Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मंत्री मोन्सेरात ‘क्लिन बोल्ड’!

गोमन्तक डिजिटल टीम

मंत्री मोन्सेरात ‘क्लिन बोल्ड’!

विधानसभेत दोन दशके घालवलेल्या मंत्र्यांना खात्याच्या मागण्यांवरील उत्तरे देताना गडबडून जाण्याची पाळी येते. एखादेवेळी विरोधकांकडून प्रश्‍नांचा भडिमार झाला की, त्यांचीही नाचक्की होते. त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करत विरोधकांचा आरोपांचा हल्ला थोपवण्यासाठी उभे राहण्याची पाळी येते. हे मंत्री आपल्या खात्याचा अभ्यास करत नाहीत, किंवा कधी अपडेट नसतात. ते पूर्णपणे अधिकारी जे काही लिहून देतील ते वाचतात व उत्तरे देतात. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या मागील भाजप सरकारमध्ये महसूलमंत्री होत्या. त्यावेळी त्यांचीही उत्तरे देताना धांदल उडायची. तीच स्थिती आता पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांची होतेय. भू अभिलेख व वसाहत या त्यांच्या खात्यावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्याला त्यांनी लिखित उत्तर दिले, मात्र खात्याचे संकेतस्थळ सुरू न राहण्यामागील कारणे ते देऊ शकले नाहीत. विरोधी आमदारांनी त्यावर उपाययोजना विचारल्या तर ते मात्र लिखित स्वरुपातील माहितीच देत राहिले. येत्या सहा महिन्यात सर्वकाही सुरळीत केले जाईल, असे उत्तर देऊन त्यांनी सुटका करून घेतली. ∙∙∙

ऑनलाईन नको; पण, सोरो जीवाक बरो!

राज्यातील फेणी, हुर्राक ही काजूपासून बनविण्यात येणाऱ्या दारूचे प्रमुख केंद्र गोवा आहे, गोव्याची अर्थव्यवस्था दारुविक्रीवर अवलंबून आहे, असे असताना मयेचे आमदार प्रमेंद्र शेट यांनी विधानसभेत राज्यात मद्यपानावर बंदी घालावी, अशी मागणी केली. त्यावेळी अनेक आमदारांनी त्याला विरोध केला. मात्र, राज्यभरात ऑनलाईन दारू डिलिव्हरी करण्यासंबंधीच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी आमदारांनी केली. ‘गोंयची राणी काजू फेणी’, ‘गोंयचो सोरो जीवाक बरो’, अशा वाक् प्रचारांचा वापर झाला नाही. परंतु गोव्यात बाकी सगळ्यावर बंदी घाला, मात्र दारूबंदी करू नका, हे सांगायला आमदार आलेक्स रेजिनाल्ड विसरले नाहीत. ∙∙∙

आनंदरावांची पहिली बैठक आनंदात!

दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर फोंडा पालिकेचे नूतन नगराध्यक्ष आनंद नाईक यांची पहिलीच पालिका बैठक. आता नगरसेवक ते नगराध्यक्ष असा पल्ला गाठताना अशी जबाबदारी काही आनंदरावांकडे आली नव्हती. मात्र ही बैठक आनंदरावांनी छान हाताळली. उपस्थित झालेल्या सर्व प्रश्‍नांकडे आनंद नाईक यांनी सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यामुळे प्रश्‍न मांडणाऱ्यांचेही समाधान झाल्याचे बैठकीत दिसले. एकंदर आनंदरावांची पहिलीच बैठक आनंदात गेली, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ∙∙∙

क्रिकेट स्टेडियमचा झाला ‘फुटबॅाल’

दयानंद नार्वेकर हे ‘जीसीए’चे अध्यक्ष असताना क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला होता. त्याला आता दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला आहे.त्या नंतर मांडवी तसेच जुवारीतूनही बरेच पाणी वाहून गेले आहे. पण अजून काही सदर स्टेडियम साकारलेले नाही व त्याचे नेमके कारणही कोणालाही माहीत नाही. साधारण सदर निर्णयावेळीच केंद्राने गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपदही बहाल केले. पण त्या स्पर्धाही या ना त्या कारणावरून लांबणीवर पडत गेल्या होत्या. अखेर गतवर्षी त्या कशाबशा पार पडल्या. पण क्रिकेट स्टेडियमचे गाडे मात्र रुळावर येत नाही.आता तर या स्टेडियमसाठी एक दोन नव्हे तर तीन आमदार सरकारकडे भीड घालताना दिसत आहेत. त्यामुळे सदर विषयाचा सध्या फुटबॅाल झालेला दिसत आहे. धारगळ, मये की मावळिंगे येथे सदर स्टेडियम साकारते, त्याची उत्कंठा क्रिकेटप्रेमींना लागलेली आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची क्रूझ सिल्वांना पुस्तक भेट

रोमी कोकणी राजभाषेसाठी ‘आप’चे आमदार अधिक सक्रिय राहिले. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी राजभाषा संचालनालयाच्या विषयावरून उत्तर देताना रोमी कोकणी राजभाषेवरील पुस्तक आमदार क्रुझ सिल्वा यांना भेट दिले. पुस्तक भेट देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी इतिहास सांगितला. राजभाषा कायदा १९८७ झाला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले. विरोधात असल्यानंतर रोमी कोकणीचे विधेयक आणायचे आणि राजकारण करायचे, ते काम कोणी करू नये. दाल्गादो कोकणी अकादमीस निधी भाजप सरकारने दिला आहे, कोणत्याही सरकारला तो निधी देता आला नाही. आठव्या परिच्छेदात कोकणी राजभाषा आहे आणि मराठीला सहभाषा म्हणून वापराची मुभा दिली आहे, असे सांगत त्यांनी गोवा शांत आहे, तो अशांत करू नये, असेही बजावले.∙∙∙

हे जरा अतिच नाही का?

