Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: खंवटेसाहेब गप्प का?

Khari Kujbuj Political Satire: आता लवकरच ‘मिनी सनबर्न’ संकल्पना पुढे आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

खंवटेसाहेब गप्प का?

सध्या समाजमाध्यमावर पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी विजय सरदेसाईंना मारलेल्या मिठीवर खमंग चर्चा चाललेली पहायला मिळते. काहींनी हे सेटींग तर नव्हे ना अशी शंका व्यक्त केलेली असली तरी विजयबाबांनी ती फेटाळून शंकानिरसन केलेले आहे. यापूर्वी अशीच लोकसभेत राहूलबाबांनी पंतप्रधान मोदींना मारलेली मिठी अशीच चर्चेत होती. साधारण तशीच चर्चा गोव्यांतील या मिठीची चाललेली आढळते. पण पर्यटनमंत्र्यांनी अजून त्यावर काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. खरे तर ती नेमकी कशासाठी मारली ते तरी सांगायला हवे होते पण अजून त्यांनी ते न सांगितल्याने लोकांमध्ये तर्कवितर्क केले जात आहेत. निदान त्यासाठी तरी खवंटे यांनी तोंड उघडायला हवे असे भाजपवालेच म्हणत आहेत. तर काहींना उभयतांमधील २०१२ तील ‘याराना’ ची आठवण होऊन त्यांतून त्यांनी ही मिठी मारली नसावी ना, असे वाटते. खरे काय ते खंवटेच सांगू शकतील. ∙∙∙

मिनी सनबर्न?

मिनी बस, मिनी मोबाईल, मिनी बॉटल या गोष्टींबाबत सगळ्यांनी ऐकले असणार, आता लवकरच ‘मिनी सनबर्न’ ही आयोजित होण्याची संकल्पना पुढे आली आहे, तेही वारसा स्थळ असलेल्या जुने गोवे येथे. ही संकल्पना स्वतः आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितल्यानंतर सोशल मीडियावर यावरून प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचे दिसते. कुंभारजुवे मतदारसंघातील युवकांना म्हणे उत्तर गोव्यात वागातोर किंवा दक्षिण गोव्यात जाण्याचे कष्ट होऊ नयेत, यासाठी ‘मिनी सनबर्न’ जुने गोवे येथे आयोजित करण्याची कल्पना आली. युवकांसाठी ‘मिनी सनबर्न’ ऐवजी रोजगार निर्मिती करा, अशा प्रतिक्रिया लोकांनी सोशल मीडियावर उमटत आहेत. ∙∙∙

बोलके आमदार झाले ‘मौनीबाबा’!

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड इतके लोकप्रिय की, ते चौथ्यांदा कुडतरीतून विधानसभेवर निवडून आले आहेत. विरोधी पक्षात असताना ते अगदी बोलके होते. सरकारवर कडाडून टीका करायचे. आता सरकार पक्षाला पाठिंबा देऊन बसले व त्यांनी मौनव्रत धारण केले. सध्या ते मौनीबाबा झाल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे. दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ बेतूल पठारावरील ‘आयडीसी’च्या जागेत आयोजित करण्यात येईल, अशी वदंता आहे. ‘आयडीसी’चे चेअरमन रेजिनाल्डबाब आहेत. व त्यांनाच हे माहीत नसावे, याचे आश्र्चर्य कोणालाही वाटणे साहजिकच आहे. शिवाय ‘सनबर्न’ दक्षिण गोव्यात आयोजित करण्यास रेजिनाल्ड जबाबदार असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. तरीही रेजिनाल्ड बाब अजूनही तोंड उघडत नाहीत. त्यामुळे नेमके हे प्रकरण काय, याबद्दल लोकांना उत्सुकता लागली तर त्यात नवल ते काय? ∙∙∙

‘वीज नाहीचा’ दावा अन् बेकायदा जोडणी!

