Mahadayi Water Dispute: म्हादईचा विषय राज्यात तापला असला तरी काही लोकांनी सावधता बाळगली आहे. विशेष म्हणजे विविध पंचायतींच्या झालेल्या ग्रामसभेत काही पंचायतींनी म्हादईच्या लढ्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहांचा निषेध केला आणि म्हादईसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धारही केला.
मात्र काही पंचायतींनी मौन पाळणेच योग्य मानले. कारण सत्तेवर असलेल्या भाजप सरकारशी पंगा कोण घेणार असा सूर काही लोकांनी आळवला. मात्र म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे,
आणि ती कर्नाटकने पूर्णपणे पळवली तर गोव्यावर काय आफत येणार हे जाणून काही ग्रामसभांतून लोकांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा निषेध तर केलाच पण लढण्याचा निर्धारही व्यक्त केला. या लोकांबरोबरच जर सगळे राहिले तर...!
उपअधीक्षक देसाई यांना ‘लॉटरी’
पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या पोलिस व्यवस्थापन मंडळातर्फे करण्यात आल्याची एक ओळ आदेशावर असली, तरी या बदल्या राजकारण्यांच्या मर्जीनुसार होत असतात हे सर्वश्रुत आहे.
सत्ताधारी पक्षातील मंत्री वा आमदार आपल्याला मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांची मतदारसंघात वर्णी लावतात. या अधिकाऱ्यांनी कधी तरी त्या आमदार वा मंत्र्याला मदत केलेली असते. त्यामुळे या राजकारण्यांचा त्या पोलिस अधिकाऱ्यावरील विश्वासही वाढलेला असतो. पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी पोलिस सेवेतील अधिक तर कारकीर्द ही दक्षिण गोव्यातच केली आहे.
काँग्रेसचे सरकार असताना उपअधीक्षक देसाई यांनी मडगावचे पोलिस निरीक्षक म्हणून अनेक वर्षे सेवा केली. त्यांना त्यावेळी आमदार दिगंबर कामत यांचा आशिर्वाद होता. काँग्रेसची सत्ता गेल्यावर देसाई यांना मडगावातून हलविण्यात आले होते.
कामत हे भाजपवाशी झाल्याने पुन्हा देसाई यांना सुगीचे दिवस येऊन त्यांची मडगाव उपविभागीय अधिकारपदी बदली झाली आहे. आज अधीक्षकांच्या बदल्यांमध्ये एकमेव पोलिस उपअधीक्षकाची बदली झाली आहे. त्यांच्या या बदलीमुळे मडगावात पोलिस मुख्यालयात आनंददायी वातावरण आहे.
हे बाण फुटणार नाहीत!
प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी म्हादई आंदोलकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. सुभाष शिरोडकर यांनीही याच भूमिकेला दुजोरा दिला आहे. आलेक्स रेजिनाल्डही काहीसे तशीच प्रतिक्रिया देत आहेत.
परंतु, काब्राल व शिरोडकर यांनी आपल्याच सरकारविरोधात जाण्याचे धैर्य दाखवले आहे, असा त्याचा अर्थ आहे काय? राजकीय निरीक्षक मानतात, पुढच्या काही दिवसांत आणखी काही भाजप आमदार म्हादई रक्षणाच्या बाजूने भूमिका घेतील.
परंतु, राजकीयदृष्ट्या या भूमिकेला काही अर्थ आहे काय? शिवाय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात हे आव्हान आहे काय, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. हे मंत्री अमित शहांच्या विरोधात बोलण्याचे धैर्य दाखवतात;
परंतु मुख्यमंत्री मात्र न्यायालयीन लढ्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे हे गोंधळाचे वातावरण आहे. मंत्री द्वयींच्या परखड बोलांना काही अर्थ नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री हे अमित शहांचा निषेध जाहीरपणे व्यक्त करत नाहीत!
तोवर ही लुटुपुटूचीच लढाई मानली जाईल. म्हादई आता कायमची गेली आणि त्या विरोधात गोव्याची भाजपा काही बोलणार नाही आणि एकमुखी स्वरही या सरकार पक्षाकडून निघणार नाही, अशी माहिती मिळते. त्यामुळे हे फुकाचे बाण आहेत. ते आकाशात जातील; परंतु त्यांचा स्फोट होणार नाही, हे आता लोकांना कळून चुकले आहे.
‘बुके’ देऊनही ‘दगा’...
म्हादईबचावसाठी राज्यात सरकारसह जनताही प्रयत्न करीत आहे. पर्यावरणप्रेमी सातत्याने म्हादईबाबत जागृती करताना दिसतात. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन म्हादईबाबतची आपली मागणी, पाण्यावरील हक्क मांडला. केंद्रीय नेत्यांना अनेक वेळा गोव्यातर्फे पुष्पगुच्छ देण्यात आला.
त्याबद्दल दिल्लीतील नेत्यांनी आभारही मानले. पण, हा बुके गोव्याचे हित जपू शकला नाही, त्यामुळे ‘बुके’ देऊनही ‘दगा’...झाल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. समाजमाध्यमावर ‘जाका बुके दिलो, ताणेच दगो दिलो’ अशा टिपण्णीचे कार्टुन व्हायरल होत आहे. आता हा बुके नेमके कुणी आणि कोणाला दिला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही...
जुमला की वास्तव...
म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी गोवा सरकारची साथ लाभली असून, कर्नाटक भाजप सरकारची ही मोठी उपलब्धी आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडच केले.
या वक्तव्यावरून गोव्यात एकच वादंग उठले असून सध्या गोवा सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर वक्तव्य करीत हा पैसा आल्यास देशातील सर्व लोकांच्या खात्यावर किमान 15 लाख रुपये जमा होतील, असे म्हटले होते.
मात्र यावर नंतर अमित शहा यांनी स्पष्टीकरण देत असे विधान म्हणजे फक्त एकप्रकाराचा जुमला होता, असा दावा केलेला! दरम्यान, लवकरच आता कर्नाटकमध्ये निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांचे कर्नाटकमधील हे भाषण खरोखर वास्तव म्हणावे की हा जुमला होता? यावरून सध्या सोशल मीडिया तसेच चहाच्या टपरीवर लोकांमध्ये ही हॉट न्यूज बनली आहे.
रेजिनाल्डबाबांनी तोंड उघडले!
गत निवडणुकीत घूमजाव करुन भाजपाच्या मदतीने विधानसभेत पोचलेल्या कुडतरीच्या रेजिनाल्डबाबांनी म्हादईच्या निमित्ताने का असेना तोंड उघडले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे म्हादई वरील सभागृह समितीची बैठक त्वरित बोलावण्याची केलेली मागणी खरे तर महत्वाची असून त्यामुळे सत्ताधारी गटांतील आमदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपवाले नसले तरी सरकारला पाठिंबा देणारे अन्य कोणी आमदार आपले तोंड उघडतात व त्यांचीच.री ओढतात की काय? याकडे राजकीय गोटात चर्चा सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.