Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Khari Kujbuj Political Satire: भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर हे तसे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांपैकी नाहीत. अध्ये-मध्ये ते आपल्या फेसबुकवरून द्विअर्थी कविता वगैरे पोस्ट करून लोकांची करमणूक करतात, हे जरी खरे असले तरी त्यांनी त्यातून कधी वाद आपल्या अंगावर ओढवून घेतलेला नाही.

दैनिक गोमन्तक डिजिटल

‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर हे तसे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांपैकी नाहीत. अध्ये-मध्ये ते आपल्या फेसबुकवरून द्विअर्थी कविता वगैरे पोस्ट करून लोकांची करमणूक करतात, हे जरी खरे असले तरी त्यांनी त्यातून कधी वाद आपल्या अंगावर ओढवून घेतलेला नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी ‘ही झुरळे नसून घर पोखरणारी वाळवी आहे’ अशा आशयाचा पोस्ट सोशल मीडियावर टाकून त्यांनी एकदम गजहब करून टाकला. मात्र, विरोधकांनी हा विषय उचलून धरून सावईकर यांच्यावर टीकेचे आसूड ओढायला सुरवात केल्‍यानंतर सावईकरांनी हा पोस्‍ट मागे घेतला. या वाळवीने पेटविलेल्‍या वणव्‍यात सावईकर भाजले गेले म्‍हणून तर त्‍यांनी ही माघार घेतली नाही ना? ∙∙∙

सदिच्छा की संकेत?

सावर्डे मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? याची चर्चा जोरात रंगलेली असतानाच सावर्डेचे माजी आमदार आणि माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची घेतलेली ‘सदिच्छा भेट’ राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावून गेली. वरकरणी ही केवळ मार्गदर्शन आणि शुभेच्छांची देवाणघेवाण असली, तरी राजकारणात ‘नुसती सदिच्छा’ हा प्रकार फारसा निरागस मानला जात नाही. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक भेटीमागे स्थानिक कार्यकर्ते उमेदवारीचे गणित मांडू लागतात. त्यामुळे ‘‘ही फक्त भेट होती’’ असे सांगितले जात असले, तरी चर्चेचा फड रंगू लागला आहे. दिल्लीत चहा झाला की गोव्यात राजकीय तापमान हमखास वाढते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!∙∙∙

सावईकरांचा वकिली दावा

नरेंद्र सावईकर हे राजकारणी असले तरी मुळात ते वकील. एकेकाळी गोव्‍यातील निष्‍णात हायकोर्ट वकील असलेले आणि सध्‍या ‘इनफ्‌ इज इनफ्‌’ ही चळवळ सुरू केलेले माजी न्‍यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे ते ज्‍युनियर होते. आता राजकारणाच्‍या धामधुमीत सावईकरांनी वकिलीला विराम दिला आहे. मात्र, पूर्वीचे वकिलीचे दावे ते विसरले नसावेत. सध्‍याचा ‘वाळवीवाद’ सुरू झाल्‍यानंतर त्‍यावर खुलासा करताना नरेंद्र सावईकर यांनी, झुरळे घाण करतात आणि वाळवी घर पाेखरते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यापासून लोकांनी सावध राहावे एवढेच आपण म्‍हटले आहे. या वाळवीचा आणि सध्‍या सुरू असलेल्‍या विद्यार्थी आंदोलनाचा कुठलाही संबंध नाही, असे म्‍हटले आहे. आपण आपला पोस्‍ट मागे घेतला नाही तर आपला फेसबुक अकाऊंट हँडल करणाऱ्या व्‍यक्‍तीकडून तो डिलिट झाला, असा दावाही सावईकरांनी केला आहे. मात्र, त्‍यांचे हे वकिली डावपेच खरेच कामाला येतील की नाहीत, हे आता पाहावे लागेल. ∙∙∙

आज शिक्षक देणार परीक्षा!

‘ज्याचे जळते त्याला कळते’ असे एक बोधवाक्य आहे. परीक्षेचा किती ताण असतो? परीक्षा देण्यासाठी किती अभ्यास करावा लागतो? परीक्षेतील कठीण प्रश्नांची उत्तरे शोधताना किती ओढाताण होते? हे केवळ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच समजते. आपले शिक्षक जेवढी कठीण बनेल तेवढी कठीण प्रश्नपत्रिका काढण्यात धन्यता मानतात. मात्र, आता शिक्षकांनाच परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यातील सुमारे सहा हजार शिक्षक आज गोवा शिक्षक पात्रता चाचणी (जीटीईटी) परीक्षा देणार आहेत. देशातील सर्व शिक्षकांना ही परीक्षा देणे अनिवार्य केल्यास कित्येक वर्षे उलटली. मात्र, शिक्षकांनी ते गंभीरतेने घेतले नव्हते. आता सरकार व न्यायालय सक्त झाल्यामुळे शिक्षकांना आपली नोकरी व पुढील फायदे सांभाळण्यासाठी पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. आता पाहूया या परीक्षेचा निकाल किती टक्के लागतो. ∙∙∙

‘एआय’ला चकवा? पोलिसांनीच दिला धडा!

‘एआय’ कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटण्यासाठी काही शहाण्यांनी थेट वाहनांच्या नंबरप्लेटच काढून टाकण्याचा भन्नाट फंडा शोधला; पण ‘‘नंबर नाही म्हणजे गुन्हाही नाही’’ हा हिशेब हणजूण वाहतूक पोलिसांनी एका कारवाईतच फोल ठरवला. आसगाव येथे पाच वाहनांवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की, ‘एआय’ला फसवण्याच्या नादात कायद्यालाच चकवा देता येत नाही. नियम मोडून स्वतःला हुशार समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, नंबरप्लेट लपवली तरी वाहन दिसतेच आणि कायद्याचा हात आता ‘एआय’च्या डोळ्यांनी अधिक लांब पोहोचू लागला आहे. ‘चलाखी’ आणि ‘बेजबाबदारपणा’ यातील फरक समजून घेण्याची वेळ आता वाहनचालकांवर आली आहे. ∙∙∙

चर्चा पोलिस बदल्यांच्या...

राज्यभरातील तब्बल ७८९ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश निघाले. मात्र, जरा या बदल्यांच्या यादीवर नजर फिरवली, तर खरा खेळ लक्षात येतो. कित्येकांनी आपल्या अगदी ऐच्छिक आणि आवडत्याच पोलिस ठाण्यात पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री मारली आहे. शेवटी पोलिस खात्यात बदल्यांचा मोसम आला की, काम दाखवण्यापेक्षा राजकीय वरदहस्त आणि वरच्या साहेबांची मर्जी राखणे जास्त फायद्याचे ठरते. खात्यात काही ‘कलाकार’ पोलिस असेही आहेत, ज्यांना काहीही न करता फक्त बसून पगार खाण्यातच प्रचंड रस असतो. नावालाच पोलिस कर्मचारी असलेली ही मंडळी खात्याची सेवा कमी आणि आपल्या राजकीय आकांचे खबरी म्हणून कामगिरी जास्त बजावतात! विशेषतः असे काही पठ्ठे आहेत, जे आपल्या राजकीय ‘गॉडफादर’च्या जोरावर एकाच जागेवर अगदी पाय रोवून बसलेत. एखादे पालिस ठाणे सोडायची यांची अजिबात सवय नसते. नियम पाळल्याचा आव आणण्यासाठी मध्येच विशेष शाखेत किंवा नजीकच्या शेजारील ठाण्यात एखादी छोटीशी चक्कर मारतात आणि वर्षात पुन्हा आपल्या मूळ लाडक्या ठाण्यात हजर होतात, ही मोठी शोकांतिकाच म्हणायची! ∙∙∙

त्यांचा प्रवास काँग्रेस व्हाया ‘आप’!

गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन आमदार बनलेले एक-दोन नव्हे कित्येक आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपशी साठी जोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला ‘भाजपची नर्सरी’ असे संबोधले जाते. म्हणजे आमदार तयार होतात काँग्रेसच्या गोटात आणि फळे मिळतात भाजपला. तीच स्थिती गोव्यातील आम आदमी पक्षाची झाली आहे. ‘आप’ ही काँग्रेस पक्षाची नर्सरी बनली आहे, अशी चर्चा काँग्रेसवाले करतात. आम आदमी पक्षात अध्यक्षपद भूषविलेले मोठे नेते आम आदमी पक्षातून राजकारणाचे धडे घेतात आणि राजकीय पंडित झाल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश करतात. आम आदमी पक्ष गोव्यात स्थापन झाला तेव्हा या पक्षाचे पहिले राज्य प्रमुख एल्विस गोम्स यांनी ‘आप’ सोडला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ‘आप’चे अध्यक्षपद भूषविलेले व आम आदमी पक्षातून राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात आलेले अमित पालेकर यांनी ‘आप’ सोडला व काँग्रेस पक्षाची साथ जोडली. आम आदमी पक्षाचे अध्यक्षपद भूषविलेले राहुल म्हांबरे यांनीही अखेर काँग्रेस पक्षाची कास धरली. आता बघूया आम आदमी पक्षाशी एकनिष्ठ असलेले वाल्मिकी नाईक काय करतात? एक मात्र खरे ‘आप’मुळे काँग्रेस पक्षाला तीन वजनदार नेते मिळाले आहेत. आता ते काँग्रेस पक्षांत किती दिवस टिकतात, हाच खरा प्रश्न आहे. ∙∙∙

मिलिंदची चर्चा!

उसगाव आणि परिसरात सध्या एका नावाची चर्चा रंगली आहे, ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षप्रवेशावेळी झालेली उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळपई मतदारसंघात रंगतदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये संभाव्य लढतीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद प्रभू यांनी नवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचीही चर्चा झाली होती. आता त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे उसगावच्या राजकारणात कोणते वारे वाहणार, याची उत्सुकता वाढली आहे. पाहूया, पुढे काय होते ते! ∙∙∙

त्यांचा प्रवास काँग्रेस व्हाया ‘आप’!

गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन आमदार बनलेले एक-दोन नव्हे कित्येक आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपशी साठी जोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला ‘भाजपची नर्सरी’ असे संबोधले जाते. म्हणजे आमदार तयार होतात काँग्रेसच्या गोटात आणि फळे मिळतात भाजपला. तीच स्थिती गोव्यातील आम आदमी पक्षाची झाली आहे. ‘आप’ ही काँग्रेस पक्षाची नर्सरी बनली आहे, अशी चर्चा काँग्रेसवाले करतात. आम आदमी पक्षात अध्यक्षपद भूषविलेले मोठे नेते आम आदमी पक्षातून राजकारणाचे धडे घेतात आणि राजकीय पंडित झाल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश करतात. आम आदमी पक्ष गोव्यात स्थापन झाला तेव्हा या पक्षाचे पहिले राज्य प्रमुख एल्विस गोम्स यांनी ‘आप’ सोडला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ‘आप’चे अध्यक्षपद भूषविलेले व आम आदमी पक्षातून राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात आलेले अमित पालेकर यांनी ‘आप’ सोडला व काँग्रेस पक्षाची साथ जोडली. आम आदमी पक्षाचे अध्यक्षपद भूषविलेले राहुल म्हांबरे यांनीही अखेर काँग्रेस पक्षाची कास धरली. आता बघूया आम आदमी पक्षाशी एकनिष्ठ असलेले वाल्मिकी नाईक काय करतात? एक मात्र खरे ‘आप’मुळे काँग्रेस पक्षाला तीन वजनदार नेते मिळाले आहेत. आता ते काँग्रेस पक्षांत किती दिवस टिकतात, हाच खरा प्रश्न आहे. ∙∙∙

पोलिसाला खडे बोल

मोरजी येथे वकिलाला झालेल्या मारहाणीची चर्चा अजूनही सुरू आहे. त्यात आता नवा विषय असा की, मंगळवारी पोलिस उपअधीक्षकांनी मांद्रे पोलिस निरीक्षकाला चांगलेच धारेवर धरले. ‘काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने झाले असते, तर ही वेळच आली नसती,’ असा दम दिल्याची चर्चा आहे. ही जाब विचारणा चार भिंतीआड झाली तर मग विषय बाहेर एवढ्या तपशीलात पोहोचला कसा? म्हणजे त्या खोलीत भिंतींनाही कान होते की एखादा ‘लाईव्ह कमेंट्रेटर’ उपस्थित होता, असा सवाल आता काहीजण विचारू लागले आहेत. काहींचे म्हणणे, खरडपट्टी काढली हे जितके खरे, तितकेच ते बाहेर कसे आले, हेही एक गूढच! आता या चर्चेत किती तथ्य आणि किती तडका, हे संबंधितांनाच माहीत. मात्र, गावोगावी सध्या ‘झापले खरे; पण ही बातमी बाहेर कोणी फोडली,’ याचीच चर्चा रंगली आहे. ∙∙∙

खत नको, ‘ॲप’ आवर...

खत हवे असेल तर ‘ॲप’ डाऊनलोड करा, असा सरकारी फतवा जारी झाला आहे. एक-दोन किलो खत विकत घेणाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. डोंगराच्या उतारावर शेती करणाऱ्यांकडे स्मार्ट फोनही नाहीत. ते ‘ॲप’ डाऊनलोड तरी कसे करतील. ‘ॲप’वर नोंदणी होत नसेल तर खत नाही, असे त्यांना सांगण्यात येत आहे. भाजीपाल्याचा मळा पिकवून ‘स्वयंपूर्ण गोवा’ करण्यासाठी आपण हातभार लावू, असे म्हणणाऱ्यांच्या तोंडचे पाणी या ‘ॲप’ने सध्या पळवले आहे. खत नको; पण ‘ॲप’ आवर म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ∙∙∙

चौकशीचा हातोडा ठणकावून मारावा!

कोकणी अनुवादक मिळत नाही; कारण त्यासाठी राजभाषा संचालनालयाने काय केले? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. वर्षभर कित्येक कोकणी संस्थांच्या ‘फोल्गी’ कार्यक्रमांना निधीची पोटली दिली जाते ती कुठल्या नियमाखाली, तरतुदीखाली? मुळांकडे जायला हवे. चौकशीसाठी. प्रत्येक कोकणी कार्यक्रमाचा एक प्रायोजक राजभाषा खाते. हा निधी जर अनुवादक तयार करण्यासाठी वापरला असता तर एक पथक तयार झाले असते. शिकवणारे विद्वान प्रशिक्षक कोकणीत आहेत. धान्याच्या मोठ्या गोणपाटाला कोळउंदीर वगैरे पोखरत राहावा तसा सरकारी निधीच्या साकांना हा उंदीर कुरतडत आहे. युवा महोत्सवांना राजभाषेचा निधी. अ.भा. कोकणी परिषदेला अकस्मात कर्नाटकातील सागर गावात जाऊन फोल्ग मारावेसे वाटले. म्हणून हे साक कुरतडू नका. निधी पाईपलाईन गळतीची चौकशी विधानसभेत रितसर सुरू व्हावी, ही लोकांची मागणी आहे. ∙∙∙

मोर्चाची धास्ती

लडाखचे समाजकार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणाची धग आता थेट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे! गोव्यातही याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. सोमवारी झालेला आझाद मैदानावरील मेणबत्ती मोर्चा हा मागील पाच वर्षांतील सर्वाधिक जमाव असलेला मोर्चा ठरला. मुख्य म्हणजे हा मोर्चा एवढा मोठा होईल याची कल्पना कोणत्याच यंत्रणेला आली नव्हती. उपस्थित पोलिसांना वेताच्या काठीवर हात ठेवून गप्प बसावे लागले. केवळ सोशल मीडियात पोस्ट टाकत ‘उजवाड’ संस्थेने दिलेल्या हाकेवरून हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. राज्यात अनेक मोर्चे होतात; परंतु त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या हजाराच्या आत असते. अशाप्रकारचा जमाव गोव्यातही जमू शकतो याची धास्ती मात्र अनेकांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

राहुलबाबांना वाटते भाजप दोषी!

