Libia Lobo Sardesai : शंभरीतली तरुणी : लिबिया लोबो सरदेसाई

एक जागृत महिला कशी असावी, याचे जीवंत उदाहरण म्हणजे लिबिया लोबो सरदेसाई. त्यांचे सामाजिक बदलावर या वयातही लक्ष आहे. समाज माध्यमांवर त्या सक्रिय आहेत. आज त्या वयाची शंभरी पूर्ण करत आहेत. त्यांना शुभेच्छा!
Libia Lobo Sardesai
Libia Lobo SardesaiDainik Gomantak

दिलीप बोरकर

‘बा बुमोशाय जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए!’ हा राजेश खन्ना अभिनीत ‘आनंद’ चित्रपटातील संवाद आम्ही ओठांवर नेहमीच खेळवत असतो. पण तो किती लोक प्रत्यक्षात उतरवितात, हा प्रश्नच आहे.

आजच्या काळात वेगवेगळ्या उपायांनी आपली जिंदगी ‘लंबी’ करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण ती ‘बडी’ करण्याचा प्रयत्न मात्र दिसून येत नाही. अशा ह्या वातावरणात लिबिया लोबो सरदेसाई ‘जिंदगी लंबी भी होनी चाहिए और बडी भी होनी चाहिए’ याचा संदेश देत आपल्या आयुष्याचे शतक पार करतात, तेव्हा त्यांच्याकडे लक्ष गेल्याशिवाय राहात नाही.

कोण ह्या लिबिया लोबो सरदेसाई..? मला आठवतो १९ डिसेंबर १९६१. त्यावेळी मी फक्त सहा वर्षांचा असेन. पण मला आठवते, मी आमच्या अंगणात उभा आहे. पाखले म्हणजे पोर्तुगीज गोवा सोडून जात आहेत, असं प्रत्येकजण कुजबुजत आहे. पण गेर्र म्हणजे काय, भीती म्हणजे काय हे माहीत नसलेलं माझं ते बालवय डोक्यावरून अगदी जवळून जाणारे विमान पाहते.

त्या विमानातून पत्रकं खाली टाकली जात आहेत आणि त्या विमानातून एकसारखा एका बाईचा आवाज ध्वनिक्षेपकावरून येत आहे, ‘कोणेंच भिवपाची गरज ना. आतां गोंय मेकळें जालां.’ घाबरण्याची गरज नाही गोवा मुक्त झालेला आहे, असं ती बाई सांगत होती म्हणे. तो आवाज कोणाचा, ती बाई कोण हे त्यावेळी समजण्याचे माझे वय नव्हतेच. परंतु ते अगदी जवळून उडणारे विमान, त्यातून टाकली जाणारी पत्रकं आणि तो त्या बाईचा आवाज हा त्या काळचा प्रसंग मात्र माझ्या स्मृतीपटलावर अजूनही ताजातवाना आहे.

गोवा मुक्त झाल्याबरोबर आपल्या आश्वासक, गोड आवाजात गोमंतकीयांना धीर देणारी ती बाई म्हणजे लिबिया लोबो सरदेसाई होत्या, हे मात्र मला त्यांची प्रत्यक्षात भेट झाल्यावर खूप उशिरा कळले. त्यांचे पती वामन सरदेसाई हे स्वातंत्र्यसैनिक होते हे झालेच; पण ते एक अत्यंत संवेदनशील कवी होते आणि ‘अभिजीत’ ह्या नावाने काव्य रचायचे.

ते कवी म्हणूनच त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि लोबो सरदेसाई ह्या दाम्पत्याकडील ऋणानुबंध वाढत गेले. बालपणी मी जो अमीट आवाज विमानातून ऐकला होता आणि त्याच बाई आज प्रत्यक्षात माझ्याशी बोलत आहेत, हा प्रसंगच मला रोमांचित करणारा होता. आज ह्याच लिबिया वयाचे शतक पूर्ण करत आहेत आणि त्यांचा तोच सुमधूर खळखळणाऱ्या झऱ्यासारखा आवाज आजही तेवढाच आश्वासक भासत आहे.

पण मुद्दा तो नाही. याच महिन्यात बिम्ब परिवाराने ‘अस्तुरी कर्तृत्वोत्सव’ नावाने महिलासाठी समर्पित एक दिवशीय कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी वेगवेगळ्या सत्रांत निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांनी आपल्या कर्तृत्वास उजाळा दिला. हा सगळा कार्यक्रम स्मृतिपटलावर ताजातवाना असतानाच गोव्याच्या मुक्तीसंग्रामातील एक देदीप्यमान वीरांगना लिबिया लोबो सरदेसाई आपल्या वयाचे शतक पूर्ण करत आहेत हा प्रसंगही मला पुलकीत करून गेला.

गेल्याच वर्षी त्यांनी पती वामन सरदेसाई यांचा शतकोत्सव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी बहुतेक वक्त्यांनी या क्रांतिकारी जोडप्याच्या कर्तृत्वास उजाळा दिला होता. एका वक्त्याने तर गोव्याच्या मुक्ती संग्रामातील या जोडप्याचे जंगलात राहुन केलेले कार्य आणि त्यांचे प्रेमप्रकरण हा एका रोमहर्षक चित्रपटाचा विषय असल्याचेही म्हटले होते.

आणि त्यात तसूभरही अतिशयोक्ती नव्हती, हे त्यांच्या कार्याची जाण असलेले मान्य करतील. परंतु गोव्याचे दुर्दैव म्हणजे ह्या क्रांतिकारी लोकांच्या कार्याची नोंद आणि इतिहास जपला जावा असं आजही गोमंतकीयांना वाटत नाही. ज्यांनी ऐन तारुण्यात आपलं जीवन गोव्याच्या मुक्तीसंग्रामाच्या यज्ञकुंडात समर्पित केले, त्यांच्यातील लिबिया लोबो सरदेसाई हा शेवटचा दुवा आहे. त्या म्हणजे गोव्याच्या मुक्तीसंग्रामातील चालता बोलता इतिहास आहे.

त्यांची स्मृती, त्यांची शक्ती, त्यांची वाणी या वयातही ऐन तारुण्यातील महिलांना लाजवणारी आहे. परंतु त्यांच्या ताकदीचा वापर गोवा सरकारला अथवा इतर संस्थांना करून घेता आला नाही. त्यांच्या नंतरच्या पिढीतील प्रभाकर सिनारीसारखे हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्याही स्मृती अजून भ्रष्ट झालेल्या नाहीत. पण त्यांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवलेला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आम्ही नोंद करून ठेवण्यास अपयशी ठरलो आहोत.

लिबिया लोबो २५ मे १९२५ रोजी बार्देश तालुक्यातील पर्वरी गावात जन्मल्या. त्यांच्यावर एम. एन.रॉय यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव पडला होता. रॉय त्या काळात आपल्या चळवळीच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडायचे. त्यांच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी व्हायची. लिबिया लोबो यांनाही त्यांची भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. देशाच्या स्वातंत्र्याची १९४२ मध्ये सुरू झालेली चळवळ त्यांनी जवळून पाहिली.

त्यातून स्फूर्ती घेऊन त्या १९४८ ते १९५० च्या काळात ‘गोवन यूथ लीग’च्या सचिव म्हणून कार्यरत राहिल्या. गोव्यातही मुक्तीसंग्रामाचे आंदोलन पर्व सुरू झाले होते. ते तीव्र होऊ नये म्हणून पोर्तुगीज सरकारने १९५५ च्या ऑगस्टपासून गोव्याचे आणि भारताचे संबंध तोडून टाकले होते. बऱ्याच जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी स्वातंत्र्याचा आवाज दडपला जाऊ नये म्हणून कॅसरलॉकच्या निर्जनस्थानी ‘सुटकेचो आवाज’ नावाने गुप्त रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आणि ते चालवण्याची जबाबदारी त्या काळी वामन सरदेसाई आणि लिबिया लोबो ह्या उमद्या तरुण स्वातंत्र्यसैनिकांनी घेतली. हा रेडिओ केंद्र भारतीय सैन्याच्या आक्रमणाची बातमी प्रसारीत करायचे.

सुटकेचो आवाज हे गुप्त रेडिओ केंद्र चालवताना संपर्कात आलेल्या वामन सरदेसाई यांच्या प्रेमात लिबिया लोबो पडल्या आणि त्यांनी लग्नही केले. नंतरच्या काळातही त्यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा सोडला नाही. गोवा मुक्तीनंतर भारत सरकारच्या परराष्ट्रीय मंत्रालयात कार्य केले. त्या काळात युद्धबंद्यांच्या अदलाबदलीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या संचालक म्हणूनही त्यांनी १९६२ ते १९६८ ह्या काळात पदभार वाहिला. गोवा पर्यटन खात्याच्या त्या पहिल्या संचालक होत्या. गोवा हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न त्याकाळी वाखाणले गेले.

नंतरच्या काळात १९७३ साली गोव्यात फक्त महिलांसाठीची सहकारी बँक असावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि बँकेची स्थापनाही केली. त्या सतत सात वर्षे बँकेच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या वकिलीच्या शिक्षणाचा गोव्याच्या जनतेसाठी वापर करावा असा निर्णय घेतला आणि वकिलीचा व्यवसाय सुरू केला. गोव्यात महिला वकील म्हणून त्यांनी प्रथम पदार्पण केले.

त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप फार मोठा होता. राज्यपातळीवर ग्राहक समित्या स्थापन करणे, ग्राहक सल्लागार समिती स्थापन करून ग्राहकांच्या हितसंबंधांची जाणीव करून देणे, अखिल भारतीय महिला परिषद तसेच ग्राहक मार्गदर्शक संस्थांमार्फत चालवलेले कार्य दखल घेण्यासारखे आहे.

एक जागृत महिला कशी असावी याचे जीवंत उदाहरण म्हणजे लिबिया लोबो सरदेसाई. त्यांचे सामाजिक बदलावर या वयातही लक्ष आहे. समाजमाध्यमावर त्या सक्रिय आहेत. आज सगळेच विचारवंत मूग गिळून देशात जे काही चाललेले आहे ते पाहात बसलेले आहेत. अशावेळी समाजमाध्यमावर लिबिया लोबो सरदेसाई आपला निषेध नोंदवून भाष्य करताना दिसतात. लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य यावर आघात होत असल्याचे जाणवताच आजही त्या जागृतपणे त्याची नोंद घेत आपले मत व्यक्त करतात. अशावेळी प्रश्न पडतो, आजची युवा पिढी कुठं आहे?

आज गोवा स्वातंत्र्यसंग्रामातील ह्या वीरांगना वयाचे शतक पार करत आहेत. आजही त्या पंचविशीतील तरुणींना लाजवतील अशा दमाने वावरत आहेत. त्यांच्यासाठी वय ही फक्त नाममात्र संख्या आहे. त्यांचे मन तरुण आहे. त्यांच्या तरुण आणि सकारात्मक मनाला वयाची मर्यादा नाही. म्हणूनच या वयातही त्या शंभरीतील तरुणी असल्यासारख्या जगत आहेत.

त्यांच्या कार्याची जाणीव किती लोकांना आहे आणि कोण त्यांची दखल घेईल, हा प्रश्न आजच्या काळात गौण आहे. आजचा काळ आहे संपत्ती पाहुन एखाद्या तरुणीस सहज उचलून सिंहासनारूढ करण्याचा. त्यात लिबिया लोबोसारख्या वीरांगनांची कोण दखल घेणार नाहीच. कारण त्यांच्यासारखे कार्य करावे आणि त्यांचा आदर्श जपावा, असा विचार आज कालबाह्य झाला आहे. अशा ह्या वातावरणात हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून लिबिया लोबो सरदेसाईसारख्या क्रांतीच्या अंतिम पर्वास शंभराव्या वाढदिवसानिमित्ताने सलाम करणे माझ्यासारख्यांच्या हाती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com