विकसित भारताचे स्वप्न पाहताना, गोव्यात मद्यपानावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी अजब मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विधानसभेत केली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. मुळात गोव्यातील दारु काहीप्रमाणात स्वस्त असल्याने पर्यटकांची रेलचेल राज्यात असते व हे उघड गुपितच. अनेकजण तर त्यासाठीच गोव्यात येतात. ही देखील वस्तुस्थितीच. परंतु आता थेट गोव्यात मद्य पिण्यावर बंदी घालावी हे जरा अतिच, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागली आहे. कारण, या मद्यपानामुळे गोव्यातील अर्थव्यवस्थेला हातभार लागतोच. आता सरकार अर्थव्यवस्थेबाबत इतर काही पर्यायी मार्गांचा अवलंब करू पाहते का? हा संशोधनचा विषय. परंतु आमदारांनी कुठल्या आधारावर वरील वक्तव्य केले, हे तेच सांगू शकतील. कारणं काहीही असली तरी आमदारांचे हे बोल मद्यव्यावसायिकांसह अनेक मद्यप्रेमींना रुचलेले नाहीत, एवढे मात्र खरे..! ∙∙∙

रोमी पुन्हा डोके वर काढतेय!

शिगमा संपला तरी कवित्व उरते, असे म्हटले जाते ते खरे. कोकणी भाषेच्या नावावर गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला. कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. कोकणी भाषा आठव्या परिशिष्टात समाविष्ट झाली. देवनागरी कोकणी शाळा, महाविद्यालयांत शिकवायला सुरू झाल्यास व गोवा विद्यापीठात स्वतंत्र कोकणी विभाग सुरू झाल्यास चार तपे उलटली. देवनागरी कोकणी लिहिणाऱ्या कोकणीतील दोघा लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. रोमी कोकणी संस्कृतीत वाढलेल्या दुसऱ्या ख्रिस्ती पिढीतील काही देवनागरी कोकणी शिकून कोकणी शिक्षक बनले तरी काही लोकांना रोमी कोकणीची खुमखुमी गेली नाही. रोमी कोकणी भाषेला राजभाषेचे स्थान देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. अशी मागणी आजही का होते? यावर जर कोकणी मालगड्यांनी आत्मचिंतन करावे, अशी अपेक्षा आहे.∙∙∙

‘साऊंड सिस्टम’बद्दल तक्रारच नाही!

कला अकादमीच्या नूतनीकरणात कोणत्याही त्रुटी ठेवलेल्या नाहीत. तसेच कोणीही साऊंड सिस्टमबद्दल तक्रारही केलेली नाही, असा दावा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत केला. आता मंत्री महोदयांच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे विरोधक या अकादमीबाबत चौकशी करावी, अशी मागणी करताहेत. मात्र मुख्यमंत्री काही विरोधकांच्या टीकेला किंवा कला अकादमीच्या कामाच्या दर्जावर होणाऱ्या आरोपांवर समाधानकारक उत्तर देत नसल्याने चर्चांना उधाण आले. कारण, कला अकादमीमधील साऊंड सिस्टमवरून मध्यंतरी कलाकरांनी आंदोलन छेडले, आणि सर्वांनी ते पाहिले. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून विधानसभेत उभे राहून ‘अगा तसे घडलेची नाही’,असे दावे करणे, हे लोकांना न पटण्यासारखेच.∙∙∙

शेट यांचा मास्टरस्ट्रोक

विधानसभा सभागृहात मंगळवारी दिवसभर मद्याचा विषय गाजला. अनेकांनी फेणी-हुर्राकविषयी मते मांडली. परंतु मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट राज्यात दारू विक्री बंद करा अशी मागणी केली. सत्ताधारी गटाचे आमदार असलेल्या शेट यांची मागणी सरकारच्या पचनी पडणार नाही, पण शेट यांनी ते धारिष्ट्य दाखविले. गोवा हे मद्यविक्रीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातून सरकारी तिजोरीत चांगला महसूलही मिळतो, त्यामुळे मद्यविक्री बंद होणे शक्य नाही. पण शेट यांची मागणी सरकार कधीही विचारात घेणार नाही. अन् मागणीला विरोधकही पाठिंबा देणार नाहीत, हा भाग वेगळा. पण मध्येच शेट यांनी जो स्ट्रोक मारला, तो समाजमाध्यमांत बराच चर्चेत राहिलाय.∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT