Khari Kujbuj Political Satire  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: सुदिन भुरगो!

गोमन्तक डिजिटल टीम

सुदिन भुरगो!

अस्मिता दिवस याविषयावर रवी नाईक विधानसभेत शुक्रवारी बोलताना ‘सुदिन हो तेन्ना भुरगो’, मीच त्यांना ‘मगो’त आणले, असे उद्‍गार काढले. रवी नाईक म्हणाले, दीव दमणने गोव्याला विलीनीकरणाच्या जनमत कौलावेळी वाचवले. दीव दमण नसते तर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता. राजभवनावर एखादा उपजिल्हाधिकारी बसला असता आणि आमचा विकास झाला नसता. त्यावेळी कोणीतरी हे सुदिन यांना सांगा, असे बसल्याजागी सुचवले. तेव्हा सुदिन हे तेव्हा लहान होते. त्यांनाच मी ‘मगो’त आणले, असे रवी नाईक म्हणाले. सुदिन यांनी आपल्या नावाविषयी आक्षेप नोंदवताना सांगितले, सुरवातीची १७ वर्षे ‘मगो’ची गोव्यात सत्ता होती. रवी नाईक यांनीही ‘मगो’तूनच कारकिर्द सुरू केली आहे. ∙∙∙

बोक्‍याची दहशत!

तुम्‍ही कदाचित वाघाची किंवा बिबट्याची दहशत हा प्रकार ऐकला असेल. पण केप्यात लाेकांना चक्‍क एका बोक्‍याची दहशत सतावतेय. हा बोका तसा रस्‍त्‍यावर सोडलेलाच. पण केप्यातील एका दुकानदाराने त्‍याला मांजरासाठी घातले जाणारे खाद्य खायला घालायला सुरुवात केल्‍याने हा बाेका भलताच माजला असून आता तो लोकांवर हल्‍लाही करू लागला आहे. काही दिवसांपूर्वी या बोक्‍याने एका शाळकरी विद्यार्थ्‍यावर हल्ला केला होता. हा बोका केपे बसस्‍थानक परिसरात फिरतो आणि याच आवारात एक शाळा चालते. त्‍यामुळे या बोक्‍याची दहशत विद्यार्थ्‍यांबराेबर त्‍यांच्‍या पालकांनाही सतावू लागली आहे. यावर कुणी काय उपाय करतील का? ∙∙∙

मंत्री काय कामाचे?

फोंडा येथे उपजिल्हा इस्पितळ आहे. जिल्हा इस्पितळाखालोखाल सुविधा तिथे हव्यात, मात्र तसे प्रत्यक्षात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राइतक्याच सुविधा या इस्पितळात आहेत. फोंडा तालुका तसा सध्या राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत. गोविंद गावडे, रवी नाईक, सुदिन ढवळीकर व सुभाष शिरोडकर असे १२ पैकी ४ मंत्री एकट्या फोंडा तालुक्यातील आहेत. एवढे असूनही ते फोंडा तालुक्याच्या इस्पितळात गोमेकॉच्या धर्तीवर सेवा मिळवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चार मंत्री असून फोंड्याच्या जनतेला फायदा काय, असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.हे इस्पितळ केवळ गोमेकॉत रुग्ण पाठवण्यापुरतेच आहे का, अशी संतप्त विचारणा होतानाही दिसत आहे. ∙∙∙

खड्डेमय रस्त्यांचाही नवा विक्रम?

गोव्यात यंदा पाऊस नवा विक्रम करणार, अशी चिन्हे दिसत आहेत. कारण जुलै संपायला अजून आठवडा आहे व पाऊस इंचाचे शतक करण्याच्या जवळ पोचलेला आहे. हवामान खात्याने यंदा पाऊस समाधानकारक असेल, असे म्हटले होते. पण गेल्या पंधरवड्यापासून पाऊस असा काही कोसळत आहे, की त्याने सूर्याचे दर्शनही होऊ दिलेले नाही, अशी जनमानसांतील प्रतिक्रिया आहे. पावसामुळे गोव्यातील रस्त्यांची हालत इतकी खराब झालेली आहे, की खड्डे नसलेला रस्ता शोधून सापडणे कठीण झालेय. केवळ शहरी भागातूनच नव्हे तर तालुका व ग्रामीण भागांतील लोकांच्याही याच तक्रारी आहेत. एरवी त्यांचे प्रमाण कमी असायचे पण पावसाबरोबरच खड्डेमय रस्तेही यंदा विक्रम प्रस्थापित करतील,की काय असे लोकांच्या तक्रारींवरून दिसते. या तक्रारींचा सामना करणे कठिण झाल्याने ‘साबांखा’च्या कार्यालयात येण्याचे अभियंते टाळू लागले आहेत म्हणे. कोसळलेल्या दरडींचे प्रकरण तर वेगळेच आहे. ∙∙∙

गुरे झाली आता भटकी कुत्री!

भटक्या कुत्र्यांवर वर्षभरात तोडगा काढण्याची हमी आपल्या दोतोर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. काहींनी त्यामुळे सुस्कारा सोडला असला तरी अशीच हमी त्यांनी भटक्या गुरांबाबत मागे दिली होती. याचा अनेकांना विसर पडलेला असावा. अन्यथा टाळ्या वाजविणाऱ्यांनी त्यांना त्याबाबत सवाल नक्कीच केला असता. न्यायालयानेही भटक्या गुरांबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या पण त्या गांभिर्याने घेतल्या जात नाहीत हेच रस्त्यांवर ठाण मांडून बसलेली वा वाहनांना वा रेल्वे गाड्यांना आदळून मरण पावलेल्या गुरांवरून दिसून येते. काही बिगरसरकारी संस्थांनी भटक्या गुरांसाठी गोशाळा सुरू केलेल्या आहेत तेथे अशी गुरे पाठविणे शक्य आहे, पण ते होत नाही. हीच गोष्ट भटक्या कुत्र्यांची आहे. या प्राण्यांची काळजी घेणाऱ्याही संस्था व संघटना आहेत, त्यांना आर्थिक मदत केली तर समस्या सुटू शकते, पण इव्हेंट मध्ये मश्गूल असणाऱ्यांना हे सांगणार कोण,अशी विचारणा अशा प्राण्यांमुळे त्रस्त असलेले करताहेत. ∙∙∙

शौचालयाची जागा कुणाची ?

म्हापसा शहरातील काही दिवसांपूर्वी एक सार्वजनिक शौचालय जेसीबीच्या सहाय्याने अज्ञाताकडून जमीनदोस्त करण्यात आले. हे शौचालय पालिकेच्या मालकीचे होते. परंतु या प्रकाराबाबत पालिकेने अद्याप कारवाई केलेली दिसत नाही. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठविला होता. परंतु अद्याप पालिकेकडून तरी कारवाईसाठी हालचाली होताना दिसत नाहीत. पालिका अजूनही म्हणे कागदपत्रांची छाननीच करत असल्याचे समजते. ही जागा नेमकी कोणाची? यावर कुणीच बोलत नाही. आता पालिकेला यावर कारवाई करायची नाही की, कुणाला पाठिशी घालायचे आहे? नक्की चालले तरी काय, असा प्रश्न म्हापसेकरांना पडलाय... ∙∙∙

राज्यातले रस्ते ‘वर्ल्ड क्लास’ !

गोव्यातील सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते बनवण्यात ‘वर्ल्ड क्लास’ असल्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून सोशल मीडियावर देणे हे नित्याचे झाल्याचे दिसते, परंतु ही स्तुति नसून उपहास आहे. राज्यातील रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चtन रस्ते हॉटमिक्स केले जातात, मात्र पहिल्या पावसातच ते वाहून जाण्याचे प्रकार सातत्याने घडू लागेत. मुख्य म्हणजे सरकार आणि खात्यातील अधिकाऱ्यांकडून जबाबदारी स्वीकारली जात नाही. त्यामुळे गोवेकरांना दररोज खड्डेयुक्त रस्त्यांवरून वाहतूक करण्याखेरीज पर्याय नाही. या विषयी केंद्र सरकारच्या हितचिंतकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून पोस्ट ही टाकले, तरीही काही फरक पडला नाही, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

वाहतूक कोंडीला फटीचे कारण

नवा पाटो पूल परिसरात सध्या वाहने सावकाश जाताना दिसतात. हा पूल आणि जोड रस्ता यांच्यातील फट आता बरीच रुंदावली आहे. यामुळे तेथे वाहन पोहचल्यावर हादरा टाळण्यासाठी वाहन धीम्या गतीने नेले जाते. वाहनांचा वेग तेथे मंदावत असल्याने वाहने त्या भागात मुंगीच्या गतीने पुढे सरकत असतात. यामुळे पणजी बसस्थानकासमोरील भागात सध्या वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पूल आणि जोड रस्ता यांच्यात गेल्याच आठवड्यात ‘जेट पॅचर’ ने डांबर भरण्याचा प्रयोग केला गेला होता. पावसाच्या माऱ्यात ते डांबर वाहून गेल्याने फट रुंदावली आहे. वाहनाचा मोठा हादरा बसण्याइतपत फट रुंदावल्याने ती वाहतूक कोंडीस कारण ठरू लागली आहे. पणजीत प्रवेश करतानाच अशा फटीच्या रुपाने वाहतूक कोंडीस सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. ∙∙∙

भाटकारांचे हित की, कूळ-मुंडकारांचा कळवळा?

राज्यात कृषी मंत्री रवी नाईक यांच्या पुढाकाराने कूळ मुंडकार संघटना बळकट बनून कुळ मुंडकार कायदा अस्तित्वात आला. मात्र, कूळ मुंडकार खटले गेले अनेक वर्षे मामलेदार कार्यालयात प्रलंबित आहेत.ज्यांनी अनेक वर्षे भाटकारांची अनेक प्रकारे सेवा केली, त्यांना घरापुरतीही जागा भाटकाराने देऊ नये व सरकारही त्याकामी यशस्वी होते, याला काय म्हणावे. निमित्त आहे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई सभापतींच्या ‘श्रमधाम’ योजनेसबंधी अभिनंदन केले. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी भाटकार व अन्य संस्थांचे पदाधिकारी बेघरांना अटल आसरा , दीन दयाळ योजना व अन्य सरकारी योजनांचा फायदा ज्यांना घेता येत नाही, त्यांना सभापती रमेश तवडकर घरे बांधून देत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, या योजनेला खास अनुदान देण्याच्या सरदेसाईंच्या मागणीला त्यांनी बगल दिली, याला काय म्हणावे? भाटकारांचे हित की कूळ-मुडकारांचा कळवळा? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT