पणजी: गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो प्रतापराव सरदेसाई यांना आज सोमवारी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे नागरी सन्मान सोहळ्यात सन्मानित केले. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
यावर्षी जाहीर झालेल्या विविध मान्यवरांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात लिबिया लोबो यांचाही समावेश होता. गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या लिबिया लोबो सरदेसाई यांनी १९५५ मध्ये पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी जंगल परिसरात भूमिगत रेडिओ स्टेशन व्होज दा लिबेरदाबे सुरू केले होते.
२५ मे १९२४ रोजी सुकूर-पर्वरी येथे जन्मलेल्या लोबो सरदेसाई यांनी आपले मॅट्रिकुलेशन आंतोनियो डिसोझा हायस्कूल, भायखळा-मुंबई येथे पूर्ण केले आणि त्यानंतर सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथून इंग्रजी विषयात बीए (ऑनर्स) पदवी संपादन केली.
विद्यार्थिदशेत लिबिया लोबो यांनी ‘गोवन यूथ लीग’ या संस्थेच्या सचिव म्हणून काम करत गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले. मार्च १९६२ मध्ये, त्यांची गोव्याच्या पहिल्या पर्यटन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या या पदावर १९६८ पर्यंत कार्यरत होत्या.
१९६८ मध्ये लिबिया लोबो यांनी वकिली सुरू करण्यासाठी शासकीय सेवेचा त्याग केला. गोव्याच्या न्यायालयात वकिली करणाऱ्या पहिल्या महिला वकील बनल्या. १९७३ मध्ये पणजीत पहिल्या महिला सहकारी बँकेची स्थापना केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.