Illegal paragliding at Colva Beach Goa
मडगाव: केरी-पेडणे येथे बेकायदेशीर पॅराग्लायडिंगमुळे दोघांचा जीव गेला असतानाच आता राज्यातील इतर भागांत सुरू असलेल्या इतर बेकायदा साहसी क्रीडा व्यवसायाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलवा समुद्रकिनाऱ्यावरही बेकायदेशीर पॅराग्लायडिंग सुरू आहे. यासंदर्भात दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होऊनही हा व्यवसाय बिनधास्तपणे चालू आहे. त्यामुळे कुणाच्या आशीर्वादाने तो सुरू आहे? असा प्रश्न स्थानिक करत आहेत.
कोलवा येथे मोटर पॉवर पॅराग्लायडिंग व्यवसायाला पर्यटन खात्याने परवानगी दिली असली तरी स्थानिक पंचायतीने परवाना दिलेला नाही. या भागात सुरू असलेले हे पॅराग्लायडिंग फक्त पर्यटकांसाठीच नाहीत तर स्थानिकांसाठीही ते धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाने डोळेझाक करणेच पसंत केले आहे.
यापूर्वी येथे चालू असलेल्या या पॅराग्लायडिंगमुळे दोन पर्यटक गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत पॅराग्लायडिंग करून किनाऱ्यावर उतरताना वेगाने येऊन खाली आपटल्याने दिल्लीतील एका महिला पर्यटकाचा पाय मोडला होता. तर, दुसऱ्या घटनेत पॅराग्लायडिंगच्या मोटरमध्ये हात गेल्याने एका रशियन पर्यटकाची बोटे कापली गेली होती.
पॅराग्लायडिंग धोकादायक आहे हे लक्षात आणून दिल्यावरही प्रशासन का जागे होत नाही?. केरी-पेडणे येथे जसे दोघांचे प्राण गेले तसे कोलवा येथे प्राण जाईपर्यंत प्रशासन वाट पाहणार का? असे सवाल यासंबंधी तक्रार करणारे स्थानिक सिमांव रॉड्रिगीस यांनी केले आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा कोलवा पंचायतीत आपली तक्रार दाखल केली. तसेच यासंबंधी कारवाई करावी अशी मागणी आम्ही पोलिसांकडे करणार आहोत असे सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्या ज्युडिथ आल्मेदा यांनी सांगितले की, पॅराग्लायडिंग या साहसी क्रीडा प्रकारावर बंदी घालण्यात यावी यासाठी आम्ही दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. पण त्यांनी स्वतः काही कारवाई न करता ते निवेदन दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवून दिले. तर, दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयातून हे निवेदन माझ्या कार्यालयात आले आहे की नाही याची मला कल्पना नाही. त्याबद्दल चौकशी करून मी तुमच्याशी संपर्क साधेन.
केरी-पेडणे येथे बेकायदेशीर पॅराग्लायडिंगमुळे दोघांचा मृत्यू झाल्यावर कोलव्यात सुरू असलेली पॅराग्लायडिंगची उड्डाणे बंद झाली आहेत. या दुर्घटनेनंतर पर्यटक असले साहसी खेळ खेळण्यास घाबरू लागले आहेत. यासाठी जे ऑनलाईन बुकिंग होत होते, तेसुद्धा मागच्या दोन दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळाली आहे.
पॅराग्लायडिंग क्रीडा व्यावसायिकाने परवान्यासाठी पंचायतीकडे अर्ज केला होता. पण लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो फेटाळण्यात आला. ग्रामसभेनेही पॅराग्लायडिंगला विरोध केला होता.सुझी फर्नांडिस, सरपंच (कोलवा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.