सांगे मतदारसंघातील एकाला दीड महिन्या पासून विजेशिवाय राहावे लागले आणि स्थानिक आमदार ,सरकार व वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे त्या कुटुंबाला शेकोटीच्या आगीत दीड महिन्याच्या रात्री काढाव्या लागल्या, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रात आली,अन् आमदार सुभाष फळदेसाई तसेच सरकारवर विरोधक तुटून पडले. मात्र, आता ही बातमी छापल्यानंतर जे घडले ते पाहून वीज नसल्याचा दावा करणारे ते कुटुंब डोक्यावर हात मारून घेत आहे. खरे म्हणजे त्या माणसाने म्हणे बेकायदेशीर घर नंबर घेऊन बेकायदा कागदपत्रे दाखवून वीज जोडणी घेतली तीही सर्व्हिस केबल वर हे सिद्ध झालेय. आता वीज खाते व स्थानिक पंचायत ‘त्या’ घर मालकावर कठोर कारवाई करणार असल्याचे कळते. ∙∙∙

त्याची डिमांडच मोठी !

दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी मराठीत एक म्हण आहे. काही क्षेत्रात चुकीची माणसे घुसल्यामुळे काही चुकीच्या प्रवृत्ती मूळ धरू लागल्या आहेत.आता सोशल मीडियामुळे तथाकथित पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. सांगे व केपे तालुक्यात यूट्यूब चॅनल चालविणाऱ्या एका पत्रकाराने कॅमेरा घेण्यासाठी एका मंत्र्याकडे म्हणे चाळीस हजारांची मागणी केली. त्या मंत्र्याने मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दाखवल्याचा राग व्यक्त करण्यासाठी आता तो सोशल मीडिया पत्रकार यू ट्यूब चॅनल वर त्या मंत्र्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. कॅमेरा द्या नाही तर, विरोधी बातम्या थांबणार नाहीत, असा पवित्रा त्या सोशल मीडिया पत्रकाराने घेतल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙

‘त्या’नाच सेवावाढ का?

विधानसभेत सगळ्या विषयावर चर्चा होते मात्र काही मोजक्याच लाडक्या सरकारी अधिकाऱ्यांना वारंवार मिळणाऱ्या सेवावाढीवर विधानसभेत चर्चा का होत नाही? असा प्रश्‍न सरकारी अधिकारीच विचारू लागले आहेत. ‘एफडीए’च्या एकाला गेल्या वर्षी वर्षाची सेवावाढ दिली होती, ती संपत आली. आता म्हणे आणखी एका वर्षाची सेवावाढ मिळणार आहे. ‘कदंब’च्या ‘एमडी’ ना यापूर्वी विक्रमी वेळा सेवावाढ देण्यात आली होती. एका पोलिस अधीक्षकाला दोनदा सेवावाढ दिली, एक नव्हे अशा शंभरावर ज्येष्ठांना सरकार पोसत आहे. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मिळणारी हक्काची सेवावाढ सावंत सरकारने बंद केली. मात्र, मर्जीतल्या चेल्यांना सेवावाढ देण्यास मागे राहत नाहीत,अशी चर्चा आहे. ∙∙∙

राजकारणात यायचं नव्हतं पण..!

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी फोंड्यात एका विद्यार्थी गौरव सोहळा कार्यक्रमात आपला जीवन प्रवास उलगडला. आपण जीवनात करायचे एक असे ठरवले होते, पण झाले भलतेच, असे सांगताना त्यांनी राजकारणाचा हवाला दिला. वास्तविक नौदलातील सेवेनंतर परदेशात नोकरी करायची होती पण गोव्यातील विविध आंदोलनात सहभागी झालो आणि शेवटी खासदार झालो, असे त्यांनी नमूद केले. मुद्देसूद आणि रंजकपणे त्यांनी जीवन प्रवासाविषयी सांगताना आपल्याला राजकारण करायचेच नव्हते, पण आपण ओढले गेलो. तेही एका अर्थी बरे झाले असे सांगून निदान लोकांच्या समस्यांशी तरी भिडायला मिळाले. भ्रष्टाचार, अनागोंदी याला देशात ऊत आला आहे, हे कुठे तरी थांबायला हवे, असेही त्यांनी सांगितले. आता असे खासदार फार कमी मिळतात. जो राजकारणात येतो, तो दोन्ही हातांनी भरभरून नेतो. राजकारणी लोक विशेषतः पांढरे कपडे घालतात, कदाचित आपले डाग दुसऱ्यांना दिसू नयेत, म्हणूनच ते ही कृती करीत असावेत, असे सांगायलाही कॅप्टनबाब विसरले नाहीत. ∙∙∙

कोकणी भाषा मंडळ कुठे आहे?

राजभाषा कायद्यात रोमी कोकणीला काही स्थान नाही. मात्र, रोमीलाही या कायद्यात समान दर्जा द्यावा, अशी मागणी आता अल्पसंख्याक समाजातील काही नेत्यांकडून होत असून विदेशस्थ गोमंतकीयांच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न आपल्यापरीने जागतिक पातळीवर नेण्याचाही प्रयत्न केला आहे. विधानसभेतील अल्पसंख्याक समाजाच्या आमदारांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रोमीच्या समर्थकांनी आपली मागणी नेटाने पुढे रेटली असताना नागरी समर्थकांची मुख्य संघटना असलेल्या कोकणी भाषा मंडळाने मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी साधे निषेधाचे पत्रकही काढलेले नाही. का बरे सरकारी अनुदान घेऊन कार्यक्रम करण्यात दंग असलेले भाषा मंडळ आपली संघर्षाची भूमिका आता विसरले का? ∙∙∙

‘आप’ने आंदोलन हायजॅक केले?

शनिवारी सकाळी मडगावात जिल्हाधिकारी इमारतीबाहेर चिंताग्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन ‘सनबर्न’ विरोधात आंदोलन केले व जोरदार घोषणाही दिल्या. नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या व एवढ्यात ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमितबाब, आमदार क्रुझ सिल्वा, पदाधिकारी वाल्मिकी नायक व ‘आप’चे बरेचसे कार्यकर्ते तिथे जमले व त्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते मात्र दिसले नाहीत. जर ‘आप’ असेल तर आम्ही थोडे मागे राहिलेले बरे असा, अनुभव बाणावलीतील जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीतून काँग्रेसला आला नसेल ना, अशी चर्चा लगेच सुरू झाली. ‘सनबर्न’ विरोधी आंदोलन ‘आप’ने हायजॅक तर केले नसेल ना, अशीही चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙

दिव्यांगांनी काय करावयाचे?

दिव्यांगांच्या समस्यांबाबत वरचेवर चर्चा होत असते. अनेक मजली इमारतीत जेथे सरकारी कार्यालये आहेत, पण तेथील लिफ्ट चालत नाही व जिथे लिफ्ट नाही त्यांच्या समस्यांवरही अधून मधून चर्चा होते. हल्लीच तर विरोधी सदस्यांनी दिव्यांगांबाबत सरकार उदासीन असल्याचाही ठपका ठेवला. पण पहिल्या मजल्यावर बॅंका असल्यास तेथे दिव्यांगांनी वा ज्येष्ठ नागरिकांनी काय करावयाचे त्याचे उत्तर मात्र संबंधित नाहीत. मडगावांत आके भागात अशीच एका राष्ट्रीयकृत बॅंकेची शाखा आहे. तेथे लिफ्ट नाही. पायऱ्या आहेत पण पावसाळ्यात त्या निसरड्या होतात. प्रश्न तेवढ्यावर संपत नाही. तेथील बॅंक पासबुक अपडेट करण्याचे मशीन गेले अनेक महिने बंद आहे व तेथील कर्मचारी ते करण्यासाठी एटीएम मध्ये जाण्यास सांगतात. निसरड्या पायऱ्या चढून वर आलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी असे हेलपाटे मारावयाचे का, याचे उत्तर कोणी देत माही. ‘गोवा कॅन’ वाल्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT