खरी कुजबुज: ...युरीबाब फिरू लागले!

Khari Kujbuj Political Satire: भाजपाचा एक ज्येष्ठ नेता म्हणालाही, पर्रीकरांना विधानसभा अधिवेशन म्हणजे चित्रपट निर्मिती असे वाटत होते व ते स्वतः ‘नायका’ची भूमिका करीत
Khari Kujbuj Political Satire: भाजपाचा एक ज्येष्ठ नेता म्हणालाही, पर्रीकरांना विधानसभा अधिवेशन म्हणजे चित्रपट निर्मिती असे वाटत होते व ते स्वतः ‘नायका’ची भूमिका करीत
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

...युरीबाब फिरू लागले!

काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राला विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी भेट देऊन तेथील समस्या पाहिल्या व काणकोणातील इतरांच्या नसल्या तरी काँग्रेसवाल्यांच्या भुवया उंचावल्या. कारण विरोधी पक्ष नेता झाल्यापासून त्यांनी गोव्याच्या दक्षिण टोकावरील या भागाला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच भेटी दिल्या आहेत. खुद्द त्यांच्या कुंकळ्ळीतील मतदार ते आपणाला भेटत नसल्याच्या तक्रारी करत आहेत. विशेषतः गोवा फॅारवर्डच्या विजय सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनापूर्वी गोव्याच्या विविध भागात दरबार भरवून लोकांचे प्रश्न जाणून घेतले, तेव्हापासून काँग्रेसवाले अस्वस्थ झाले होते. पण युरींच्या काणकोण भेटीने त्यांना दिलासा मिळाला. विरोधी नेत्याने राज्याच्या अन्य मतदारसंघात, निदान तालुक्यात दौरे करून लोकांचे प्रश्न जाणून घ्यावेत, त्यामुळे मरगळलेली पक्ष संघटना तरी सावरेल, असे पक्षकार्यकर्ते म्हणू लागले आहेत. ∙∙∙

सतीश धोंडची अनुपस्थिती

विधानसभा अधिवेशनात भाजपाचे कधी नव्हे, ते गैरव्यवस्थापन किंवा ‘फ्लोअर मॅनेजमेंट’चा अभाव सामोरे आला आहे. अशावेळी भाजपाचे काही जुने निष्ठावान नेते सतीश धोंड यांचा हवाला देतात. धोंड संघटनमंत्री असताना मोठ्या अधिवेशनांना पूर्णवेळ उपस्थित राहात. काही आमदार त्यांना ‘मास्तर’ म्हणत. नवे आमदार तर त्यांना अक्षरशः घाबरत. ते सकाळपासून मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून राहात व आमदारांना विशिष्ट सूचना देत. कधी आमदारांनी उठून उभे राहावे, गडबड कधी करावी, मोठमोठ्यांनी आवाज कधी करावा व सत्ताधाऱ्यांवर तुटून कसे पडावे, याबाबत विशिष्ट सूचना करीत असत. सतीश धोंड असताना विधानसभेत ‘झोपा’ काढण्याची कोणाची टाप नव्हती! सतीश धोंड यांची ती सवयच होती. ते कोणाला स्वस्थ बसू देत नसत, परंतु त्यामुळे विधानसभेत भाजपाची कामगिरी अव्वल ठरत असे, यात शंकाच नाही! ∙∙∙

पर्रीकर आणि सध्याचे विरोधक!

गोवा विधानसभेतील मनोहर पर्रीकरांची कामगिरी लक्षणीय मानली जाते. विधानसभा कामगिरी हा तर त्यांचा आवडीचा विषय होता. भाजपाचा एक ज्येष्ठ नेता म्हणालाही, पर्रीकरांना विधानसभा अधिवेशन म्हणजे चित्रपट निर्मिती असे वाटत होते व ते स्वतः ‘नायका’ची भूमिका करीत. अधिवेशन चालू असताना ते आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना लवकर बोलावून घेत. ९.३० वाजता सर्व आमदारांना फोनाफोनी चालू करीत. १० वाजेपर्यंत सर्वांना विधान भवनात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जात. महिना अगोदरपासून ते स्वतः तयारी करीत. त्यावेळी त्यांना कोणी त्रास देऊ नये अशा सूचना असत. आमदारांना सकाळी आपणासमोर बसवून ते अक्षरशः त्यांचा वर्ग घेत. विरोधी नेता असताना ते स्वतःच प्रश्‍न तयार करीत व त्या त्या आमदारांच्या नावे ते पाठवले जात. एवढे तंतोतंत फ्लोअर मॅनेजमेंट व एवढी व्यूहरचना करणारा विरोधी नेता गोव्यात क्वचितच घडला असेल. अधिवेशन चालू असताना ते व त्यांचे कर्मचारी कागदांचे गठ्ठे घेऊन सभागृहात येत. कागदपत्रे, पुरावे...विरोधी नेत्याला विशेषतः युरी आलेमांव यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. विजय सरदेसाईं सभागृहात रोहन खंवटेंवर तुटून पडले व बाहेर पडल्यावर रोहन खंवटेंनी त्यांना मिठी मारली… समाजमाध्यमांवर हे छायाचित्र चट्‍कन फिरले... पर्रीकरांना मिठी मारण्याची हिंमत कोणाला झाली नसती. सध्या विरोधकांना ‘मॅनेज’ केले जाते, असा गोव्यात सर्वत्र समज पसरला आहे, तो उगीच नाही!∙∙∙

उपरे मंत्री, गैरव्यवस्थापन

पावसाळी विधानसभा अधिवेशनावर भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. भाजपाच्या एकनिष्ठ नेत्यांचे मंत्र्यांच्या कामगिरीविषयी अनुकूल मत नाही. अनेक मंत्री विधानसभेत ‘उपरे’ कसे वागतात. त्यांच्यात ‘कामकाज कसे हाताळावे’, व्यूहनीती कशी रचावी, यासंदर्भात नियोजन नाही. रवी नाईक, सुभाष शिरोडकर सरकारच्या समर्थनार्थ धावून जात नाहीत. विश्‍वजीत, बाबूश, रोहन खंवटे सभागृहात बसून राहात नाहीत, सरकारला पाठिंबा देण्यासाठी उठून उभे राहात नाहीत. आलेक्स सिक्वेरा वृद्ध झाले आहेत. सुदिन ढवळीकर यांची स्मृती दगा देते का? विजय सरदेसाईंनी त्यांना डिमेंशिया झाल्याची टीका केली... भाजपाचे सरकार चालू आहे आणि सरकारला ३३ जणांचा भरभक्कम पाठिंबा आहे, असे वाटत नाही… केवळ मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्या आत्मविश्‍वासाच्या जोरावर एकटे किल्ला लढवतात... भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना हे खटकते व स्वतः प्रेक्षक गॅलरीत बसून प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी या ‘गैरव्यवस्थापना’चा आढावा घेतला आहे. नजीकच्या काळात भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये या प्रकरणावर निश्‍चित चर्चा होणार आहे. ∙∙∙

...आपलेच ढोल वाजवू लागले!

कित्‍येकवेळा आपल्‍या जीवाचीही पर्वा न करता वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्‍या मागे धावून त्‍यांना अडविणाऱ्या आणि आपले होमगार्डचे काम चोख पार पाडणाऱ्या विमल शिरोडकर हिचे कित्‍येकांनी कौतुक केले. कित्‍येक संस्‍थांनी तिचा सत्‍कारही केला. पण ती जेव्‍हा निवृत्त झाली, त्‍यावेळी कुणीतरी आपल्‍याला घराचा आसरा द्यावा, अशी तिने कळकळीने केलेल्‍या मागणीकडे कोणी लक्ष दिले नाही. आता ही विमल ज्‍या भाटकाराच्‍या पडक्‍या घरात रहात होती, ते घर चार दिवसांपूर्वी पावसाने जमीनदोस्‍त केले. तिला त्‍यानंतर मदत करण्‍याच्‍या बहाण्‍याने काहीजणांनी या प्रश्नाला राजकीय बगल देण्‍याचाही प्रयत्‍न केला. यावर विधानसभेत भाष्‍य करताना मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधकांना कानपिचक्‍या देताना, विमलला सरकार मदत करु पहात असताना काहीजण आपलेच ढोल वाजवू लागले आहेत, अशी मल्लिनाथी केली. अर्थांतच त्‍यांचा हा बाण काँग्रेस खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्‍याबाजूने होता. प्रत्‍यक्षात याप्रश्नी खुद्द विमलचाच ढोल झाला आहे. जो प्रत्‍येकजण येऊन वाजविण्‍याचा प्रयत्‍न करतो, यावर कुणाचे लक्ष जाईल का?

