Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

Goa Crime News: उमाकांत खोत (वय ६४) या ज्येष्ठ नागरिकाला डोंगर कापणीच्या वादातून जीव गमवावा लागला.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणेतील रेती उपसा गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच वरचावाडा - मोरजी येथील सत्पुरुष मंदिराच्या मागे भर दुपारी उमाकांत खोत (वय ६४) या ज्येष्ठ नागरिकाला डोंगर कापणीच्या वादातून जीव गमवावा लागला. या घटनेमुळे मोरजीसह राज्यात खळबळ निर्माण झाली आहे.

डोंगर कापणी होत असल्याचे आढळून आल्यानंतर उमाकांत यांनी दूरध्वनीवर आपल्या भाच्याला खबर दिली, भाच्याने नगरनियोजन खात्याकडे तक्रार करू, असे सांगितल्यानंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यातच उमाकांत यांचा मृत्यू झाला, असा दावा भाचा समीर गावडे यांनी केला आहे.

मारहाणीची ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णवाहिकेतून खोत यांना तुये येथील सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्‍यू झाला होता. त्यांचा मृतदेह म्हापसा येथील आझिलो हॉस्पिटलमध्ये आणि नंतर वैद्यकीय तपासासाठी गोमेकॉत पाठविण्यात आला.

Goa Crime News
Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

उमाकांत खोत यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाकांत हे आपल्या जमिनीची नियमितपणे पाहणी करत होते. खोत हे सायकलनेच त्या जमिनीत जात, सायकल ठेवत व डोंगर चढत. आजही ते दुपारी १.३० वाजता ते पाहणीसाठी गेले होते.

तिथे जेसीबीद्वारे काम सुरू असल्याचे आढळल्यानंतर त्यांनी पणजीतील आपल्या भाच्याला दूरध्वनीवरून याची माहिती दिली. त्यानंतर भाच्याने आपण नगरनियोजनकडे तक्रार करतो, तुम्हीही करा असे सांगितले. डोंगर कापणी करणाऱ्यांना खोत यांनी जाब विचारल्यावरून ही मारहाण झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

या मालमत्तेत ते कूळ आहेत. या ठिकाणी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने डोंगर कापणी होते, अशा अनेक तक्रारी त्यांनी नगरनियोजन खात्याकडे केलेल्या होत्या. विशेष म्हणजे, खोत हे जखमी अवस्थेत आढळले. त्या ठिकाणाजवळच जेसीबीद्वारे काम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. तेथे संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू होते आणि पंचायत तसेच नगरनियोजन खात्याच्या परवानगीचा फलकही लावण्यात आलेला आहे.

दरम्यान, मांद्रे पोलिसांनी पुरावे मिळवण्यासाठी परिसराची पाहणी केली. पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्यासह उपअधीक्षक सलीम शेख व त्यानंतर अधीक्षक राहुल गुप्ता हेही घटनास्थळी दाखल झाले होते.

Goa Crime News
Goa Accident Deaths: चिंताजनक! गोव्‍यात 308 दिवसांत तब्‍बल 216 जणांचे बळी; अपघाती मृत्यूंची वाढती संख्या

तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’

पोलिस जोपर्यंत संशयितांना अटक करत नाहीत, तोपर्यंत उमाकांत यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला आहे. या प्रकरणात १४ कामगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी आरंभली असली, तरी परप्रांतीय कामगारांनी केलेल्या मारहाणीत खोत मरण पावल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

उमाकांत खोत हे ज्या जमिनीमध्ये कुळ म्हणून होते. ती जमीन रोहिदास जोशी यांच्या मालकीची आहे. त्याचा अर्धा भाग त्यांनी दिल्लीवाल्यांना विकलेला आहे. १/१४ उताऱ्यावर कुळ म्हणून नोंद असल्याने खोत यांचा जमीन विकण्यास विरोध होता. पूर्वजांनी सांभाळून ठेवलेली जमीन पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवावी. त्या नजरेतून ते काम करत होते.

मोरजी परिसरातील डोंगर माळराने मोकळ्या जमिनी मोठ्या प्रमाणात बिगरगोमंतकीय दिल्लीवाल्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे दिल्लीवाल्यांचे मोरजीत वर्चस्व वाढलेले आहे.या जमिनींमध्ये जो कोणी इतर हस्तक्षेप करत असेल, त्या ठिकाणी प्रतिकारासाठी बाउन्सर तैनात असतात. या बाऊन्सर्सकडून स्थानिकांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत.

जमिनीच्या वादातून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू होण्याची ही मोरजीतील पहिलीच घटना आहे. त्यामुळे स्थानिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी राहुल गुप्ता यांनी तपास सुरू आहे, पुरावे हाती आल्यानंतर संशयितांना जेरबंद करू, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com