

जर एखादा ‘एनपीएस’ म्हणजे नवीन राष्ट्रीय पेन्शन स्कीममध्ये येणारा खासगी अनुदानित शिक्षण संस्थेत काम करणारा शिक्षक किंवा कर्मचारी कामावर असताना दगावला, तर त्या मृत कर्मचाऱ्याला पेन्शन, ग्रॅच्युइटी व इतर आर्थिक फायदे किती दिवसांत मिळायला हवेत? आपण म्हणणार, अधिकाधिक दोन महिने. मात्र, सत्यस्थिती वेगळीच आहे. दोन-दोन वर्षे अशी पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. लेखा कार्यालयात काम करणारे अधिकारी त्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना नाहक त्रास देतात. लेखा अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. जाब विचारल्यास हे अधिकारी धमकी देतात. कौटिल्य इमारतीत काम करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना मानवतेचा पाठ कोणी सांगणार का? असा प्रश्न पीडित कुटुंबे विचारू लागली आहेत. ∙∙∙
‘मोडलेल्या खुर्साक कोण चेपे काढीना’ अशी कोकणीत म्हण आहे. माजी मंत्री व सहकार क्षेत्रात मोठा ठसा उमटविलेले सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश वेळीप गेल्या काही वर्षांपासून अडगळीत पडले होते. अनुसूचित जमातीचे एकेकाळचे मुख्य नेते म्हणून भाजपात स्थान मिळविलेले प्रकाश वेळीप यांना भाजपाने वेगळे पाडले होते. प्रकाश वेळीप यांनी सुरू केलेल्या उटा संघटनेवर सरकारने निर्बंध लादले होते. प्रकाश वेळीप राजकारणातून संपले. प्रकाश वेळीप यांची एसटी नेते म्हणूनची प्रतिमा संपली, अशी हवा निर्माण करण्यात आली होती. तेच प्रकाश वेळीप पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. प्रकाश वेळीप यांच्या हातात एसटी समाजाची महत्त्वपूर्ण अशी उटा संस्थेची जबाबदारी पुन्हा एकदा सोपविण्यात आली. आता प्रकाश वेळीप पुन्हा सक्रिय झाले आहेत.∙∙∙
गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही वर्षांपूर्वी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सरकारने कृषी क्षेत्र केंद्रस्थानी ठेवले आणि राज्यातील भाजीसह इतर उत्पादनांत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही आले. मोहिमेअंतर्गत नेमलेल्या सरकारी अधिकारी, कृषी मित्रांनी प्रामाणिकपणे, जीव ओतून काम केले, तेथे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा झाला. पण, काही कामचुकार अधिकाऱ्यांनी मात्र कृषी मित्र ही पदवी मिळाल्यातच धन्य मानले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना कृषी खात्याचे जे ट्रॅक्टर चालक शेतात उतरणार नाहीत त्यांचे निलंबन करण्याचा इशारा दिला. परंतु, अशा ट्रॅक्टर चालकांवर अशाच अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या गोष्टी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचणार का? आणि त्यांचे निलंबन होणार का? असे प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांना पडले आहेत. ∙∙∙
बटाट्यापेक्षा भोपळा आरोग्यदायी असल्याचे स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी कृषी कार्यक्रमात सांगितले. त्यांनी सांगितले, पूर्वी गोव्यात दूधी भोपळ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असे. आता लोक बटाटे उत्पादनावर जास्त भर देऊ लागले आहेत. बटाट्यापेक्षा भोपळ्याच्या उत्पादनावरही भर द्यायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. या दिवसांत सरकारतर्फे अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भोपळा लागवडीसाठी एखादी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करून तिची अंमलबजावणी केली तर भोपळ्याचे उत्पादनही गोव्यात पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, अशी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमध्ये लगेच कुजबुज सुरू झाली. ∙∙∙
धूर हा कोंकणीत अधूनमधून येतच असतो. कुठं काय भाजलं, करपलं हे कळत नाही. गृहकलहात अल्प काळात गळाभेटी होतात. असो. विचारवंत साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांच्या लेखाच्या तात्विक विचारचौकटीत मुद्देसूद प्रतिवाद करण्याचा वकूब आणि धमक दिसतच नाही. एरव्ही कोंकणीवाद्यांना देव वगैरे नको. देव नको, देवळे खुली करा वगैरे भाषा-बाह्य विषय याच लोकांनी चळवळीला जोडून पुढे केल्याने कैक लोक कोकणीपासून दूरावले. देवांवर टीका करतात तेव्हा भक्त दुखावत नाही? देव नको परंतु मनुष्यांचं दैवतीकरण चालतं. पंतप्रधान धरून इतर नेत्यांना, विचारधारेला या लोकांनी नांवं ठेवली तरी चालतं. एकाडेमीक चर्चा नको. शेवट गोड करी या तत्वाने मिठ्या मारून कालांतराने जोडण्याचा प्रयत्न झाला तरी चळवळीच्या यात्रेत हा धब्बा राहणारच. रहीम म्हणतो, धागा टुटे से ना मिले, मिले तो गांठ पड जाए. ∙∙∙
कला अकादमीने कोंकणी नाट्य स्पर्धेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाची रूपरेषा घोषित केली. जीवनगौरव व कलाकारांचा सम्मान कोणत्या स्वरूपाचा आहे, बक्षिस किती रूपयांचे, ते जाहीर करायला नको का? सरकारी संस्था या गोष्टी गुलदस्त्यात का ठेवतात हे लोकांना कळत नाही. कार्डावर ‘सुंवाळो’ असं लिहिलं आहे. ‘सुवाळो’ हे अचूक. चार शब्द कोंकणीत लिहिता येत नाही. म्हणूनच सामाजिक माध्यमातून कोंकणीला कायम खेपणाऱ्या एकाला कोंकणी नाटकाचं दिग्दर्शन करायला या अज्ञानी लोकांनी सांगितलं आहे. चार नाटकं केलेल्यांचा सत्कार होणार. उल्हास यशवंत नाईक यांनी वीस प्लस नाटके स्पर्धेत केली आहेत. त्यांना का डावललं, हा प्रश्न कोंकणीवाद्यांचा, जो रास्त आहे. कुणाला पद्मश्री, कुणाला भारतरत्न बहाल करावी ते अभिप्राय, जनमत कौलाचा विजय कुठल्या जातीधर्माच्या लोकांनी आणला हे अकादमीचे अधिकारी सोशल मिडियावर सोडतात. ही बाष्कळपणा रोखायला हवी. ∙∙∙
सध्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सर्वच इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. मडगावात तर सर्वच इच्छुक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जणू चढाओढच लागल्याचे चित्र आहे. सध्या मडगावात दिगंबर कामत यांना आव्हान देण्यासाठी प्रभव नायक आणि चिराग नायक या दोन युवा नेत्यांनी कंबर कसली आहे. यातील चिराग नायक हे संपूर्ण शहरात फिरून रस्ते व गटारे स्वच्छ करत लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे, प्रभव नायक यांनी ‘मडगाव कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. याउलट, दिगंबर कामत यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील बारा वर्षांतील कामगिरीची माहिती घराघरांत पोहोचविण्याचा उपक्रम राबविला होता. सध्या ते दर आठवड्याला मडगाव पालिकेत ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांच्या संपर्कात राहतात. कुठल्याही माध्यमातून का होईना, पण सर्वच जण आपला जनसंपर्क अधिक दृढ करण्यासाठी सक्रिय झाल्याचे चित्र सध्या मडगावात पाहायला मिळत आहे.∙∙∙
न्यायालयाचा आदेश आला, महिने गेले, वर्षही उलटलं... पण फाईल मात्र अजूनही ‘योग्य वेळेची’ वाट पाहत बसली होती! शेवटी न्यायालयानेच मिश्किलपणे विचारलं, ‘काम करणार की फक्त खुर्ची उबवणार?’ त्यानंतर मात्र घाईघाईने पाहणी, अहवाल आणि हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे आता लोक मिश्किलपणे म्हणत आहेत, काही सरकारी फाईलींना चहा, शिक्का आणि न्यायालयाची फटकार... ही तिन्ही मिळाली कीच जाग येते बहुतेक! आता पुढे पाडकाम आधी होणार की पुन्हा कागदांचीच फेरी सुरू होणार, याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ∙∙∙
महानगरपालिकेचे आयुक्त क्लेन मेदेरा हे सहसा चर्चेत नसतात. त्यांचे नाव येते ते फाईली, बैठका आणि प्रशासकीय निर्णयांमुळे. पण यावेळी कारण थोडे वेगळे ठरले. सांताक्रूझ येथील पाणथळ भागात आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या जोडीचे त्यांनी टिपलेले छायाचित्र स्वतःच्या समाजमाध्यम खात्यावर पोस्ट केले आणि त्याची अनेकांनी दखल घेतली. काही प्रसारमाध्यमांनी तर ते छायाचित्र आणि त्यावरील त्यांची निसर्गप्रेम व्यक्त करणारी पोस्टही उचलून धरली. एका बाजूला महापौरांचे दौरे, बैठका आणि उद्घाटनांची छायाचित्रे रोज समाजमाध्यमांवर झळकत असतात; मात्र यावेळी प्रकाशझोतात आले ते आयुक्तांचे ''कॅमेऱ्यातून'' दिसलेले वेगळे रूप. प्रशासकीय कामकाजाबरोबरच फोटोग्राफीचीही त्यांना चांगली नजर आहे, हे निमित्ताने अनेकांना कळले. ∙∙∙
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर सध्या देवदर्शन, जनसंपर्क आणि संघटनबांधणी या तिन्ही आघाड्यांवर सक्रिय दिसत आहेत. श्री नागेश महारुद्राच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी गोव्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली खरी; पण राजकीय वर्तुळात मात्र चर्चा देवदर्शनापेक्षा त्यांच्या वाढत्या हालचालींचीच आहे. निवडणुकांचे वातावरण हळूहळू तापत असताना चोडणकर प्रत्येक भेट, प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक उपस्थितीतून कार्यकर्त्यांना संदेश देत आहेत की, काँग्रेस आता केवळ प्रार्थना नव्हे, तर तयारीच्या मोडमध्ये आहे. देवाचा आशीर्वाद मिळवतानाच राजकीय समीकरणांनाही बळकटी देण्याचा हा प्रयत्न असल्याची मिश्कील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ∙∙∙