बाबा-बाबू आणि भाई

गोव्‍यात दुसऱ्या पक्षातील आमदारांना आपल्‍याकडे ओढून आपले सरकार स्‍थिर करण्‍याच्‍या राजकारणाला जर कुणी मान्‍यताप्राप्‍त केले असेल, तर ते दिवंगत माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच. कधी बाबूश कधी मिकी अशांना घेऊन पर्रीकरांनी आपले सरकार चालविले. पण आपल्‍या हयातीत त्‍यांनी दोघांना कधीही जवळ केले नव्‍हते, ते म्‍हणजे, भाजप सोडून काँग्रेसमध्‍ये गेलेले दिगंबर कामत आणि केपेचे आमदार बाबू कवळेकर हे दोघे. आणखी कुणीही चालतील, पण हे बाबा-बाबू नकोत, असे भाई पर्रीकरांचे म्‍हणणे होते. आज पर्रीकर हयात नाहीत आणि बाबा आणि बाबू दोघेही भाजपात आहेत. काल नवीन भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करताना हे बाबा आणि बाबू दोघेही मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या डावीकडे आणि उजवीकडे होते. हे चित्र मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांचे गुरु मनोहर पर्रीकर पाहिले असते, तर त्‍यांना काय बरे वाटले असते? ∙∙∙

राजकारणातील शब्दप्रयोग

राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वेगवेगळे शब्द प्रयोग करतात. लोकसभा निवडणुकीत ‘लापिट’ हा शब्द गाजला. सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात अशाच प्रकारचे शब्द कानावर पडतात. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता याने भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथोनी बार्बोजाला ‘चिल्लर’ हा शब्द वापरला. ‘चिल्लर’ म्हणजे एरव्ही सामान्य. अँथोनी आता एक प्रस्थापित राजकारणी म्हणून गणले जातात. अशा वेळी त्यांना ‘चिल्लर’ म्हटल्यावर राग आला किंवा वाईट वाटले, यात गैर ते काय? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: भाजपाचा एक ज्येष्ठ नेता म्हणालाही, पर्रीकरांना विधानसभा अधिवेशन म्हणजे चित्रपट निर्मिती असे वाटत होते व ते स्वतः ‘नायका’ची भूमिका करीत
खरी कुजबुज: ...आणि तिजोरीतही खड्डेच खड्डे!

खंवटेंच्या मिठीचे मोल

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विजय सरदेसाई यांना मिठी मारली. तत्पूर्वी सरदेसाई यांनी विधानसभेत पर्यटन मंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला होता. त्यामुळे या मिठी मागे नेमका हेतू काय असावा, हे जाणून घेण्याची उत्सुकता गोमंतकीयांना लागली, तर त्यात नवल ते काय? विजय सरदेसाई यांच्या मते ही ‘मिठी’ गोंयकारपणाचे प्रतीक. टिका केली म्हणजे आपण खंवटे यांचे डोके फोडावे, अशी अपेक्षा कोणीही बाळगू नये. आपण जे सांगितले ते सत्य असल्याचे पर्यटन मंत्र्यांना पटले असावे, म्हणून त्यांनी मिठी मारली असावी. मात्र हे मॅच फिक्सिंग नसल्याचे सांगण्यास विजयबाब विसरले नाहीत. हा मुद्दा सुद्धा लोकांना थोडा विस्मयचकित करणारा नाही का! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: भाजपाचा एक ज्येष्ठ नेता म्हणालाही, पर्रीकरांना विधानसभा अधिवेशन म्हणजे चित्रपट निर्मिती असे वाटत होते व ते स्वतः ‘नायका’ची भूमिका करीत
खरी कुजबुज: सुदिन भुरगो!

पोलिसांचे धाबे दणाणले..

पोलिस स्थानकात जुगार खेळणाऱ्या किंवा दारू पिणाऱ्या अशा बेशिस्त पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. डीजीपी यांच्याकडून तशा सूचना आल्या. मुळात पोलिस वरिष्ठांकडून ही कारवाई आधी होणे अपेक्षित होते. कारण पोलिस स्थानकाच्या बॅरेकमध्ये हे प्रकार सर्रास चालतात अन् स्थानकाचे इन्चार्ज देखील याकडे डोळेझाक करतात. हे उघड सत्य आहे. काही पोलिस तर दिवसरात्र याच पत्त्यांच्या जुगारात मग्न असतात! याशिवाय काही पोलिस तर नाईट ड्युटीच्या वेळी टर्र असतात. परिणामी या आदेशामुळे सध्या हे जे जुगार किंवा दारू पिऊन ऑन ड्युटी टर्र असतात त्यांचे म्हणे धाबे दणाणले. काहींनी तर बॅरेक मधील असलेले पत्यांचे कॅट तसेच दारूंच्या बाटल्या बाहेर फेकून दिले. आता हा धाक या बेशिस्त पोलिसांमध्ये किती दिवस राहतो, हे पाहावे लागेल. कारण अधिवेशन सुरू आहे, तोपर्यंत तरी कुणी धाडस करणार नाही आणि केल्यास संबंधितांवर राजकीय वरदहस्त जबरदस्तच आहे, असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com