BJP Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शत प्रतिशत भाजप मंत्रिमंडळ

शपथविधी: पंतप्रधान मोदींची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांसह नऊ जणांचा समावेश

दैनिक गोमन्तक

पणजी: डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील 9 सदस्यांचे गोव्यातील भाजप सरकार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपशासित सात राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते आणि हजारो गोमंतकीयांच्या साक्षीने शपथबद्ध झाले. राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री सावंत आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.

ताळगाव येथील डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि आतानासियो मॉन्सेरात हे डॉ.सावंत यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असतील.

मंत्रिमंडळ विस्तारास अजून वाव असून एप्रिल किंवा मे महिन्यात तो करून तीन नव्या मंत्र्यांना सामावून घेण्यात येईल. मगोपचे सुदिन ढवळीकर आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशा वदंता होत्या. मात्र, आज शपथबद्ध झालेले मंत्रिमंडळ भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांचे असेल याची खबरदारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे दिसले. भाजपचे एकंदर राजकीय परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचा संदेश यातून पक्षाने दिला आहे. त्याचबरोबर तीन जागा रिक्त सोडून काँग्रेससोबत असलेल्यांनाही भाजप प्रवेशाच्या वाटा खुल्या ठेवल्या असल्याचे राजकीय निरिक्षक मानतात.

सकाळी ठीक 11 वाजता सुरू झालेल्या सोहळ्याच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे अध्‍यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय भूपृष्‍ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी सी.टी.रवी, मंत्री दर्शना जरदोश, जी.किशनकुमार रेड्डी, श्रीपाद नाईक यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, हिमाचल प्रदेशच मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते.

प्रमोद सावंत यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी पूजा केली. गोव्यातील नागरिकांच्या सेवेसाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.दहा हजार लोकांसाठी भोजन सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी नाश्‍त्यासाठी पॅटिस, बिस्कीट, केक, समोसे व चहाची व्यवस्था केली होती. सोहळा संपल्यानंतर सुमारे 10 हजार लोकांना पुरेल इतके जेवण तयार करण्‍यात आले होते. यासाठी जवळपास आठ कॅटररर्सचे 20 स्टॉल्‍स उभारण्यात आले होते.

सावंतांवर पर्रीकरांचा विश्‍वास

साखळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत प्रमोद सावंत हे भाजपचे तिसऱ्यांदा आमदार बनले. ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. 2012 मध्ये पहिल्यांदा साखळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. 2017 साली दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे सभापती झाले. साखळीतून 2012 साली प्रथम आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे साधनसुविधा विकास महामंडळाचा ताबा होता.मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सावंत यांच्याकडे मार्च 2019 मध्ये गोव्याचे नेतृत्व सोपविण्यात आले.

निधनापूर्वी स्वत: पर्रीकर यांनी सावंत यांचे नाव सुचविले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांचा पराभव केला.

भाजपकडून समाजभान

नव्या मंत्रिमंडळाचे स्वरूप ठरवताना राज्यातील सामाजिक ताण्याबाण्यांचे भान राखण्याचा यत्न केला आहे. या मंत्रिमंडळात गोव्यात बहुसंख्येने असलेल्या भंडारी समाजाचे दोन सदस्य (रवी नाईक, सुभाष शिरोडकर), मराठा समाजाचे दोन (मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि विश्वजीत राणे), अनुसूचित जातींचा एक प्रतिनिधी (गोविंद गावडे) तर तीन ख्रिस्ती धर्मीय ( माविन गुदिन्हो, निलेश काब्राल आणि आतानासियो मोन्सेरात) आहेत. नववे मंत्री रोहन खंवटे हे सारस्वत आहेत.

सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी

डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पहिल्यांदाच शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. तो सर्वांसाठी खुला असल्याने लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी लोक सकाळी 8 वाजल्यापासून घटनास्थळी दाखल झाले. अनेकांना आसन न मिळाल्याने त्यांनी उभे राहूनच सोहळ्‍याचा आनंद घेतला. शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचे खास ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

महिलांविना मंत्रिमंडळ

भाजप आमदार डॉ.दिव्या राणे आणि जेनिफर मोन्सेरात यांना पहिल्या टप्प्यात तरी मंत्रिमंडळात घेण्यात आले नाही. त्यामुळे सध्यातरी मंत्रिमंडळ महिलांविना बनले आहे. पतींना मंत्रिपद मिळाल्यामुळे या महिला आमदारांचा विचार झालेला नाही, हे स्पष्ट आहे.

मोदींच्या उपस्थितीने उत्साह

सकाळी 10.56 वाजता पंतप्रधान मोदी स्टेडियमध्ये दाखल झाले. ते ११ वाजता व्यासपीठावर आले आणि 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत ते उपस्‍थित होते. हात उंचावून अभिवादन व खाली वाकून जनसमुदायाला त्यांनी नमनही केले. यावेळी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

आयातांनी मारली बाजी

मंत्रिमंडळातील नऊपैकी सावंत वगळता अन्य सर्व इतर पक्षांतून आलेले आहेत. निलेश काब्राल 2012 पासून भाजपात असून माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर व विश्वजीत राणे हे 2017 साली भाजपात आले. आतानासियो मोन्सेरात 2019 साली तर रवी नाईक, गोविंद गावडे व रोहन खंवटे निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT