खरी कुजबुज: निधी नसेना, घोषणा तरी झाली!

Khari Kujbuj Political Satire: विरोधक स्वतःला ‘पाच पांडव’ म्हणवतात तर मग युधिष्ठीर कोण, अशी विचारणा खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली
Khari Kujbuj Political Satire: विरोधक स्वतःला ‘पाच पांडव’ म्हणवतात तर मग युधिष्ठीर कोण, अशी विचारणा खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

निधी नसेना, घोषणा तरी झाली!

रवी पात्रावांचे एक बरे असते. कुठे नुकसान झाले की, ते लगेच ‘रिॲक्ट'' होतात. सध्या गोव्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे शेती, बागायतींचे नुकसान झाले आहे. रवी पात्रावांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर त्यांनी लगेच खात्यातर्फे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे विधानसभेत जाहीरही केले. रवींच्या या घोषणेमुळे बळीराजा सध्या खूष आहे. नुकसान भरपाईची गोष्ट खूप छान आहे, कारण रवी पात्रावांकडून आश्‍वासन तर मिळाले. पण हे जाहीर झालेले पैसे मिळण्यासाठी किती काळ थांबावे लागेल, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. कारण सरकारच्या गंगाजळीत तर निधीच नाही ना...!

पाणी असल्याचे प्रमाणपत्र आणा!

नव्या नळजोडणीसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करण्याचे सरकारने ठरवले आहे. कच्चे पाणी किती उपलब्ध होते, किती पाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि किती पाण्याचा महसूल मिळतो याचा हिशेब कधीतरी सरकारने घातला पाहिजे. जल वाहिन्यांतून होणारी पाणी गळती रोखली गेली तर किमान २० टक्के जादा पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. पाणी जोडणी हवी तर पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र आण, असे ग्राहकाला सांगण्यात आल्यानंतर ते प्रमाणपत्र मिळवण्याची किंमत त्याला मोजावी लागणार आहे. बांधकाम करण्याआधी असे प्रमाणपत्र घ्या, अशी सक्ती केली तर पाणी नाही तर एखाद्याने घर बांधूच नये, असे कसे म्हणता येणार आहे. सर्वांना पाणी देण्याच्या जबाबदारीपासून सरकार पळू शकत नाही, मात्र ‘पाणी उपलब्धता प्रमाणपत्र’ हे पैसे उकळण्याचे साधन होऊ नये, यासाठीही सरकारला दक्षता घ्यावी लागणार आहे, अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. ∙∙∙

ज्ञानदेव तुकाराम

‘ज्ञानदेव तुकाराम’, असे कोणी विधानसभेत म्हटले तर तो जयघोष, असे मानले पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आषाढी एकादशीच्या बुधवारी जनतेला विधानसभेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. हा जयघोष मात्र पर्यटनमंत्री रोहन खंवटे करत होते. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे त्यांना पर्यटन खात्याच्या ‘रोड शो’वरून चिमटे काढत होते. आकडेवारी समोर ठेऊन ते विविध प्रश्न उपस्थित करत होते. त्यावर ते ज्ञान देत आहेत, असा टोला लगावत खंवटे हे ‘ज्ञानदेव तुकाराम’चा गजर करत होते. विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला ‘ज्ञानदेव, तुकाराम’ यानिमित्ताने तरी आठवले गेले होते. ∙∙∙

‘चीफ्टेन’ वरून राजकारण नको !

‘कारण राजकारण’, असे म्हणतात ते खरे. कुंकळळीच्या ‘चीफ्टेन्स’ उठावाच्या राजकीय कार्यक्रमावरून जे राजकारण चालले आहे, त्यावर स्थानिक राष्ट्रप्रेमी नाराज दिसत आहेत.विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव व समर्थकांनी १५ जुलैच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने राष्ट्रप्रेमी नागरिक संतप्त झाले आहेत. सरकारचा राग कुंकळळीचाच नव्हे तर राज्याचा व देशाचा स्वाभिमान असलेल्या सोहळ्यावर बहिष्कार टाकणे गैर असल्याची भावना स्थानिक व्यक्त करीत आहेत.युरी आलेमाव यांनी सरकारचा राग विधानसभेत काढणे शक्य होते. शिवाय मुख्यमंत्री स्वतः चिफ्टन होवू पाहतात असे वक्तव्य करून व युरी समर्थकांकडून मंत्री सुभाष फळदेसाई यांना ‘चिअर लीडर’ संबोधुन युरी आलेमाव व समर्थकांनी चुकीचा संदेश दिल्याची भावना स्वाभिमानी जनता व्यक्त करीत आहे.युरी आपण चुकलात, अशा आशयाच्या पोस्ट आता व्हायरल व्हायला लागल्या आहेत. ∙∙∙

मला सल्लागार करा!

राज्य सरकारच्या अनेक कामांसाठी सल्लागार नेमण्याचे पेव आले आहे. नुकत्याच ‘स्मार्ट सिटी’च्या कामांसाठी नेमलेल्या सल्लागाराचा विषय बराच चर्चिला गेला आहे. ‘स्मार्ट सिटी’ची कामे होऊनही पाणी साचत असल्याने त्यासाठी सल्लागार कारणीभूत असल्याचे सांगून अनेकांनी हात वर केले. सल्लागारांसाठी कोट्यवधी रुपये मोजण्यासाठी सरकारची तिजोरी मोकळी आहे, हे स्पष्ट आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत बुधवारी ‘आप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी सरकारच्या आकडेवारीवर बरीच टीका केली. कशा पद्धतीने ही आकडेवारी फसवणूक करीत आहे, हे पटवून देत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘आता तुला सल्लागार नेमुया’ असे म्हणताच, व्हेंझींनीही ‘होय, मला सल्लागार करा’, असा टोमणाही मारला. त्यामुळे सल्लागार झाल्यावर काय फायदा होतो हे कदाचित व्हेन्झींना चांगलेच उमगलेले दिसते. ∙∙∙

युधिष्ठिर कोण?

विधानसभेतील विरोधक स्वतःला ‘पाच पांडव’ म्हणवतात, तर मग युधिष्ठीर कोण, अशी विचारणा खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. भीम कोण, शत्रुघ्न कोण, अर्जुन कोण हे समजले तर आम्‍हाला बरे पडेल, असेही ते म्‍हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस व सहकारी पक्षांच्या आमदारांनी स्वतःला पाच पांडव म्हणवून घेतले होते. या पाच पांडवांनी कौरवांना धूळ चारली असाही दावा त्यांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून झाल्यावर केला होता. त्याचा संदर्भ देत मिश्कीलपणे पांडवांचा नेता कोण, अशी विचारणा बुधवारी विधानसभेत केली. त्यावर विरोधकांनी साहजिकपणे पांडवांचा गेल्या निवडणुकीतील पराक्रम विसरला का, अशी विचारणा केली. ∙∙∙

‘स्मार्ट बस’ची बॅटरी ‘डाऊन’!

प्रत्येक बाबतीत ‘स्मार्ट’ पणा दिसलाच पाहिजे, या उद्देशाने देशभरातील विविध शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत विकास सुरू झाला आहे. यात पणजी शहराचाही समावेश आहे. स्मार्ट असे कागदावर दिसणाऱ्या शहरात चालणाऱ्या कामांमुळे शहरवासीयांची तारांबळ उडतेय, हे पावसामुळे तुंबलेल्या पाण्यातून दिसतेच. याशिवाय या स्मार्ट शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही स्मार्ट व्हावे, या हेतूने रस्ते जसे स्मार्ट करण्याचे योजले, तसे या मार्गावर वाहनेही ‘स्मार्ट’च हवीत ना. त्यानुसार ‘कदंब’कडून शहर वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्यात आल्या. या बसेस इंधनावर चालणाऱ्या वाहनांप्रमाणे बंद पडणार नाहीत, असे ठसवण्यात आल्याने शहरवासीय जरा समाधानीच होते. मात्र, नुकतीच एक ‘स्मार्ट बस’ पणजीत कला अकादमीजवळ बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली, अन् भ्रमाचा भोपळा फुटला. यामुळे बंद पडणाऱ्या ‘ढकलस्टार्ट’ बसेस अन् या ‘स्मार्ट’ म्हणवणाऱ्या बसेसमध्ये फरक तो काय, अशीच चर्चा रंगलीय. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विरोधक स्वतःला ‘पाच पांडव’ म्हणवतात तर मग युधिष्ठीर कोण, अशी विचारणा खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली
खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना सनबर्नचे एवढे कौतुक का?

दोनच सिंह आहेत!

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी बिबट्यांचा विषय विधानसभेत मांडला होता. पेडण्यात पर्यटकांची गर्दी असू शकते, पण बिबटे कुठून आले, अशी विचारणा यानिमित्ताने केली जात होती. बुधवारी चोपडे येथे सकाळी घराच्या मागे आलेला बिबटा वन खात्याने जेरबंद केला आणि आरोलकर यांच्या विषयाचे गांभीर्य समजून आले. त्यांनी बुधवारी तेही सांगितले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सिंह नाहीत का तेथे, बिबटे कुठूऩ आले, अशी बसल्याजागी विचारणा केली. त्यावेळी समयसूचकता दाखवत आता दोनच शिल्लक सिंह आहेत, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आता ‘मगो’त असलेले अन्य नेते कोण? असा प्रश्न मात्र निश्चितपणे उपस्थित झाला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विरोधक स्वतःला ‘पाच पांडव’ म्हणवतात तर मग युधिष्ठीर कोण, अशी विचारणा खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली
खरी कुजबूज; दोस्त, दोस्त ना रहा!

येरे येरे पावसा..!

मुख्यमंत्री, मंत्री, आमदार किंवा विरोधी आमदार कविता वाचून दाखवित मते मांडण्यास सुरुवात करण्याचा विधानसभा सभागृहात पायंडा पडत चालला आहे, असे वाटते. त्यामुळेच ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी आपणही कविता ऐकवणार, असे सांगत कविता सादर केली. त्यांनी लहानपणी शाळेत शिकवली जायची ती ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ ही कविता सादर केली. ही कविता सादर करून त्यांनी मत मांडण्यास सुरुवात केली. तोच मुख्यमंत्र्यांनी व्हेन्झींना टोला मारला, ‘अभिनंदन कारण व्हेन्झीने मराठीतून कविता म्हटली म्हणून’. त्यामुळे व्हेंझीनाही हासू आवरता आले नाही. दुसरीकडे व्हेन्झी आणि क्रुझ सिल्वा यांनी रोमी कोकणीला अधिकृत दर्जा द्यावा, यासाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हीच संधी साधत व्हेंझींच्या मराठी कवितेवर टीपणी केली असावी. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com