

IndiGo Share Market Loss: देशातील सर्वात मोठी लो कॉस्ट एअरलाइन असलेल्या इंडिगोला सध्या पायलट आणि क्रू मेंबर्सच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या गंभीर कारणामुळे एअरलाइनला देशभरातील 200 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. मात्र कंपनीने घेतलेला हा निर्णय शेअर बाजारात चांगलाच महागात पडला.
या घटनेमुळे गुरुवारी (4 डिसेंबर) झालेल्या व्यवहारादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक घट दिसून आली. परिणामी, कंपनीचे बाजारमूल्य एका दिवसात 7 हजार 160 कोटी रुपयांनी कमी झाले. नोव्हेंबर महिन्यातही कंपनीला अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून ही समस्या इतकी वाढली की, नागरी उड्डाण महासंचालनालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. डीजीसीएने कंपनीकडून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण मागवले असून, पीक सीझनमध्ये आपले कामकाज व्यवस्थित सुरु ठेवण्यासाठी कंपनीची काय योजना आहे, याचा एक प्लॅन देखील मागितला.
बीएसईच्या आकडेवारीनुसार, इंडिगोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर 3.30 टक्क्यांच्या घसरणीसह 5407.30 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. एक दिवस आधी कंपनीचा शेअर 5592.50 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीच्या शेअर्समधील घसरणीमुळे इंडिगोच्या बाजारमूल्यात मोठी घट झाली. आदल्या दिवशी कंपनीचे बाजारमूल्य 2,16,200.51 कोटी रुपये होते, ते गुरुवारी व्यवहारादरम्यान 2,09,040.86 कोटी रुपये झाले. याचा अर्थ कंपनीला एकाच दिवसात 1760 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.
जाणकारांच्या मते, जोपर्यंत एअरलाइनच्या ऑपरेशनमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत कंपनीच्या शेअर्सवर दबाव कायम राहू शकतो. कंपनीचा शेअर 18 ऑगस्ट रोजी 52 आठवड्यांच्या उच्चांकावर (6,225.05 रुपये) पोहोचला होता, तेव्हापासून त्यात 13 टक्क्यांहून अधिक घट झाली.
गुरुग्राम स्थित इंडिगो एअरलाइन आपल्या पायलटांसाठी असणाऱ्या 'फ्लाइट ड्यूटी आणि विश्रांती कालावधीच्या' नवीन नियमांमुळे आवश्यक क्रू सदस्यांची व्यवस्था करण्यासाठी संघर्ष करत आहे. या समस्येमुळे इंडिगोने गुरुवारी मुंबई, दिल्ली आणि बेंगळूरू या तीन प्रमुख विमानतळांव्यतिरिक्त देशातील उर्वरित शहरांमधून 200 हून अधिक उड्डाणे रद्द केली. मुंबई विमानतळावर रद्द झालेल्या विमानांची संख्या 86 होती. बंगळूरुमध्ये 41 आगमन विमानांसह 73 उड्डाणे रद्द झाली. तर दिल्ली विमानतळावरही 33 विमाने रद्द करण्यात आली.
एअरलाइनच्या अडचणी वाढण्याचे मुख्य कारण फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिट नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी असल्याचे सांगितले जात आहे. एफडीटीएल नियमांमुळे क्रू सदस्यांना कामाच्या दरम्यान योग्य विश्रांती देणे बंधनकारक झाले, ज्यामुळे कंपनीला आवश्यक क्रूची तीव्र कमतरता जाणवत आहे.
इंडिगोच्या 'ऑन-टाइम परफॉर्मन्स' म्हणजे वेळेत उड्डाण आणि आगमन करण्याच्या कामगिरीमध्ये मोठी घसरण झाली. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळूरु आणि हैदराबाद या सहा प्रमुख विमानतळांवर 3 डिसेंबर रोजी ओटीपी केवळ 19.7 टक्क्यांपर्यंत खाली आला. 2 डिसेंबर रोजी हा आकडा 35 टक्के होता. पायलट आणि क्रूच्या कमतरतेमुळे उड्डाणे रद्द होत असल्याने आणि वेळेवर चालत नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. डीजीसीएच्या हस्तक्षेपाने कंपनीला लवकरच ठोस योजना सादर करावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.