मांद्रे अपघात प्रकरणावर गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. संशयिताने महिलेचा जीव घेतला आणि हे त्यांनी मुद्दाम केले असे आरोप खुलेआम लोकांनी पोलिस स्थानकासमोर उभे राहून केले. त्यानंतर संशयिताला अटक झाली खरी, पण त्याच्यावर फक्त ‘अपघात’ म्हणूनच खटला दाखल झाला. त्यामुळे ‘गाडीचा ब्रेक फेल झाला की व्यवस्थेचाच ब्रेक फेल आहे?’ असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. गावकरी म्हणतात की, ‘हा अपघात नव्हता, हा जाणूनबुजून केलेला खून आहे!’ पण कायदेशीर कागदांमध्ये मात्र वेगळेच काही लिहिले जात आहे. आता लोकांना वेगळ्याच गोष्टीची शंका येऊ लागली आहे – ‘या दिल्लीवाल्याला वाचविण्यात कुणाचा तरी हात आहे!’ यात ‘हात कोणाचा?’ हा शोध सुरू असतानाच, आमदार मात्र या प्रकरणावर जाहीररीत्या काही बोलत नाहीत. त्यामुळे लोकांच्या नजरा आता त्यांच्या दिशेने वळू लागल्या आहेत. ‘आमदार गप्प का?’ हा चर्चेचा नवा विषय बनला आहे. ∙∙∙
गोवा सरकारने भाविकांसाठी खास रेल्वेसेवा उपबल्ध केली. तिसरी रेल्वेगाडी शुक्रवारी मडगावातून रवाना झाली. काही अतिउत्साही भाविकांनी पासविनाच थेट डब्यात प्रवेश केला आणि प्रयागराज स्नानाचे स्वप्नही रंगवले. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसल्याने आपलीच गैरसोय होईल, असे लक्षात आल्यानंतर या अतिउत्साही भाविकांनी रत्नागिरीतूनच ‘प्रयागराज’ला हात जोडला आणि गोव्यात परतले. कारण रेल्वेत पासधारकांनाच खाण्यापिण्याची सोय केली होती, बसायला आसन होते. विना पासधारक रेल्वेत चढलेल्यांना आपली सर्वप्रकारची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी रत्नागिरीत उतरून पुन्हा गोवा गाठला. जे भाविक परतले ते कोण, याची चर्चा आता सुरू झाली आहे. चला प्रयागराजला, चला प्रयागराजला म्हणत रेल्वेत चढणारी ही मंडळी नेमकी कुठली, याचाही शोध सुरू आहे. ∙∙∙
मागच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला कुणीही खिजगणतीत घेत नव्हते, तरीही या पक्षाने आपले दोन आमदार गोव्यातून निवडून आणले. सध्या दिल्लीत आम आदमी पक्षाचे पानिपत झालेले असताना आम आदमी पक्षाने गोव्यात आपले लक्ष्य केंद्रीय केले आहे. यासाठी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांना त्यांनी गोव्यात उतरविले आहे. एका बाजूने काँग्रेस पक्ष आम आदमी पक्षाची युती नको अशी भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूने ‘आप’ आक्रमकपणे गोव्यात आपला विस्तार करत आहे. ‘आप’च्या या वावटळीसमोर काँग्रेस तग धरणार का? हाच सध्या प्रश्न विचारला जात आहे. ∙∙∙
गिरीश चोडणकर यांचा काँग्रेस पक्षातील प्रवास चढत्या क्रमाने चालू आहे. सध्या ते तमिळनाडू आणि पुडुचेरी काँग्रेस निरीक्षक म्हणून काम पाहतात. इंदिराभवन या दिल्लीतील नव्या कार्यालयात त्यांनी आपले बस्तान मांडले आहे. गोव्यातील काँग्रेस पक्षाचे काय झाले हे कोणाला माहीत नाही. हा पक्ष सध्या गोव्यात विचित्र अवस्थेत आहे. हा पक्ष पुढच्या दोन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा उभा राहू शकेल काय, याबद्दलही संशय आहे. तरीसुद्धा गिरीश यांंचा क्रम चढत्या क्रमानेच आहे. त्यांना गोव्याचे किती सोयरसुतक आहे हे कळत नाही. त्यांच्याकडे आता जबाबदारी आहे ती पुडुचेरी आणि तमिळनाडूची. ∙∙∙
नदी परिवहन खाते असो वा बंदर कप्तान खाते. सर्वांचे उद्दीष्ट एकच व ते म्हणजे खात्यासाठी मंजूर निधी संपवून कसा टाकायचा हाच असतो की काय अशी शंका आता सर्वसामान्यांना यायला लागली आहे. त्यात वरील दोन खाती अग्रेसर असतात की काय असे दिसते. मागे म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्यात सौर ऊर्जेवर चालणारी फेरीबोट येथील जलमार्गावर आणावी असे वाटले व लगेच ती खरेदी केली. तीही थोडीथोडकी नव्हे, तर दीड दोन कोटी खर्च करून. ती येथे आणली, पण येथील जलमार्गांवर व धक्क्यांवर ती सुयोग्य नसल्याचे आढळल्यावर ती तशीच पडून आहे. तशीच कल्पना कॅप्टन ऑफ पोर्टच्या डोक्यात शिजली व त्यांनी बेकायदा रेती उपसा करणाऱ्या होड्या पकडून त्या ओढून आणण्यासाठी दीड कोटी खर्चून एक टगबोट आणली, पण प्रत्यक्षात बेकायदा रेती काढणारी एकही होडी काही या टगने ओढून आणली नाही की बंद पडलेल्या फेरीबोटी ओढून आणल्या नाहीत. गेली आठ वर्षे ती गंजून सांकवाळ येथील खासगी यार्डात पडून आहे. आता तिचा भंगारात लिलाव केला जाणार आहे. हा लिलावसुध्दा सरकारच्या की कोणा हितसंबंधीचा फायदा लक्षात ठेवून केला जाणार अशी चर्चा सरकारी पातळीवरच सुरू आहे. दोन नव्हे, तर तीन दशकांमागे जी सुडाने असेच एक रस्ता सफाई यंत्र काही कोटींना खरेदी केले होते. ते मडगावात पडून होते, शेवटी ते वापर न होता भंगारात विकले गेले, यालाच म्हणतात सरकारी कारभार. ∙∙∙
राजधानी पणजीत मागील काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या आहेत. परंतु काही अनुचित निर्णयामुळे ही सेवा पांढरा हत्ती ठरत आहे हे वास्तव आहे. जेव्हापासून बसमधील वाहक कमी करून स्मार्ट कार्डचा वापर सुरू करण्यात आला आहे, तेव्हापासून बसमधील प्रवासी कमी होत आहेत. प्रवासी कमी झाल्याने अनेक बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगायची वेळ येत आहे. वाहकविरहित बस केल्याने पणजीतील ही बससेवा ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशीच अवस्था झाली आहे. ∙∙∙
दामू नाईक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या घरी लोकांच्या झुंडी पडू लागल्या आहेत. अर्थातच त्यामागे येनकेन प्रकारे आपले कल्याण व्हावे ही भावना आहे हे सांगण्याची गरज नाही. यापूर्वी भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी दामू नाईक यांना अक्षरशः वाळीत टाकले की काय अशी स्थिती होती. मात्र, आता यातील काहीजण हळूहळू त्यांच्या घरी भरणाऱ्या गर्दीत दिसू लागले आहेत. दामू नाईक यांच्या घरी जी सध्या गर्दी उसळते, ती पाहिल्यास त्यांच्या घरी दरबार भरला आहे असे कुणाला वाटावे. याला आता काळाची गती म्हणायचे का? ∙∙∙
गोव्यात आरटीओ म्हणजेच वाहतूक खाते आहे, पण चिमुकल्या गोव्यात मिनिटामिनिटाला वाहतुकीचे म्हणजेच वाहतूक नियमांचे जे सर्रास उल्लंघन होते, त्याचे कोणालाच पडून गेलेले दिसत नाही. प्रत्येक तालुक्यात आता त्या खात्याची कार्यालये आहेत, पण त्यांचा उपयोग काय अशी विचारणा प्रत्येकजण करतो. गोव्यात ‘रेंट अ कॅब’ व ‘रेंट अ बाईक’ ही मंडळी जो धुमाकूळ घालतात तो आज कालचा नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधितांना २०२५ साल उजाडावे लागले. संचालकांनी केवळ नियमांचे परिपत्रक जारी केले आहे, कारवाई सुरू केलेली नाही. या वाहनांना व्यवसायासाठी विशिष्ट जागा दिलेल्या असतात, पण प्रत्यक्षात ती वाहने संपूर्ण गोवाभर फिरतात म्हणजेच व्यवसाय करत असतात. मडगावात तर काही ठिकाणी एकाच जागी पंचवीस तीस ‘रेंट अ कॅब’ उभ्या केलेल्या असतात व त्यांची नोंदणी मडगावची नसते तर उत्तर गोव्यातील असते. मडगावातील आरटीओच्या नजरेस हे कसे काय पडत नाही रे भाऊ. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.