म्हापशातील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा शांतपणे ऐकून घेतल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देत त्यांनी समस्यांवर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचनाही दिल्या. भेटीगाठींसोबत हलक्या-फुलक्या गप्पा, हास्यविनोद आणि आपुलकीच्या वातावरणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधार आहे,’ हा संदेश देत डॉ. सावंत यांनी सर्वांशी जिव्हाळ्याने संवाद साधला ∙∙∙
कोंकणी भाषा मंडळाची शणै गोंयबाब कथामाळ हा लोकप्रिय उपक्रम आहे. लवकरच तो सुरू होणार. परंतु झापडबंद वृत्तीमुळे त्यातील काही घटकांमध्ये तोचतोचपणा आणि साचलेपणा आलेला आहे, हे आयोजकांच्या लक्षात येत नाही. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे तेच तेच परीक्षक व तेच तेच पाहुणे. नवे अध्यक्ष सेराफीनबाब हे कल्पक आहेत व त्यांनी विदेशातील वास्तव्यात प्रोफेशनलिझम म्हणजे काय, हे समजून घेतले आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यांची संपर्कसाखळी (पीआर) मोठी आहे. त्यांच्या या शिक्षणाचा आणि अनुभवाचा नक्की फायदा होणार आहे. कलाकार, नाटककार, तियात्रीस्त व इतरांना बोलावले तर विद्यार्थ्यांना ते मान्यवर दिसतील. त्यांच्या विचारांनी मुलांची सर्वंकष वृद्धी होईल, हा उद्देश असल्याचे पालक आता बोलतात.∙∙∙
२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले आठ आमदार भाजपात गेले. मतदारसंघांच्या विकासासाठीच आपण भाजपात प्रवेश केल्याचे ते अजूनही वारंवार सांगतात. परंतु, प्रदेश भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची पात्रता, पक्षावरील निष्ठा आणि नवे चहेरे असे स्वरुप उमेदवारीचे ठेवल्याने फुटीर आठपैकी बहुतांशी आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. अशा आमदारांनी याआधीच पक्ष बदलल्याने आणि त्यांच्यात पुन्हा जिंकून येण्याची क्षमता नसल्याने भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणारच नाही, अशी चर्चा भाजपात सुरू आहे.∙∙∙
आसगावात प्रस्तावित साकवाच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर अक्षरशः पळ काढण्याची वेळ आली आणि ग्रामस्थांच्या रोषाने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. विशेष म्हणजे, राजकीय रंग वेगळे असले तरी विरोधी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर आणि सत्ताधारी आमदार दिलायला लोबो हे दोघेही यावेळी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. निवडणुका आल्या की पक्ष आठवतो; पण जनतेचा प्रश्न आला की पक्षभेद विसरून एकत्र येण्याची ही दुर्मीळ झलक पाहायला मिळाली. प्रशासनासाठी हा इशारा, तर राजकारणासाठी एक चिमटा आहे. जनतेचा आवाज मोठा झाला की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील भिंतीही क्षणार्धात कोसळतात!∙∙∙
विधानसभेची निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. मात्र, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मये मतदारसंघात आतापासूनच राजकारण तापू लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी मयेत ‘विजय’ खेचून आणण्याचा चंग गोवा फॉरवर्डने बांधला आहे. गोवा फॉरवर्डने नवीन मये गट समिती नियुक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवा हुरूप आला आहे. काँग्रेसशी असलेल्या युतीबाबत निर्णय काहीही होवो, गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते नव्या जोमाने कामालाही लागले आहेत. शिरगावचे सामाजिक कार्यकर्ते गुणाजी गावकर यांनीही विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेत मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिरगाव पंचायतीनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उत्तर गोव्यातील एका वजनदार मंत्र्यांची जवळची धुमे नामक एक व्यक्तीही मयेच्या राजकारणात उतरली असून, त्यांनी अत्यंत सावधपणे मदतकार्य सुरू ठेवले आहे. या घडामोडींमध्ये काँग्रेसच्या गोटात मात्र सध्या तरी सामसूम दिसत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.