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या राहुल म्हांबरे यांनी म्हापसा मार्केटमध्ये, रवींद्र भवन, पांढरा हत्ती बनलेला मलनिस्सारण प्रकल्प, भूमिगत मलनिस्सारण वाहिनी, बसस्थानक इमारत अशा अनेक समस्या म्हापशात आहेत, असे सांगितले. हे सांगताना त्यांनी मात्र सध्याचे आमदार जोशुआ डिसोझा यांना दोष दिलेला नाही, तर त्यांनी या सर्व समस्या न सुटण्यामागे किंवा राहण्यामागे भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. राहुलबाबांचा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन पक्षातील उपस्थितांपैकी अनेकांना खटकल्याची चर्चा सुरू होती. ∙∙∙

खोर्जुवेची त्रिमूर्ती!

काँग्रेस पक्षात यापूर्वी खोर्जुवेचे दोघे म्हणजे अमरनाथ पणजीकर आणि महेश म्हांबरे होते, त्यात आता तिसऱ्या खोर्जुवेच्या नेत्याची भर पडली आहे. ‘आप’चे माजी निमंत्रक ॲड. राहुल म्हांबरे हे काँग्रेसमध्ये मंगळवारी दाखल झाले. पणजीकर सध्या पक्षात मीडिया सेलचे विभागप्रमुख आहेत, तर महेश म्हांबरे हे प्रवक्ते म्हणून काम पाहतात. आता पक्षप्रवेशामुळे राहुल यांची काम करण्याची पद्धत व स्ट्रॅटजीचा वापर पक्षासाठी होईल, म्हणजेच ते मार्गदर्शक राहणार, असे म्हणता येऊ शकते. काँग्रेसमध्ये आता खोर्जुवेचे तीन नेते आल्याने त्यातील एकजण पक्षात ‘त्रिमूर्ती’ झाल्याचे बोलून गेला. या तिघांचा पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत किती फायदा होतो, हे दिसून येईलच. ∙∙∙

अबब! सासष्टीत पन्नास कवी?

वाळवंटात जर नदी वाहायला लागली तर ते अप्रूपच म्हणावे लागेल. सासष्टी हा तालुका ख्रिस्तीबहुल तालुका. या तालुक्यात चालते ती रोमी कोकणी व थोडीशी नागरी कोकणी. मराठी या तालुक्यात मर्यादित आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मात्र, या तालुक्यात मराठी साहित्याची मोठी चळवळ चालते. येणाऱ्या रविवारी गोवा मराठी अकादमीच्या सासष्टी तालुका समितीने मडगावात कविसंमेलन आयोजित केले आहे. या कविसंमेलनात कविता सादर करण्यासाठी पन्नास कवींनी आपली नावनोंदणी केली आहे. आता सासष्टीत पन्नास कवी आले कुठून? असा प्रश्न काव्यप्रेमींना पडणे स्वाभाविक नाही का? पन्नास कवी म्हणजे दक्षिणेत जरी पाऊस नसला तरी रविवारी मठग्रामात कवितांचा पाऊस पडणार, हे मात्र निश्चित. ∙∙∙

मुलांना स्वयंपाक शिक्षण आवश्यक

वेगवेगळ्या अभियानांखाली मुलींना व मुलांना हस्तकला व इतर कौशल्यकामांचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे, ही समाधानाची बाब. आजकाल मुलांना आपला स्वयंपाक आपण बनवण्याचेही प्रशिक्षण दिले तर फार बरे होईल, अशी मागणी आहे. पारंपरिक घरगुती पदार्थ जसे खतखते, डाळ-भात, भाज्या, इडली-सांबार, चपाती, रोटी-फुलका, खीर, मणगणे असे काही मूलभूत पदार्थ मुलांना शिकवावेत. आजकाल केटरिंग व्यवसाय फारच जोरात चाललाय. गृहोद्योगी स्तरावर तो थोड्या प्रमाणात का होईना, काहींना रोजगार देत आहे. मेट्रो शहरामध्ये एकेका इमारतीत काही गृहिणी दरदिवशी शेकडो रुपये कष्टाने कमवतात. स्वावलंबनाने आपले जेवण आपण तयार करून खाणे म्हणजे निरोगी आणि बाहेरच्या पोटल्या मागवून सेवन करणे म्हणजे विविध समस्यांना आमंत्रणच. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानाखाली यावर व्यावहारिक स्तरावर विचार व्हावा, अशी मागणी आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT