तपासातून सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT