
पणजीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, डेव्हलपर १० मीटर रस्त्याचे आश्वासन देतात आणि नगरनियोजन खात्याकडून परवानगी घेतात, पण नंतर अतिक्रमण करून फक्त ३ मीटरच सोडतात! मुख्यमंत्री स्वतःच हे बोलून गेले आणि राज्यभर चर्चेला तोंड फुटले! मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हे माहीत आहे, म्हणजे नगरनियोजन विभाग काय चालवतोय हे कळतंय... मग कारवाई कोण करणार? लोकांनी घाबरू नये म्हणायचं, पण मग तुम्हीच कुणाला तरी घाबरताय का? असा उलट प्रश्न आता लोक उपस्थित करू लागले आहेत. रस्ते लहान, अतिक्रमण मोठे आणि सरकार डोळे मिटून बसले? असा सवाल लोक करत आहेत. राज्यातील ही चर्चा आता ‘आम्ही काही करू शकत नाही, पण तुम्ही घाबरू नका!’ अशा मिस्कील वळणावर येऊन ठेपली आहे. बघुया, पुढे काय होतं! ∙∙∙
शिगमा सरला तरी कवित्व उरते असे म्हणता ते खरे. महाकुंभ मेळाव्याला आपल्या देशातील जवळ जवळ पन्नास कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. यात गोव्यातून हजारो सनातनी होते. सरकारच्या खर्चाने रेल्वेने प्रयागराजला गेलेले भाजपाचे कार्यकर्ते होते, आपल्या स्वतःच्या खर्चाने गंगेत डुबकी मारणारे सनातनी होते आणि जनतेच्या पैशाने म्हणजे सरकारी पैशाने खास विमानातून गेलेले राजकीय अतिमहनीय होते. ज्या विमानाने राज्यपालांचे कुटुंब, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचे कुटुंब होते व काही पत्रकार व अधिकारीही होते. मात्र, प्रयागराजला चर्चा रंगली ती त्या तिसऱ्या व्हीव्हीआयपी गाडीत बसलेल्या खास कुटुंबाची. विमानातून गंगासंगम घाटावर जाण्यासाठी तीन खास गाड्या होत्या. एका गाडीत राज्यपालांचे कुटुंब, एका गाडीत मुख्यमंत्र्याचे कुटुंब, तर तिसऱ्या गाडीत मंत्री, आमदार किंवा कोणतेही पद नसलेले एक खास कुटुंब होते. जी सेवा मंत्र्यांना व मोठ्या अधिकाऱ्यांना मिळाली नाही, ती राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या ओळीत सेवा भोगणारे ते कुटुंब कोण? यावर आजही चर्चा रंगत आहे. ∙∙∙
कर्नाटकातील स्थलांतरित कामगारांना गोवा सरकारने संरक्षण द्यावे म्हणून त्या राज्याचे कामगार कल्याणमंत्री संतोष लाड यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन जी विनंती केली, त्यामुळे गोव्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण त्याच दिवसात गोव्याचे माजी आमदार लवू मामलेकर यांच्याबाबत बेळगावात जे काय घडले ते उदाहरण ताजे आहे. लाड यांनी त्या पार्श्वभूमीवर खरे तर कसलेच साकडे वगैरे करायला नको होते, उलट गोवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना कर्नाटकात जाणाऱ्या गोवेकरांना संरक्षणाची गरज असल्याचे बजावायला हवे होते असे बोलले जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कर्नाटकपेक्षा गोव्यात चांगले वातावरण आहे. शिवाय अधिक प्राप्ती होते म्हणून तेथीलच केवळ नव्हे, तर अन्य राज्यांतील कामगारही गोव्यात येतात. त्यासाठी संरक्षण वगैरेंची जर गरज असेल, तर त्यांनी येथे येऊच नये. उलट अन्य राज्यांतील अशा कामगारांमुळेच येथील गुन्हेगारी वगैरे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे व त्याला पोलिसांचे गुन्हेगारी पथकही दुजोरा देते. यासाठी लाड यांनी शहाजोगपणा न आणता वस्तुस्थिती मान्य करावी असेही बोलले जात आहेच, शिवाय मुख्यमंत्र्यांनी अशा कामगारांप्रती स्थानिकांमध्ये असलेली चीड बोलून दाखवायला हवी होती असेही लोक म्हणू लागले आहेत. ∙∙∙
