पणजी : तरंगत्या कॅसिनोंना दिलेल्या बेकायदेशीर ''ना हरकत प्रमाणपत्र'' (एनओसी) आणि किनारपट्टीवरील मच्छीमारांचा होत असलेल्या छळाचा तृणमूल काँग्रेसने निषेध केला. त्यामुळे ''गोवा किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण'' (जीसीझेडएमए) त्वरित विसर्जित करावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली आहे. तृणमूल भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, समन्वयक संतोष मांद्रेकर, व्हिन्सेंट फर्नांडिस उपस्थित होते.
डिमेलो म्हणाले, ''जीसीझेडएमए'' ने आवश्यक तपासणी, ''पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन'' (ईआयए ) आणि ''ईआयए'' अहवाल सादर न करताच या कॅसिनोंना तत्त्वतः मान्यता कशी दिली? ''जीसीझेडएमए''मध्ये एनओसी देण्यास परवानगी देणारा कोणताही नियम नाही. ''ईआयए'' अहवाल हा सर्व दस्तऐवजांपैकी सर्वांत महत्त्वाचा आहे.
त्यांच्या बैठकीतील दस्तऐवजात स्थळ तपासणी आणि ''ईआयए'' अहवाल सादर केल्याचा कोणताही उल्लेख नाही. गोव्यातील मच्छीमार किंवा किनारपट्टीवरील रापणकारांना त्यांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी ''जीसीझेडएमए'' एनओसी नाकारते. त्यांचा छळ केला जातो आणि त्यांना धमकावले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांना याप्रकरणी जबाबदार धरत डिमेलो म्हणाले, ''जीसीझेडएमए'' तत्काळ विसर्जित करावे. तृणमूल भ्रष्टाचार संपेपर्यंत लढत राहील. संबंधित अधिकारिणींना या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.