म्हापसा: हडफडे आणि कळंगुट येथील आस्थापनांच्या डिजिटल बोर्डवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे स्क्रोलिंग करणारे घोषवाक्य झळकल्याने मंगळवारी रात्री या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी एकूण ९ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते.
हडफडे येथील ‘व्हिस्की-पीडिया’ या नावाने असणारी वाईन शॉपी ही गुडगाव, हरियाणा येथील रवी नामक व्यक्तीची आहे. गेल्या ४ वर्षांपासून त्यांनी ती भाडेतत्वावर चालवण्यास घेतली.
येथे झळकलेल्या बोर्डप्रकरणी हणजूण पोलिसांनी आस्थापनातील कर्मचारी रचित भाटीया (हरियाणा), विपीन पहुजा (हरियाणा), विनय चंद्रा राव (कर्नाटक), कृष्णा लमाणी (कर्नाटक) व मनोज कुमार (बिहार) यांच्याविरुद्ध तर सावतावाडो-कळंगुट येथे ‘न्यू रिवाइव्ह युनिसेक्स सलून’ चे कर्मचारी संशयित मोहम्मद फरहान (२५, उत्तर प्रदेश), नौषाद (३५, दिल्ली), मोहम्मद शवेज (२१, उत्तर प्रदेश), राकेश दास (४९, कळंगुट) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
आस्थापने केली बंद
पोलिसांच्या मतानुसार, डिजिटल बोर्ड हॅक करता येऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असल्याने छेडछाड होण्याची दाट संभावना आहे. सध्या सर्व संशयितांची चौकशी केली जात आहे. वरील दोन्ही आस्थापने ही बंद ठेवून, डिजिटल बोर्डचे कनेक्शन कापले आहे.
लोबो काय म्हणाले..
पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीचा प्रकार निंदनीय तसेच मुद्दामहून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सिस्टीम हॅक केल्याने हा प्रकार घडला आहे. आपण संबंधित दुकानमालकांना सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितली अाहे.
बोर्डशी छेडछाड...
याविषयी सायबर तज्ज्ञ निखिल माळगी यांना विचारले असता, ते म्हणाले की, इंटरनेटशी डिजिटल साईनबोर्ड कनेक्ट किंवा वाय-फायशी जोडलेला असेल तर डिजिटल बोर्ड हॅक करता येऊ शकतो. पण, पेनड्राइव्हच कनेक्ट करुन (जाहिरात) स्क्रोलिंग होत असेल, तर हॅक करणे अवघड आहे. तरीही पेनड्राइव्ह वैयक्तिकरित्या हाताळून यात छेडछाड करता येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.