Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: वाढदिवसाची कथा

Khari Kujbuj Political Satire: आपल्या मतदारसंघात शेती नाही, डोंगराळ भाग मात्र बराच आहे असा उल्लेख संकल्प आमोणकर यांनी केला

गोमन्तक डिजिटल टीम

वाढदिवसाची कथा

रमेश तवडकर यांचा आज वाढदिवस. शनिवारी विधानसभेला सुट्टी असल्याने ते वाढदिवसाच्या दिवशी पर्वरीत असणार नाहीत हे गृहीतच होते. त्याशिवाय नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते. त्यामुळे शुक्रवारची दुपार ही तवडकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खास ठरवली. विधानसभेच्या सभापतींसाठी असलेल्या चेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांनी केक मागवला आणि तवडकर यांच्या हस्ते तो कापला. सर्वांनी यानिमित्ताने तवडकर यांना २४ तास अगोदरच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तवडकर हे मंत्री होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर तवडकर यांच्या वाढदिवसाची मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आठवण आणि आवर्जून आणलेला केक याची चर्चा त्याचमुळे शुक्रवारी राजकीय वर्तुळात होती.∙∙∙

परसबागेचा पर्याय

मुरगाव मतदारसंघात शेती नाही. त्यामुळे या खात्याच्या मागण्यांवर आमदार संकल्प आमोणकर काय बोलणार याविषयी कुतूहल होतेच. ते बोलण्यासाठी उठले आणि आपल्या मतदारसंघात शेती नाही, डोंगराळ भाग मात्र बराच आहे असा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले, शेतीची व बागकामाची आवड असणारे आता इमारतीत राहतात. गॅलरीतील काही भाग ते लागवडीखाली वापरतात. सरकारने अशांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखावी अशी सूचना त्यांनी केली. याचा विचार सरकारने केला, तर परसबाग किंवा टेरेस, गॅलरीतील लागवडीलाही सरकारी साह्य मिळू शकणार आहे. हौसेचे रूपांतर हौशी शेतकरी, बागायतदारांत होण्यास त्याचमुळे वेळ लागणार नाही. ∙∙∙

क्रांती मैदानाचा प्रश्न

फोंड्यातील क्रांती मैदानाचा प्रश्न भिजत पडला आहे. वास्तविक हे मैदान लष्कराच्या ताब्यात असताना तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांनी हे मैदान सोडवून पालिकेच्या ताब्यात दिले, पण अर्धेच मैदान पालिकेला मिळाले. उर्वरित अर्धे मैदान अजूनही लष्कराच्या ताब्यात आहे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. दरवेळेला राष्ट्रीय सणांवेळी या मैदानाचा प्रश्न उपस्थित होतो. मागे जेव्हा मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री होते व नंतरच्या काळात श्रीपाद नाईक केंद्रात संरक्षण राज्यमंत्री होते, तेव्हा हे मैदान सहज सोडवता आले असते, पण तसे काही घडले नाही. मात्र, या रस्त्याने येता जाता फोंडेकरांना मैदानाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे निदान विधानसभेत हा प्रश्न चर्चेला यावा असे फोंडेकरांना वाटणे साहजिकच आहे. उर्वरित मैदान पालिकेच्या ताब्यात दिल्यास निदान विकासाच्या दृष्टीने तरी नियोजन होईल. उगाच एवढी मोठी जमीन लष्कराकडे ‘आयडल’ ठेवून त्याचा काय उपयोग? फोंडेकरच म्हणतात हे! ∙∙∙

भंगारअड्ड्याचा प्रश्न

बामणभाट - मेरशी येथील भंगारअड्ड्यातून विषारी वायू पसरल्याची घटना अद्याप विस्मृतीत गेलेली नाही. या वायुमुळे अनेकांना उपचार घ्यावे लागले होते. सांताक्रुजचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी विधानसभेत हा विषय मांडला. स्थानिकांनी हा विषय हातचा जाऊ न देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आज दुपारी चार वाजता एकत्र जमून निषेध करण्याचे ठरविले आहे. लोकवस्तीतून भंगारअड्डे हटवेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचीही साथ त्यांना लाभल्याने आता मेरशीचा भंगारअड्डा हा विषय धुमसत राहील असे दिसते. सरकारने भंगारअड्डे औद्योगिक वसाहतीत हलविण्याची आश्वासने अनेकदा दिली, ती विस्मृतीतही गेली. मेरशीवासीयांनी मात्र या प्रश्नाला वाचा फोडत राहणेच पसंत केल्याचे दिसते.

‘त्‍या’ जावयांची मजल वरपर्यंत?

केपेतील टीसीपी खात्‍याच्‍या कार्यालयात असलेल्‍या ‘त्‍या’ तीन जावयांचे कारनामे आम्‍ही यापूर्वी याच स्‍तंभातून तुमच्‍यासमोर आणले. त्‍यामुळे त्‍या तीन जावयांच्‍या कारवाया काही काळ थंड झाल्‍या होत्‍या, पण म्‍हणतात ना, कुत्र्याची शेपटी कितीही नळीत घातली तरी सरळ होत नाही, ती वाकडी ती वाकडीच. याच उक्‍तीप्रमाणे, काही काळ थंड बसलेल्‍या त्‍या जावयांनी आता पुन्‍हा एकदा आपल्‍या कारवाया हळूहळू सुरू केल्‍या आहेत. त्‍यापूर्वी त्‍यांनी म्‍हणे, पणजी कार्यालयातील आपल्‍या मोठ्या साहेबाचीही भेट घेतली आणि त्‍या मोठ्या साहेबाने त्‍यांना अभय दिल्‍यामुळे ते आता निश्चिंत झाले आहेत असे वाटते. या तीन जावयांच्‍या भागीदारीत तो ‘दाढीवाला’ मोठा साहेबही सामील आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. ∙∙∙

जुन्या इमारतींमुळे कर्मचाऱ्यांत भीती

पणजी शहरात सरकारी कार्यालये काही जुन्या इमारतींमध्ये आहेत. जुन्ता हाउस इमारत ही धोकादायक बनली असून या इमारतीत असलेल्या कार्यालयाच्या बाल्कनीची स्थिती खूपच बिकट आहे. या इमारतीत वाहतूक, नागरी पुरवठा याच्यासह इतर काही सरकारी कार्यालये आहेत. या इमारतीची अवस्था पाहून कामानिमित्त येणारे लोकही जीव मुठीत घेऊन प्रवेश करतात. तेथील सार्वजनिक शौचालये घाणेरडी आहेत. पाणी साठून राहत असल्याने डेंग्यू तसेच मलेरिया यासारखे आजार होण्याची संभावना नाकारता येत नाही. या इमारतीतील कार्यालये इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी सरकारकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. हल्लीच समजा कल्याण खाते असलेल्या इमारतीच्या छप्पराचा काही भाग कोसळला. दैव बलवत्तर म्हणून तेथे त्यावेळी कोणीही कर्मचारी नव्हता त्यामुळे दुर्घटना टळली. इमारती धोकादायक घोषित होऊनही सरकार एखाद्या दुर्घटनेची वाट पाहात आहे की काय अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या इमारतीच्या बाहेर रस्त्यावर अनेक वाहने उभी असतात तसेच वाहतुकीची वर्दळ असते. या इमारतीचे सज्जेही मोडकळीस आले आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. ∙∙∙

टॅक्सीवाल्यांचे लाड...

या दिवसांत पेडणे - मोपा येथील टॅक्सीवाल्यांचा प्रश्न गाजत आहे. त्यांनी केवळ पेडण्यातच नव्हे, तर परवा म्हापशात देव बोडगेश्वराजवळील जागेत येऊनही आपले शक्तिप्रदर्शन केले. त्यांचे एकवेळ ठीक आहे, पण काही आमदारही त्यांची बाजू हिरिरीने मांडताना नेहमीच आढळतात. त्यात प्रामुख्याने कळंगुटमधील मायकलबाबांचा समावेश आहे. यापूर्वी सासष्टीतील काही आमदार असेच त्यांची तळी उचलून धरत होते. आता ते माजी झालेले असले तरी हे काम करतात. पण मुद्दा तोही नाही, टॅक्सीवाले असोत वा खासगी बसवाले असोत, सर्वसामान्य लोक मात्र त्यांच्याबाबत नाराजीच व्यक्त करतात, त्यामुळेच तर ते गोवा माईल्सला पसंत करत नसावेत ना असा प्रश्न पडतो. खरे तर राजकारण्यांनीच टॅक्सीवाल्यांना डोक्यावर चढवून ठेवलेले आहे. राजकारण्यांनी लोकांच्या भावना खरे तर समजून घेऊन या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली असती तर ही वेळ आलीच नसती, असेच आता लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

समर्थन रोमीचे, पण आत्‍मचरित्र इंग्रजीतून!

एका बाजूने रोमी कोंकणीला न्‍याय द्या असे म्‍हणणारी संस्‍था स्‍वत:चे ग्‍लोबल कोंकणी फोरम असे इंग्रजाळलेले नाव धारण करते आणि दुसऱ्या बाजूने स्‍वत:ला रोमीचे पुरस्‍कर्ते म्‍हणणारे काही नेते स्‍वत:ची आत्‍मचरित्रे रोमी भाषेत न लिहिता ती चक्‍क इंग्रजी भाषेतून लिहितात. उदाहरण द्यायचेच झाल्‍यास, ज्‍येष्‍ठ तियात्रिस्‍त तोमाझिन कार्दोज आणि प्रेमानंद लोटलीकर यांचे देता येईल. या दोघांनीही आपली आत्‍मचरित्रे इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध केली आहेत. त्‍यातील प्रेमानंद हे तर रोमीच्या उत्‍कर्षासाठी सरकारने स्‍थापन केलेल्‍या दाल्‍गाद कोंकणी अकादमीचे माजी अध्‍यक्ष. त्‍यांचे हे वागणे म्‍हणजे, पोटात एक आणि ओठात एक. या प्रकारात मोडणारे नव्‍हे का? ∙∙∙

स्पायडर मॅनची चर्चा

कामुर्ली येथील रस्त्यावर बरेच खड्डे पडलेले आहेत. खोल अशा या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. या गढूळ पाण्यात खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नाही. बऱ्याचदा ते या खड्‍ड्यांत फसतात. तेथे एकाने अनोखी शक्कल लढवली आहे. स्पायडर मॅनसारखी वेशभूषा करून मासे पकडण्याचा गळ घेऊन ती व्यक्ती खड्‍ड्यांशेजारी बसून राहते. वाहन आले की खड्ड्यात गळ सोडून तो खड्डा किती खोल आहे याचा अंदाज वाहनचालकाला दर्शवते. तिच्या या सामाजिक कामाची आणि सरकारप्रती उपहासात्मक कृतीची चर्चा केवळ कामुर्ली परिसरातच नव्हे, तर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सार्वत्रिक झाली आहे. परोपकारी स्पायडर मॅन अशी संभावना अनेकजण यानिमित्ताने करू लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT