खरी कुजबुज: ...आणि तिजोरीतही खड्डेच खड्डे!

Khari Kujbuj Political Satire: आमंत्रण पत्रिकेवर नाव न छापल्यामुळे युरींची अनुपस्थिती
Khari Kujbuj Political Satire: आमंत्रण पत्रिकेवर नाव  न छापल्यामुळे युरींची अनुपस्थिती
Goga Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

...आणि तिजोरीतही खड्डेच खड्डे!

अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात दुसऱ्या दिवशी सायंकाळी शेवटच्या टप्प्यात आमदार विजय सरदेसाई यांनी मत मांडण्यास कविता सादर करून सुरवात केली. त्यापूर्वी त्यांनी काव्य सादर करण्यात माहीर असणाऱ्या वीजमंत्री सुदिन ढवळीकरांनाही लक्ष देण्यास सांगितले. कोकणीतून सादर केलेल्या कवितेचा मथितार्थ पावसाळ्यातील खड्डे आणि राज्य सरकारच्या तिजोरीतही खड्डेच खड्डे तरी सर्व काही सुशेगाद. अशा आशयाची कविता सादर करीत सरदेसाई यांनी अर्थसंकल्पावर विरोधक म्हणून जी बाजू मांडायची ती मांडली. सरदेसाईंना म्हणे एका युवकाने ही कविता दिली. मात्र, ही कविता त्यांनी भरविलेल्या दरबारात दिली की नुकतीच पाठविली, हे काही समजू शकले नाही. ∙∙∙

‘तो’ सुदिन कधी येणार?

संपूर्ण गोव्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे म्हणा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व कंत्राटदारांमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. उन्हाळ्यात काळे कुळकुळीत दिसणारे रस्ते, पावसाळा सुरू झाला की आपले खरे रूप दाखवू लागले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम खाते हे मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते. यापूर्वी ते नीलेश काब्राल यांच्याकडे होते. आता परत एकदा रस्ते व्यवस्थित होण्यासाठी तो सुदिन कधी येणार अशी चर्चा अनेकजण करीत आहेत. ∙∙∙

युरींची अनुपस्थिती

कुंकळ्ळीत झालेल्या १५८३ च्या रणसंग्रामाला राज्य मान्यता मिळाली आणि या कार्यक्रमावरून राजकारण व्हायला लागले असे आता कुंकळ्ळीकर म्हणायला लागले आहेत. सरकार व विरोधी पक्षनेत्यांत गेल्यावर्षी कुंकळ्ळीतील उठावाच्या कार्यक्रमावरून वाद झाला होता. युरी आलेमाव यांचे नाव आमंत्रण पत्रिकेवर न छापल्यामुळे युरींनी आवाज उठविला होता. मात्र, सरकारी कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रम पत्रिकेत युरी आलेमाव यांचे नाव वक्ता म्हणून नसल्याने युरी आलेमाव यांनी आपल्या काही समर्थक नगरसेवकांना घेऊन सरकारी कार्यक्रम होण्यापूर्वीच सोळा महानायकांना पुष्पांजली अर्पण करून सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व ‘चिफ्टन ट्रस्ट’ने पालिकेच्या सहयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ही उपस्थिती लावली नाही. युरी आलेमाव यांनी कुंकळळी लढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात आणण्यासाठी श्रम घेतले होते. मात्र, सोळा महानायकांच्या सन्मानात आयोजित कार्यक्रमास अनुपस्थित राहून युरी आलेमाव यांनी मोठी चूक केल्याचे लोक बोलतात. ∙∙∙

पर्यटकांची दादागिरी

बागा येथे पर्यटक आणि स्थानिकांत हातघाईचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सरकारने कितीही सांगितले, तरी किनारी भागात पर्यटक उपद्रवकारी ठरू लागले आहेत. गोव्यात काहीही केले तरी चालते असा पर्यटकांनी समज करून घेतला आहे. त्यामुळे मद्याच्या अमलाखाली ते स्वैर वर्तन करतात आणि स्थानिकांच्या रोषास बळी पडतात. पर्यटन हे अनिर्बंध असूच नसे. धारण क्षमतेच्या अंगाने नव्हे तर किती स्थानिकांची पोटे भरण्यासाठी केवढे पर्यटन हवे याचा विचार सरकार कधी करणार आहे का? त्याचा विचार न करता पर्यटकांची संख्या वाढवण्यात भूषण मानले गेले तर बागासारखे प्रकार सार्वत्रिकपणे दिसणे फार दूर नाही. पर्यटकांना हाकलण्यासाठी लोक रस्त्यावर येण्याआधी सरकारने जागे होण्याची गरज यातून ठळक झाली आहे. ∙∙∙

सनबर्नचे राजकारण

सध्या सनबर्न या संगीत महोत्सवाचा मुद्दा प्रत्येकजण चवीने चघळू लागले आहेत. हा महोत्सव योग्य की अयोग्य ते सोडून त्याचे राजकारण तर केले जात नाही ना अशी शंकाही घेतली जाऊ लागली आहे. गेली अनेक वर्षे तो उत्तर गोव्यात आयोजित केला जात होता, तर यंदा तो दक्षिण गोव्यात आयोजित करण्याची तयारी आयोजकांनी चालविली आहे. काँग्रेससह अनेकांनी त्याला विरोध केला आहे. मुद्याची गोष्ट म्हणजे काँग्रेस राजवटीतच तो सुरू झाला, नंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले व सत्ता गेल्यानंतर तो पक्षच त्याला विरोध करू लागला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. या एकंदर गदारोळात ज्या ठिकाणी तो आयोजित केला जाणार आहे, तेथील स्थानिकांचे मत मात्र कोणीच विचारात घेत नसल्याने सनबर्नचे राजकारणच केले जाईल असे लोकांना वाटू लागले आहे.∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: आमंत्रण पत्रिकेवर नाव  न छापल्यामुळे युरींची अनुपस्थिती
खरी कुजबूज! ...अरे देवा आता किती कोटींचा चुराडा..?

‘ॲक्सिस’च्या आदेशावर ‘एक्स’

जनतेच्या हिताविरुद्ध जर सरकार एकतर्फी निर्णय घेत असेल, तर त्याला विरोध होणे स्वाभाविक आहे. शिक्षण खात्याने शिक्षण अनुदानित शाळा चालविणाऱ्या शिक्षण संस्थांना ॲक्सिस बँकेत खाते उघडणे सक्तीचे करण्याचा आदेश काढला होता. शाळांचे अनुदान ॲक्सिस बँकेत जमा करण्यात येणार असे आदेश दिले होते. मात्र, शिक्षण खात्याच्या नियमानुसार व कायद्यानुसार शिक्षण संस्थांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे सक्तीचे आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी ॲक्सिस बँकेत खाते उघडण्यात असमर्थता दर्शविली होती. प्रकरण विधानसभेत पोहोचले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचे नाव यात गोवण्यात आले होते. सरकारने वाढता विरोध लक्षात घेऊन नकोच ती भानगड म्हणून ॲक्सिस बँकेत खाते उघडण्याच्या आदेशावर कुऱ्हाड फिरवली म्हणजेच ‘एक्स’ मारली. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: आमंत्रण पत्रिकेवर नाव  न छापल्यामुळे युरींची अनुपस्थिती
खरी कुजबुज... दुर्दैव! एसटी समाजातच धमासान!

फोंड्यात काँग्रेसचे वजन वाढले

राजेश वेरेकर यांना पुढे चांगले दिवस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार खासदार झाल्यामुळे फोंड्यातही काँग्रेसचे वजन वाढले आहे. सध्या तर भारतीय जनता पक्षामध्ये फोंड्यात दोन गट तयार झाले आहेत, तर मगो पक्षाचे कार्य बरेच थंडावले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आता जोमाने कार्यरत झाले आहेत. मागच्या दोन वेळा राजेश वेरेकर यांचा विजय हुकला होता, पण आता हुकलेला विजय मिळवण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखायला तयारी सुरू केली आहे, हे नक्की. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: आमंत्रण पत्रिकेवर नाव  न छापल्यामुळे युरींची अनुपस्थिती
खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना सनबर्नचे एवढे कौतुक का?

सभागृहातील सत्य

विधानसभा सभागृहात आल्यानंतर खरेच बोलावे लागते, असा टोमणा विजय सरदेसाई यांनी विरोधी गटातून फुटून सत्ताधारी गटात गेलेल्या आठजणांना लगावला. कारण ते बोलायला उठल्यानंतर राजेश फळदेसाई यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर सरदेसाई यांनी अचूक संधी साधली. आठ आमदार विरोधी गटातून सत्ताधारी गटात गेले तरी विधानसभेत त्यांना खरे बोलावे लागत आहे, देवापुढे काय बोलले, त्यांना देवाने काय सांगितले, त्या बाबी सोडा. त्यामुळे या सभागृहात सत्य काय ते बोलावेच लागते, पण सत्य काय तर लोकांची काही कामे होत नाहीत, असाही उपरोधिक टोला सत्ताधाऱ्यांना त्यांनी लगावलाच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com