Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: राजकारण अन गावातील गजाली..

गोमन्तक डिजिटल टीम

राजकारण अन् गावातील गजाली..

हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी पुढाकार घेत, शनिवारी हळदोणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू व मलेरियाविषयी मतदारसंघातील विविध सरपंच व पंच सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीस चक्क आरोग्य अधिकारीच गैरहजर राहिल्याने सध्या मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे माजी आमदाराने बैठकीसाठी पुढाकार घेतल्याने वादाला तोंड फुटले होते. दुसरीकडे, आरोग्य अधिकारी गैरहजर राहिल्याने त्या राजकीय दबावापोटी अनुपस्थिती राहिल्या का? हा प्रश्न नंतर उपस्थित झाला. सध्या हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो व विद्यमान आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा हे दोघेही या मतदारसंघात आपल्या वर्चस्वासाठी धडपड करताना दिसताहेत. तसेच एकमेकांना राजकीयदृष्ट्या कमी लेखण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. परंतु या दोघांच्या राजकीय लढ्यात बिचाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सध्या फरफट होत आहे, अशा गावात आता गजाली सुरू झाल्या आहेत.

व्हेंझीची कविता

विजय सरदेसाई यांनी या पावसाळी अधिवेशनात गोव्‍याच्‍या रस्‍त्‍यावर पडलेल्‍या खड्ड्यांवर कविता सादर केल्‍यानंतर बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनीही त्‍यातून स्फुरण घेतले असावे असे वाटते. कारण व्हेंझीबाबांनीही ‘करून टाकली दैना तुम्‍ही, गोव्‍याच्‍या वाहतुकीची’ (व्हेंझीच्‍याच शब्दांत सांगायचे झाल्‍यास, वाहतुकीची नव्‍हे तर वाटुकीची) ही कविता सादर करून सभागृहाला हसविले. असे जरी असले तरी विधानसभा अधिवेशनात कविता सादर करणारे व्हेंझी हे बाणावलीचे पहिलेच आमदार नाहीत. याआधी कित्‍येक वर्षांपूर्वी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी विधानसभा अधिवेशनात आपल्‍यालाही मराठी समजते हे पटवून देण्‍यासाठी ‘येरे येरे पावसा’ ही कविता म्‍हटली होती. आता व्हेंझीबाबांनीही त्‍यांच्‍याच पावलांवर पाऊल ठेवले असावे.

सभापतींना येणार ‘अच्‍छे दिन’?

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्‍यानंतर गोव्‍यात पुन्‍हा एकदा राजकीय उलथापालथ होण्‍याचे संकेत मिळू लागले आहेत. आता उलथापालथ म्‍हणजे सरकार बदलणार नाही. मात्र, नेतृत्‍व बदल होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. काही आठवड्यांपूर्वी गोव्‍यातील अनेक आमदारांनी दिल्‍लीवारी केली होती. त्‍यामागेही हेच कारण होते असे आता सांगण्‍यात येत आहे. गोव्‍यात जर नेतृत्‍व बदल झाला, तर संघाशी जवळ असलेल्‍याकडेच नेतृत्‍व देण्‍यात यावे अशी मागणी म्‍हणे होत आहे आणि सध्‍या मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यानंतर जर संघाशी जवळ कोण असतील, तर ते सभापती रमेश तवडकर. मात्र, या वृत्तांत किती तथ्‍य आहे यावरच सभापतींना आगामी काळात ‘अच्‍छे दिन’ येणार की नाही हे अवलंबून आहे.

‘जेट पॅचर’ गेले कुठे?

नवे कोरे हॅाटमिक्स केलेले रस्ते पावसाळ्यात पार उखडून जाणे हे गोव्यात आता नित्याचेच झाले आहे. यंदा तर नावाला देखील सुस्थितीतील रस्ता शिल्लक राहिलेला नाही असे गोंयकार म्हणू लागला आहे. शंभरी ओलांडलेल्या पावसाचे निमित्त त्यामुळे सरकारला आयतेच मिळालेले आहे. राजधानी पणजीत स्मार्ट सिटीसाठी केलेले खोदकाम रस्त्यांच्या मुळावर आले आहे, पण पणजी वगळता अन्य गोव्याचे काय? मडगाव, म्हापसा, वास्को तसेच फोंड्यासह अन्य शहरांतील रस्त्यांची अशीच दुरवस्था झालेली आहे. अनेकजण सरकार गतवर्षी जी ‘जॅट पॅचर’ यंत्रणा आणली होती, तिच्याव्दारे रस्ते दुरुस्त करेल, निदान मोठे खड्डे तरी बुजवेल या आशेवर होते. पण साबांखा काब्रालांकडून गेले व त्याचमुळे असेल ‘जॅट पॅचर’ही गॅरेजमध्ये नेऊन टाकले की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. गतवर्षी या यंत्रांचे बरेच कोडकौतुक केले जात होते, मग यंदा ही यंत्रे का दिमतीस घेतली नाहीत हा प्रश्न उरतोच की रे भाऊ.

आरोलकरांचे हास्य!

विधानसभा सभागृहात विषय मांडताना ते मुद्देसूद मांडावे लागतात, त्याशिवाय त्यावेळी संबंधित सदस्यांची देहबोली बरेच काही सांगून जाते. शुक्रवारी जीत आरोलकर मागण्या व कपात सूचनांवर बोलत होते. त्यावेळी त्यांना हसू आवरत नव्हते. त्यामुळे ते नक्की कोणाला हसत होते, हे दूरचित्रवाहिनीवर किंवा समाज माध्यमातील चॅनलवर पाहताना कोणाला ते समजणार नाही. परंतु त्यावेळी समोर मुख्यमंत्री बसले होते आणि त्यांच्याकडे बोलत आरोलकर आपले विषय मांडत होते. महत्त्वाची बाब म्हणजे त्यादिवशी टॅक्सीवाल्यांचा विषय असल्याने त्यांचे समर्थक टॅक्सीवाले गॅलरीत बसले होते. एखादा विषय अत्यंत गांभीर्याने मांडला, तरच त्याचे गांभीर्यही सरकारला समजते. परंतु हसत हसत मांडलेल्या विषयाकडे कोण किती गांभीर्याने पाहतो, हे सर्वांना ठाऊक आहेच. परंतु आरोलकरांना मुख्यमंत्र्यांना पाहिल्यानंतर का हसू येते, हे आरोलकरांनाच माहीत असणार.

डिजिटल राजकारण

सांतआंद्रेतील अनेक राजकीय कार्यकर्ते सध्या भूमिगतरीत्या कार्यरत झाल्याची चर्चा ऐकू येत आहे. यात एक अनुभवी राजकारणी असून ही व्यक्ती व्हॉट्सॲपवरती अती सक्रिय आहे, परंतु प्रत्यक्षात माजी आमदारासोबत दिसत नाही. पूर्वी जेव्हा आमदार असताना त्यांच्या अवतीभोवती ही व्यक्ती असायची, आता दिसेनाशी झाली. मात्र, पक्षाच्या व्हॉट्सॲपवर बघितल्यास मतदारसंघात पक्षाचे सगळे काम ही व्यक्ती करत असणार असे कोणालाही वाटू शकते, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. कारण ही व्यक्ती विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत फिरताना दिसते. त्यावरून व्हॉट्सॲपवर सक्रिय राहून डिजिटल राजकारण खेळले जात असल्याची चर्चा आहे.

कामत यांना मिळाले चिकू

गेली १७ वर्षे मडगावचे आमदार दिगंबर कामत वनमहोत्सव साजरा करीत आहेत. ते जास्त करून फुलांची, फळांची किंवा औषधी रोपटी वितरित करतात. काही वर्षांपूर्वी फातिमा कॉन्व्हेंटमध्ये त्यांनी चिकूचे कलम लावले होते. काही वर्षांनी त्या कलमाला चिकू लागले. कॉन्वेंटच्या सिस्टरने लागलेले पहिलेवहिले चिकू दिगंबरना घरपोच केले. दिगंबरबाब ही घटना प्रत्येक वर्षी सांगतात. निदान चिकू खाण्यासाठी तरी वनमहोत्सव साजरा करूया असे तर कामतबाब सांगू इच्छित नाही ना!

सिल्वेरबाबांचा वट

सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा अजूनही बऱ्यापैकी वट असल्याचे दिसते. याची प्रचिती गोवा वेल्हा (सांतआंद्रे) पंचायतीच्या विषयावरून दिसून आली. पंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते, परंतु आजही इमारतीमधील दुकाने आणि सभागृह कार्यरत झालेली नाहीत. विद्युतीकरणासाठी लागणारा ट्रान्स्फॉर्मर घालण्यासाठी पंचायतीपाशी निधी नव्हता. त्यासाठी सरकारकडून मदत घेण्यासाठी आमदार वीरेश बोरकर यांच्यामार्फत प्रयत्न केले गेले. आता नवीन सरपंच आल्यानंतर अखेर त्यांनी सिल्वेरबाबांकडे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत ट्रान्स्फॉर्मरची मागणी केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाचा विचार करावा असा शेरा मारल्याचे ऐकू येते. त्यामुळे सिल्वेरबाबांची वट कायम असल्याची चर्चा सांतआंद्रेत रंगली आहे.

आर्लेकरांचा साधेपणा

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज पणजी येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले, की माझ्या नावापूर्वी महामहीम लावू नका, फार तर त्या पदाचा मान म्हणून माननीय राज्यपाल म्हणा. मी बिहारमध्ये पण महामहीम न लावण्याची सूचना केली आहे. राजेंद्रजी एवढ्या मोठ्या पदावर पोचले तरी त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही ही चर्चा सभागृहात सुरू होती. काहीजण तर म्हणत होते, पर्रीकर मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री असताना सुरक्षारक्षक, गाड्यांचा ताफा टाळायचे, पण आज गोव्यात उलटी स्थिती आहे.

काणकोणवर अब्जांचा वर्षाव

वीज खात्याचा ताबा अंत्रुज महालातील आमदार सुदिन ढवळीकर यांनी घेतला आणि काणकोण तालुक्यावर अब्जांचा वर्षाव सुरू झाला आहे. यापूर्वी काणकोण तालुक्याच्या नशिबी लाख मिळणेही कठीण होते. त्यामुळे काणकोण तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांना जनता लाखोली वाहत होते. मात्र, आता भूमिगत वीजवाहिन्यांमुळे खंडित वीजपुरवठ्याची समस्या मिटणार अशी खात्री आता सामान्य जनतेला पटली आहे. देव करो आणि या अब्ज निधीचे सार्थक होवो अशी सदिच्छा व अपेक्षा सभापतींच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात सामान्य जनता व्यक्त केल्याशिवाय राहिली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

SCROLL FOR NEXT