
मडगाव : प्रेयसीसोबत मोबोर किनाऱ्यावर गेलेल्या प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (४ जून) घडली. अहमद अल्लाउद्दीन सैय्यद (वय २४ वर्षे, रा. घोगळ) असे मृताचे नाव आहे.
दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. अचानक त्यांच्यात काय बिनसले आणि त्यातून अहमदने टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध सध्या कोलवा पोलिस घेत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदचे दुकान असून, ती मुलगी अन्य एका दुकानात कामाला आहे. दोघांमध्ये प्रेम होते. मंगळवारी ते दोघेही फिरण्यासाठी मोबोर किनाऱ्यावर गेले होते.
यावेळी अहमद एका झाडाला दोरी बांधू लागला. त्यावेळी त्या मुलीने त्याला विचारले असता, झोपाळा बांधत असल्याचे त्याने सांगितले. नंतर ती मुलगी समुद्राच्या पाण्यात पाय बुडविण्यासाठी गेली. एका बाटलीमध्ये तिने पाणीही भरून घेतले. ते घेऊन ती परत आली असता, प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिला दिसले.
तेव्हा तिने घटनास्थळी हंबरडा फोडला. तिचा आरडाओरडा ऐकून गस्तीवर असलेले पर्यटन पोलिस तेथे गेले. या घटनेसंबंधी कोलवा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठविला होता.
तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी हे प्रकरण नोंदविले आहे. पोलिस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रक्षा नाईक पुढील तपास करीत आहेत.
पोलिस तपासात वेगळीच माहिती
अहमद हा प्रेयसीसमवेत मोबोर किनाऱ्यावर आंघोळ करून परत आला होता. नंतर त्याची प्रेयसी कपड़े वाळत घालत असताना त्याने आत्महत्या केली, असे पोलिस तपासात आढळून आले आहे. अहमद गेले काही दिवस कौटुंबिक समस्येमुळे नैराश्यग्रस्त होता. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयन्त केला होता, असेही पोलिस तपासात उघड झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.