सासष्टी: मडगाव भाजप मंडळाने सामाजिक न्याय पंधरवड्यानिमित्त 6 ते 20 एप्रिल या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोचविण्याचा व त्यांना या योजनांची माहिती देण्याचा त्या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते शर्मद पै रायतुरकर यानी सांगितले. यावेळी मंडल अध्यक्ष रुपेश महात्मे, सचिव केतन कुरतरकर व पराग रायकर उपस्थित होते.
सदर उपक्रमाअंतर्गत ‘आयुषमान भारत’ योजनेखाली ईएसआय इस्पितळातील 60 रुग्णांना फळे देण्यात आली. शिवाय आवास योजना, घरघर जल व पंतप्रधान किसान योजनांची माहितीही देण्यात आली व देत आहोत, असे रायतुरकर यानी सांगितले. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. 18 एप्रिल रोजी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबविली जाईल. ‘पोषण अभियान’ योजनेखाली अंगणवाडी मुलांना पोषक आहार दिला जाणार आहे. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला जाईल, अशी माहिती रायतुरकर यानी दिली.
असंघटित कामगारांना देणार ‘ई-श्रमिक कार्ड’
मडगावात जे असंघटित श्रमिक कामगार आहेत, त्यांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ‘ई-श्रमिक कार्ड’ देण्यात येणार आहे. याअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत विमा उतरविला जाईल तर 5 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार केले जातील. त्यासाठी 16 एप्रिल रोजी मडगाव नगरपालिका इमारतीजवळ खास नोंदणी शिबिर घेतले जाणार आहे. असंघटित श्रमिक कामगारांनी आपले आधारकार्ड घेऊन नोंदणी करावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दिगंबर कामत यांच्याशी मुळीच संबंध नाही
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशाबद्दल ज्या उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्याचा मडगाव मंडळाशी काडीचाही संबंध नाही. तो आमच्यासाठी विषयच नाही. कामत यांच्या प्रवेशाबद्दल ज्या आमच्या भावना आहेत, त्या आम्ही पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत. मात्र पक्षाने त्याबद्दल आम्हाला अजून काहीही सांगितलेले नाही, असे शर्मद पै रायतुरकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.