Goa Culture: येणाऱ्या पिढीसाठी गोव्याची लोकसंस्कृती, परंपरा जिवंत ठेवण्याचे काम गोपीनाथ गावस यांनी संग्रहालयात लोकवस्तूंचे जतन करून केली आहे. हे संग्रहालय सत्तरीपुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्याला या लोकवस्तूंचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत म्हणाले.
केरी-सत्तरी येथे गोपीनाथ गावस यांच्या पहिल्या ‘आमचे दायज’ या लोकवस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर केरीच्या सरपंच दिक्षा गावस, पंच तन्वीर पांगम, पत्रकार संदेश प्रभुदेसाई, पर्यटन महामंडळाचे उपव्यवस्थापक दीपक नार्वेकर, आमचे दायजचे मार्गदर्शक पांडुरंग गावस, संस्थेचे अध्यक्ष चंदन गावस, आमचे दायज लोकवस्तुसंग्रहालयाचे गोपीनाथ गावस आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलन करून व फित कापून संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल अग्नी तर आभार शोभा गावस यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागिरकांची उपस्थिती होती.
तीन हजारांच्यावर वस्तूंचा संग्रह
गोपीनाथ गावस यांच्या संग्रहालयात सुमारे तीन हजारांच्यावर वस्तूंचे जतन केले आहे. हे संग्रहालय फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुले करण्यात येणार असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मात्र 20 रुपये व मोठ्यांसाठी 100 रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे.
लोकवस्तू जतनात आपल्या कुटुंबाचे तसेच मित्रमंडळ व इतरांचे सहकार्य लाभले. आपल्या लोकसंस्कृतीचे सर्वांनी जतन केले तरच ती टिकून राहील. हे संग्रहालय सर्वांचे आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून मुलांनी अभ्यास करून त्याचे अनुकरणे करावे. त्याचा उपयोग पुढील आयुष्यासाठी करावा. - गोपीनाथ गावस
जतनाचे भरभरून कौतुक
गोपीनाथ गावस यांनी 1995 पासून वस्तू जतन करण्याचे काम केले आहे. 2014 साली जेव्हा पहिल्यांदाच साखळी येथे झालेल्या साखळी मोहोत्सवात त्यांनी प्रदर्शन भरवले त्यावेळी त्यांच्या वस्तू पाहून प्रदर्शनात येणाऱ्या कित्येक जणांनी भरभरून कौतुक केले होते. त्यांचे हे जतन करण्याचे काम सातत्याने चालूच होते.
मुलांना या संग्रहालयाच्या माध्यमातून आपला इतिहास जाणून घेता येईल. त्याचबरोबर अभ्यासक्रमात व आपल्या लोकसंस्कृतीवर संशोधन करणाऱ्या साहित्यिकांना याचा फायदा मोठा होईल.
सरकारतर्फे नवीन संग्रहालय उभारण्याची योजना असून 10 लाख रुपये अनुदान मिळत आहे. त्याचा लाभ गोपीनाथ गावस यांनी संग्रहालयाच्या विस्तारासाठी करून वस्तू जतन कराव्यात. - डाॅ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.