Vijay Kenkre Criticizes Quality of Kala Academy Renovation
पणजी: कला अकादमीसारख्या देशातील प्रतिष्ठित इमारतीच्या नूतनीकरण कामाच्या दर्जाबाबत कृती दलाने आजच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. सोमवारी दलाने कामाची पाहणी केली होती. त्यानंतर काढलेल्या निष्कर्षांवरून या कामाची ‘टक्केवारी’ ही उत्तीर्ण होण्यासारखी नाही, असे मत कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी व्यक्त केले.
गोवा मनोरंजन संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीनंतर केंकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सदस्य तसेच ‘कला राखण मांड’चे देविदास आमोणकर उपस्थित होते. दलाने पाहणी केलेल्या अहवालाची माहिती बैठकीत सादर केल्याचे सांगत केंकरे म्हणाले, कला अकादमीच्या नूतनीकरण कामाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि बदल सुचविण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.
कला अकादमीच्या नूतनीकरण कामावर जो कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे, हे मान्य आहे. कंत्राटदारांची चूक असेल तर त्यांना पुन्हा पैसे मिळणार नाहीत. जी आर्थिक तरतूद होती, त्यातच काम करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी चर्चा अपेक्षित आहे असे नमूद करत केंकरे म्हणाले, या कामासाठी जेवढे कंत्राटदार आहेत, त्या सर्वांना १०, ११, १२ नोव्हेंबर असे तीन दिवस बोलविण्यात आले आहे. कला अकादमीचे पावित्र्य राखले पाहिजे.
कला अकादमीच्या वतीने मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा आयोजित केली आहे. नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्यातच अकादमीच्या नूतनीकरण कामाची तपासणी करणाऱ्या कृती दलाने आज कामावर नाराजी व्यक्त केली. शिवाय कृती दलाने नोव्हेंबरमध्ये तीन दिवस बैठका आयोजित केल्या आहेत. नाट्यस्पर्धा निर्विवाद पार पडावी यासाठी कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी येत्या २५ ऑक्टोबर रोजी नाट्यकलाकारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कला अकादमीच्या कामात ज्या चुका झाल्या, त्या ‘कला राखण मांड’ने दाखवून दिल्या. या कामाबाबत कोणी, कधी निर्णय घेतला आहे, याचे स्पष्टीकरण आम्हाला मिळाले नाही. कृती दलानेही तीच माहिती मागितली आहे, असे देविदास आमोणकर म्हणाले.
माजी राज्यपाल, लोकायुक्त, गोव्याचे सभापती यांच्यानंतर आता मूळ गोमंतकीय असलेले एक ज्येष्ठ कलाकार तथा सरकारने नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी कला अकादमीचे काम निकृष्ट झाल्याचे सांगून भाजप सरकारला ‘भ्रष्टाचाराचे प्रमाणपत्र’ दिले आहे. या सरकारच्या भ्रष्ट लालसेने गोव्याची कला आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली
कला अकादमीच्या कामाबाबत मी खरोखरच समाधानी नाही. मी एक कलाकार आहे. कला अकादमीशी माझे भावनिक नाते आहे. वडीलही नाटकांशी संबंधित होते. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांपासून येथील काम मी पाहिले आहे.विजय केंकरे, कृती दलाचे अध्यक्ष
कृती दलाने व्यक्त केलेल्या मतांबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही. दलाचे अध्यक्ष काय बोलले, हे ऐकले नाही किंवा वाचलेही नाही. कृती दलाची स्थापना सरकारने केलेली आहे. त्यामुळे सरकारकडे त्याबाबत विचारणा करायला हवी.- गोविंद गावडे, कला-संस्कृतीमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.