

हणजूण: गोवा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या पथकाने एका तरुणाकडून तब्बल 7 लाख 90 हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित 'एलएसडी' (LSD) नावाचे सायकोट्रॉपिक ड्रग्ज जप्त केले. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी गोवा आणि महाराष्ट्रातील कनेक्शन असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाला अटक केली.
हणजूण (Anjuna) पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एनडीपीएस (NDPS) अधिनियम 1985 च्या कलम 22(C) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.50 ते पहाटे 3.40 या वेळेत शिवोलीतील फुटबॉल मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली.
पोलिसांनी संशयित आरोपी साहिल कोरगावकर याच्या ताब्यातून प्रतिबंधित सायकोट्रॉपिक ड्रग्ज असलेले 316 पेपर ब्लॉट्स जप्त केले. या 'एलएसडी' नावाच्या ड्रग्जचे वजन 6.52 ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अंदाजित किंमत 790000 आहे. हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक असून तरुणांमध्ये त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. पोलिसांना हे ड्रग्ज आरोपी साहिल कोरगावकर याच्याकडे असलेल्या लाल रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो कारमध्ये सापडले. आरोपी साहिल कोरगावकर (वय 25 वर्षे) हा मूळचा रत्नागिरी येथील रहिवासी आहे.
आरोपी साहिल कोरगावकर याला वरील गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली. आरोपीकडे ड्रग्ज सापडल्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. एनडीपीएस ॲक्टच्या कलम 22(C) अंतर्गत मोठ्या प्रमाणातील ड्रग्ज बाळगल्याबद्दल कठोर शिक्षेची तरतूद आहे. पोलिसांनी या संपूर्ण कारवाईदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले असल्याचे स्पष्ट केले. या गंभीर गुन्ह्याबाबत रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर हे या प्रकरणाचा तपास अधिकारी आहेत.
गोवा (Goa) हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी ड्रग्जच्या तस्करीमुळे या राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पर्यटन हंगामात हणजूण पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत ड्रग्ज माफियांना मोठा इशारा दिला. आरोपी साहिल कोरगावकरचा महाराष्ट्रातील नेमका व्यवसाय काय आहे आणि हे ड्रग्ज तो कोणत्या पार्टी किंवा व्यक्तींना विकणार होता, या सर्व बाजूंनी पोलीस कसून तपास करत आहेत. या रॅकेटचे जाळे तोडण्यासाठी अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.