Anita Date Thrilling Experience Goa
मराठी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला 'जारण' हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनिता दाते आणि अमृता सुभाष या ताकदीच्या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट काळी जादू आणि कर्मकांडावर आधारित असला तरी, तो केवळ पारंपरिक भयपटांप्रमाणे भीती दाखवत नाही, तर मनाच्या खोल कप्प्यांमध्ये जाऊन 'भीती' आणि 'आभास' यांचा खेळ मांडतो. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिता दातेने शेअर केलेला गोव्याशी संबंधित असलेला भयानक अनुभव आता अधिक लक्ष वेधून घेत आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अनिता दाते हिने नाटकाच्या दौऱ्यांदरम्यान आलेल्या काही अविश्वसनीय घटना सांगितल्या. लातूर आणि विदर्भातील एका प्रसंगाचा उल्लेख करताना, पहाटेच्या वेळी रस्त्यावर एकटीच रडणारी स्त्री दिसल्याचं तिने सांगितलं, ज्याकडे ड्रायव्हरने दुर्लक्ष केलं. पण गोव्याहून परतताना आलेला अनुभव अधिक थरारक होता.
अनिता दातेने सांगितलं की, "गोव्यावरुन येताना तेव्हा आशालता वाबगावकर गाडीत होत्या. तेव्हा चकवा लागल्यासारखं झालं आणि गाडी तिथेच फिरत होती. गोव्यातून आम्ही बाहेरच पडत नव्हतो."
आशाताई वाबगावकर यांनी त्यावेळी गाडीतून सगळ्यांना बाहेर उतरवलं, गाडीसमोर उभे राहून काही मंत्र म्हटले आणि नारळ फोडला. त्यानंतरच गाडी पुन्हा सुरू झाली आणि ते कोकणात शिरले.
लेखक-दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांचा 'जारण' हा चित्रपट ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा एक भयपट असला तरी, तो प्रेक्षकांना केवळ घाबरवण्यावर भर देत नाही. 'जारण' हा सिनेमा भय म्हणजे आपल्या नकळत मनात मुरलेली एखादी आठवण, दडपलेला संशय आणि खोलवर होणारे आभास, हे वेगळ्या पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटाची कथा 'अंधश्रद्धा' आणि 'मानसशास्त्र' यांचं संतुलन साधते. यात अचानक समोर येणारं भूत नाही, पण तरीही अमृता सुभाषने साकारलेल्या 'राधा'च्या भोवती गुंफलेली ही गोष्ट एक भयकथाच बनते. मनोविश्लेषण, अंधश्रद्धा आणि परिस्थितीनुसार मनात खोलवर फुलणाऱ्या स्वप्नांच्या जाळ्यातून ही कथा पुढे सरकते. इथे स्वप्न आणि सत्य, वास्तव आणि आभास यांच्यातील गुंतागुंतीचं नातं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
येथे पाहा अनिताची मुलाखत
'जारण' हा सिनेमा पारंपारिक भयपटांच्या चौकटीतून बाहेर पडून मानसिक भयाचा अनुभव देतो. जर तुम्हाला केवळ उड्या मारून घाबरवणारे चित्रपट आवडत नसतील तर 'जारण' पाहायला हवा. अंधश्रद्धा आणि मानसशास्त्राच्या अनोख्या मिश्रणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतो.
अनिता दाते आणि अमृता सुभाष यांच्या सशक्त अभिनयामुळे चित्रपटाची पकड आणखी घट्ट होते. हा चित्रपट केवळ एक गोष्ट सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात दडलेल्या भीतीला स्पर्श करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.