खरी कुजबुज: बाबूशची प्रशंसा की नाचक्की!

Khari Kujbuj Political Satire: साहेब रात्रीच्‍यावेळी त्‍या पबमधून तर्र होऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना तालांव देऊ लागला आहे
Khari Kujbuj Political Satire: साहेब रात्रीच्‍यावेळी त्‍या पबमधून तर्र होऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना तालांव देऊ लागला आहे
Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
Published on
Updated on

बाबूशची प्रशंसा की नाचक्की!

विधानसभेत महसूल खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी सुरवात करतानाच महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची चांगलीच प्रशंसा केली. एकेकाळी बाबूश मोन्सेरात हे एक धडाकेबाज लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये परिचित होते. त्यासाठी बाबुश यांना पाहण्यासाठी ते नेहमीच आकर्षित असायचे. यासंदर्भात व्हिएगश यांनी मोन्सेरात यांच्या कार्यपद्धतीवरील आधारित एक कविता इंग्रजीत वाचून दाखविली. मात्र, त्यामध्ये प्रशंसा करण्याबरोबरच त्यांनी घेतलेले निर्णय कसे निष्फळ ठरत आहेत हे सांगण्यास ते चुकले नाहीत. मंत्री मोन्सेरात यांना त्यांच्या खात्यामध्ये बरेच बदल घडवून आणायचे आहेत व त्यांना सांगितलेली कामे ते त्वरित मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असलेले आर्थिक बळ न मिळाल्याने त्यांच्या रथाची चाके रुतून बसली आहेत. यापूर्वी विधानसभेत त्यांनी अनेक आश्‍वासने तसेच कामे मार्गी लावण्याचे सांगितले आहे. मात्र, नेमेचि येतो मग पावसाळा याप्रमाणे या सरकारची कामे सुरू आहेत असे सांगून त्यांची खिल्ली उडवली. ∙∙∙

खाजन शेतीत बंगला!

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे जेव्हा बेकायदेशीर बांधकामांवर वगैरे बोलायला लागले की कदाचित मांद्रेतील लोकांच्या मनात वेगवेगळे विचार नक्कीच येत असतील. आरोलकर यापूर्वी कोणत्या आणि कशाच्या बाबतीत चर्चेत होते हे सांगायला नको, ते सर्व परिचित. पण आरोलकर सध्या आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी. त्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघातील खाजन शेतीत बंगले बांधले जात असल्याच्या प्रकारावर प्रकाश टाकला. नुकतेच चर्चेत राहिलेल्या आगरवाडा गावातसुद्धा खाजन शेतीच्या जागेत बाहेरच्या राज्यातील व्यक्तीकडून बंगला बांधला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार सांगताच सभागृहात उपस्थित असणाऱ्यांच्या पूजा शर्माचा प्रकार झटकन नजरेसमोरून गेला असणार. याशिवाय आगरवाड्यात एका नाल्यावर घर बांधले गेले आहे, हेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आरोलकरांनी सांगितलेल्या बेकायदेशीर कृत्यावर सरकार काय पावले उचलतेय हे पाहावे लागणार आहे. ∙∙∙

‘पब’वाल्‍याच्‍या मागे पोलिस

नावेली येथे एक फेमस पब चालू आहे. आता पब म्‍हटले की रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा आणि दारूबाजी चालणे हे ओघाने आलेच. त्‍याचा फायदा म्‍हणे, मडगावातील एका पोलिस सायबाने घेतला आहे. हा साहेब रात्रीच्‍यावेळी त्‍या पबमधून तर्र होऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना तालांव देऊ लागला आहे. रात्रीच्‍यावेळी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली, तर त्‍याला कुणीही हरकत घेणार नाही. मात्र, हा साहेब म्‍हणे त्‍या पबवाल्‍यालाच जाऊन भेटला आणि मला पाच लाख रुपये दे तुझ्‍यामागे मी जी साडेसाती लावली आहे त्‍यातून तुला मुक्‍त करू अशी ऑफर त्‍याला दिल्‍याचे कळते. आता बोला! ∙∙∙

कर्नाटकातील वाहनचालकांची मस्ती

गोव्यात हल्लीच्या काळात जे वाढते अपघात होत आहेत, त्यात परराज्यांतील व विशेषतः कर्नाटकातील वाहनांची संख्या जास्त असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. परवा उत्तर गोव्यात एका भाजीवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. नंतर तो चालक पळाला व पोलिसांनी त्याला कर्नाटकातून पकडून आणले. हे आता नित्याचेच झाले आहे. ही पिकअपस्वरूपाची वाहने कर्नाटकातून भाजी, फळे, फुले, मटण व मांस तसेच अंडी वगैरे घेऊन येतात. त्यांची सीमेवरील नाक्यांवर तपासणी होते की नाही याची कोणालाच कल्पना नसते, पण ही वाहने भरधाव हाकली जातात व त्यामुळेच ती नियंत्रणाबाहेर जाऊन अपघात होतात. त्यांच्या या वेगाबाबत अनेक तक्रारी झालेल्या आहेत, पण त्यांच्यावर कारवाई केल्याचे दिसत नाही. कारण त्यांचा वेग तसाच असतो अशा लोकांच्या तक्रारी आहेत. मग हे अपघात टळतील तरी कसे अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙∙

फळदेसाई - बाबूश वाद

बायंगिणी कचरा प्रकल्पावरून पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यात शाब्दिक वाद हा काही नवा राहिला नाही. मोन्सेरात यांनी बायंगिणी कचरा प्रकल्पाची निविदा काढली जाणार असे सांगितल्याने फळदेसाई यांची झोप उडाली. त्यांनी त्वरित बायंगिणीच्या जागेत घरे बांधलेल्या नागरिकांचे मसिहा होऊन त्यांनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले, परंतु विधानसभा अधिवेशनात फळदेसाई यांनी कचरा व्यवस्थापनावरील चर्चेत मात्र नमती भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी बाबूश यांचा डॅशिंग म्हणून उल्लेख केला. याशिवाय हे सांगत असताना त्यांनी कचरा प्रकल्प स्थलांतरित करावा, असेही सुचविले. त्यामुळे कदाचित फळदेसाई यांना सध्यातरी नमते घ्यावे, अशी सुबुद्धी सुचली असावी. ∙∙∙

टीकेस कारण

जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बाँ जीजस या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव आहे. ते भाविकांच्या दर्शनासाठी दहा वर्षांतून एकदा ठेवले जाते. २० लाख लोक यानिमित्ताने डिसेंबरमध्ये गोव्यात येणार आहेत. यासाठी सुविधा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने ३०० कोटी रुपये मागितले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची मंगळवारी संधी सोडली नाही. एका रुपयाचीही तरतूद या सोहळ्यासाठी केले गेली नसल्याची टीका हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी केली आहे. सरकार हा निधी मिळेल असे सांगत असले, तरी विरोधकांकडून हे निमित्त साधत टीका केली जाऊ लागली आहे. ∙∙∙

हुश्श! ‘नीट’ पुन्हा नाही

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गाण्याच्या ओळी आपण ऐकल्याच असणार. कधी कधी आपल्या आयुष्यात असे म्हणण्याची पाळी येते. वैद्यकीय शिक्षणासाठी गरजेच्या असलेल्या नीट प्रवेश परीक्षेत गौडबंगाल केले काही मोजक्याच विद्यार्थ्यांनी व काही लोभींनी. मात्र, याचा फटका बसला परीक्षा दिलेल्या पंधरा लाख विद्यार्थ्यांना. नीट प्रवेश परीक्षेतील भ्रष्टाचार व गैरकारभार उघड झाल्यावर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले. नीट प्रवेश परीक्षा पुन्हा होणार व आपण केलेले सगळे श्रम पाण्यात जाणार ही भीती शिकून चांगले गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना होती. मात्र, न्यायालयाने प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याची गरज नाही असा निवाडा दिल्याने परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला एवढे मात्र नक्की. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: साहेब रात्रीच्‍यावेळी त्‍या पबमधून तर्र होऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना तालांव देऊ लागला आहे
खरी कुजबुज: ...आणि तिजोरीतही खड्डेच खड्डे!

अष्टपैलू कलाकार...

हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा हे नामांकित वकील. यापूर्वी त्यांनी महाअधिवक्ता म्हणून सरकारची बाजू मांडली आहे. याशिवाय ते उत्कृष्ट वक्ता आहेतच. विधानसभेत ते चांगले मुद्देसूद विषय मांडतात. अलीकडेच, फेरेरा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात ते डान्स करताना दिसतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय फेरेरा हे उत्तम पिआनोवादकसुद्धा आहेत. अशातच, फेरेरा यांचा हा नृत्य करतानाचा व्हिडिओ लक्षवेधी ठरत आहे. आता कार्लुसबाब हे सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या फेरेरा यांना लोक अष्टपैलू कलाकार असे म्हणू लागले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: साहेब रात्रीच्‍यावेळी त्‍या पबमधून तर्र होऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना तालांव देऊ लागला आहे
खरी कुजबुज: सुदिन भुरगो!

बदनामीमुळे पोलिसांत नाराजी

पोलिस खात्यातील कर्मचारी दारू व ड्रग्ज सेवन करण्याबरोबरच जुगार खेळतात. यासंदर्भातची माहिती पोलिस अधीक्षकांना देण्याच्या निर्देशांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी हा आदेश काढला आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने हा आदेश काढला आहे त्यांच्याकडे ड्रग्स सेवन करणारे पोलिस किती आहेत हे स्पष्ट करावेत. या आदेशामुळे सामान्य नागरिक पोलिसांकडे संशयाने पाहू लागले आहेत. भ्रष्टाचारामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे त्यातच या आदेशामुळे भर पडली आहे. हा आदेश काढण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक पोलिस भेट देऊन दारू सेवन करून ड्युटीवरील पोलिसांवर किंवा जुगार खेळणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई करायला हवी. हा आदेश काढून अधिकाऱ्यांनी पोलिस खात्याचीच बदनामी केली आहे असे पडसाद उमटत आहेत. काही मोजक्याच पोलिसांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. लोक पोलिसांकडे दारुडा व जुगारी या नजरेने पाहू लागले आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com