आल्तिनो येथून म्हणजेच वन खात्याजवळ आणि आयटीआयच्या बाजूने भाटलेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला खोदकाम करण्यात आलेला खड्डा धोकादायक आहे. कंत्राटदाराने ज्या पद्धतीने वाहनधारकांसाठी सुरक्षिततेचे उपाय योजायला हवेत, तसे अजिबात योजलेले नाहीत. याविषयी ‘गोमन्तक’नेही आवाज उठवला, परंतु ना कंत्राटदाराला काही घेणे देणे दिसत नाही किंवा स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडला (आयपीएससीडीएल) काही पडलेले दिसत नाही. यापूर्वी खड्ड्यात वाहनधारक पडून जीव गेल्याची घटना घडली आहे, त्यातून काहीच बोध कोणीच घेतलेला दिसत नाही. रस्त्याच्या अगदी बाजूला हा खड्डा आहे आणि बाजूचा रस्ता उतरणीचा आहे. त्यामुळे खड्ड्याच्या बाजूला जे पत्रे उभारलेले आहेत, ते कुचकामी ठरू शकतात. काही अंतरावर बॅरिगेटस उभारणे आवश्यक आहे, त्यावर वाहनचालकांना सूचित करणारे वीज दिवे लावणे गरजेचे आहे, त्याशिवाय वाहनांच्या प्रकाशात चकाकणाऱ्या लाल रंगाचे रेडियमही लावलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडल्यावरच कंत्राटदाराचे डोळे उघडणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे. ∙∙∙
राज्यात राजकीय चर्चेचा नवा विषय सध्या रिव्होल्युशनरी गोवन्समधील अंतर्गत बंड ठरत आहे. मनोज परब यांनी सोशल मीडिया वापरावर कडक आदेश दिल्यानंतर, पक्षात मतभेद वाढल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परब स्वतःच ‘रिव्होल्युशन’ला तोंड देत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच परब यांनी पक्षाच्या सदस्यांना विरोधी पक्षांच्या पोस्टला लाईक-शेअर करू नका, नाहीतर कारवाई होईल अशी दमदाटी दिली. आजवर परब यांची शैली ही ‘जो पक्षासोबत नाही, तो विरोधकच’ अशी राहिली आहे. मात्र, आता ‘जो पक्षासोबत आहे, तोच विरोधात जात आहे’. पक्षात फूट पडत असेल, तर परब यांना पुन्हा एकदा रणनीती ठरवावी लागेल. नाहीतर पक्षाचा नारा ‘आमचे गोव्यात सरकार येईल’ ऐवजी ‘आमच्या पक्षात आमचीच सत्ता राहील का?’ असा होईल. ∙∙∙
सोमवारच्या अंकात ‘वीज खात्याच्या पायघड्या’ या शीर्षकाखाली मडगावात वीज खाते बिल्डरांच्या सोईसाठी कशी तत्परता दाखवत आले अशी ‘खरी कुजबुज’ प्रसिध्द झाल्यावर या खात्यातच केवळ नव्हे, तर बिल्डर लॅाबीतही खुमासदार चर्चा रंगली आहे. त्यानंतर वीज खात्याची ही तत्परता आजकालची नव्हे, तर गेल्या अनेक दशकांची असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. असे सांगतात, की संबंधित खात्याची ही तत्परता सरसकट सर्व बिल्डरांसाठी नसते, तर विशिष्ट बिल्डरांसाठीच असते. साध्या वीज जोडण्यांसाठी हे खाते लोकांना हेलपाटे मारायला लावते, तर बिल्डरांच्या एकेक गठ्ठा फाईली त्वरित मंजूर करून कनेक्शने दिली जातात. रस्त्याकडेच्या भूमिगत वीज केबलचा आणखी एक किस्सा खात्यातीलच लोकांनी सांगितला, तो असाच गमतीदार आहे. आके ते घोगळ - फातोर्डा उच्चदाबाची वाहिनी रस्त्याला समांतर व तीही खांबांवरून जाते, पण घोगळ जंक्शन ते बोलशे सर्कल दरम्यानच्या भागात मात्र ती भूमिगत केली गेली. त्याचे कारण मध्ये उभे झालेले शेकडो सदनिकांचे संकुल. अशाप्रकारे जेथे जेथे अशी संकुले आली तेथे तेथे वीज खाते म्हणे भलतेच लवचीक बनले. ∙∙∙
शिवजयंतीचा उत्सव तोंडावर आलेला असताना धार्मिक तणाव तर होणार नाही ना याची चिंता नाही म्हटले तरी दक्षिण गोव्यातील पोलिसांना तशी सतावत आहेच. याचे कारण म्हणजे, सां जुझे द आरियल येथे शिवपुतळ्याकडे जाणाऱ्या वाटेमुळे उद्भवलेला वाद. सध्या हा वाद शांत झालेला असला तरी एक प्रकारची तणावपूर्ण शांतता या भागात असून ही शांतताच पाेलिसांचा रक्तदाब वाढविणारी आहे. या अशा घटना होऊ शकतात याची माहिती मिळाल्यामुळे दक्षिण गोव्याच्या पूर्वीच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी काही संघटनांच्या नेत्यांची यादी तयार करण्यासाठी सांगितले होते. मात्र, तसे केल्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता पाेलिसांना तणावाला सामोरे जावे लागत असताना त्यांना सुनीता मॅडमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.