Mahadayi Water Dispute: म्हादईचे पाणी वळविण्याचा कर्नाटकचा इरादा, त्याला केंद्राकडून मिळालेली साथ यामुळे गत अनेक दिवसांपासून अस्वस्थ असलेले हजारो गोमंतकीय म्हादईच्या निरंतरतेसाठी आज राजधानीत एकत्र येत आहेत.
मानवी साखळीच्या रूपाचा हा जागोर कर्नाटकाचा इरादा व स्थानिक राज्यकर्त्यांची अनास्था या प्रवृतीला धडकी भरविणारा ठरणारा आहे. मांडवी किनाऱ्यावरील या उत्सवात राज्यभरातील कलाकार, गायक, चित्रकार, कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
म्हादई जलविवाद लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असतानाच केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारच्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) मंजुरी दिली होती.
या विरोधात विर्डी-साखळी येथे भव्य सभा झाली. त्यानंतर सरकारने तातडीचे पावले उचलत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जल आयोगाचा निर्णय मागे घ्यावा आणि म्हादई प्राधिकरणाची स्थापना करावी, असे केंद्राकडे साकडे घातले.
याच विरोधात गोवा बचाव म्हादई बचाव आघाडीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले. आता हे आंदोलन निर्णायक पातळीवर पोहोचले असून या आघाडीच्या आंदोलनाला अर्थीव्हिस्ट कलेक्टिव, हेरिटेज ऑक्शन ग्रुपने साथ दिली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम, कला सादरीकरणातून नदीच्या महतीचे गुंजन
आंदोलनाचे वैशिष्ट्ये
नदी संवर्धनार्थ उत्स्फूर्त उत्सवी मोहीम.
निसर्गप्रेमी तीन संघटना येणार एकत्र.
गुंजणार ‘म्हादई आमची माय’चा नारा.
७ हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित.
पणजीत ७ ठिकाणी लक्षवेधी कार्यक्रम.
साहित्य, कला, नाट्य, संगीत क्षेत्रातील मान्यवर.
पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे कपडे वेधणार लक्ष.
कृषिसाठी कर्नाटकला पाणी नको!
सासष्टी : कर्नाटकाला पिण्याचे पाणी देण्यास हरकत नाही. पण त्यांना कृषी, स्टील प्रकल्प, कंपन्यांसाठी पाणी नाकारावे, असे मत काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी मांडले.
सायंकाळी ४ वाजता होणार प्रारंभ
शनिवारी दुपारी ४ वाजता मांडवी किनाऱ्यावर हा अनोखा उत्सव असेल. दोना पावला येथील स्वीम सी हॉटेलपासून जुने सचिवालयाजवळच्या मांडवी जेटीपर्यंत ७ किलोमीटरच्या मानवी साखळीसह आपली कला सादर करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत सहभागी होतील. यात गायन, भरतनाट्यम, संगीत सादरीकरण, कविता, चित्रकला अशा उपक्रमांचा समावेश आहे.
राजकीय पक्षांचा सहभाग
म्हादई उत्सवात विविध राजकीय पक्ष सहभागी होतील. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आपल्या समर्थकांसह हजर राहून आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसचे आमदार, कार्यकर्ते, आपचे ॲड.अमित पालेकर आपल्या आमदारांसह सहभागी होतील, असे जन आंदोलन प्रवक्त्यांनी सांगितले.
या जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी कलावंत, कलाकार, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, राजकारणी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, बिगर सरकारी संस्थांचे सदस्य यांना आवाहन करण्यात आले आहे. आंदोलन म्हादई नदीशी संबंधित असल्याने पांढरे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
- मिरीयम कोशयी, संस्थापक, म्हादई आमची माय
जनजागृतीचा उद्देश
देशात घटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. पर्यावरण संरक्षण करणे ही सध्याची मोठी गरज आहे. शनिवारी म्हादई वाचविण्यासाठी मानवी साखळी तयार केली जाणार आहे. त्यातून म्हादईचा प्रश्न लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणाले.
मावजो यांचा पाठिंबा
म्हादई वाचविण्याचा एक भाग म्हणून उद्या, शनिवारी होत असलेल्या ‘उत्सव म्हादई‘च्या उपक्रमास आपण वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकणार नाही. परंतु, या उपक्रमास आपला पाठिंबा आहे. लोकांनीही यावेळी हजर राहावे, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी केले.
आंदोलनाचे वेगळेपण
म्हादई उत्सवानिमित्त होणाऱ्या मानवी साखळीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. नागरिकांनीही यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. म्हादईप्रेमींचे हे उत्स्फूर्त आंदोलन असेल. या मानवी साखळीच्या माध्यमातून आम्ही सरकार, जनतेसमोर आंदोलनाचे वेगळेपण ठेवू, असे गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी सांगितले.
म्हादईसाठी प्राणही द्यायला तयार : हेमा
गोवेकरांनी आताच जागे होऊन रस्त्यावर उतरून म्हादईसाठी लढले पाहिजे. अन्यथा आमच्या भविष्यातील पिढ्यांना पाण्यावाचून वंचित राहावे लागेल. माझ्या देहात प्राण असेपर्यंत मी म्हादईसाठी झुंज देईन. म्हादईसाठी मी प्राणही द्यायला तयार आहे. परंतु मला गोवेकरांची साथ हवी आहे, अशा भावना लोकप्रिय गायिका हेमा सरदेसाई यांनी व्यक्त केल्या. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.