Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात काळजीवाहू मुख्यमंत्री किती दिवसांचा?

दैनिक गोमन्तक

गोवा: जसा दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवसांचा गणपती असतो तसा अठ्ठेचाळीस तासांचा काळजीवाहू मुख्यमंत्री असतो का? हा प्रश्न आता गोमतकीयांना पडला आहे. काँग्रेसच्या कायदेतज्ज्ञ असलेल्या आमदाराने यावर प्रश्न उपस्थित करून चर्चेला तोंड फोडले आहे. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री, काळजीवाहू पंतप्रधान किंवा काळजीवाहू सरकार किती दिवसाचे असावे यावर घटना व कायदा सायलंट आहे.

जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत काळजीवाहू सरकार किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री असे आम्ही नव्हे, भारताचा कायदा सांगतो मग काळजीवाहू मुख्यमंत्री फक्त अठ्ठेचाळीस तासांचा हे गणित कुणी ठरविले असे आम्ही नव्हे कायदेतज्ज्ञच सांगतात. आता काँग्रेस समर्थक कायदेतज्ज्ञ खरे की भाजप समर्थक याबाबत मात्र जनतेच्या मनात गोंधळ आहे. ∙∙∙

काँग्रेसचे गणित!

‘गिरे तो भी टांग उपर’ ही हिंदीतील म्हण गोव्यातील काँग्रेस पक्षाला तंतोतंत लागू होते. आपला दोष काय?पक्षाचे उमेदवार व पक्ष कुठे कमी पडला? याचे विश्लेषण न करता काँग्रेसचे नेते पराभवाचे खापर मतविभाजनावर, आरजी पक्षावर, तृणमूल पक्षावर फोडतात. आता तर कहरच झाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सांगतात की, भाजपाला साडेसासष्ठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही याचा अर्थ भाजपाला जनतेने नाकारले असा होतो. कामत साहेब तर पुढे म्हणतात की, जनतेचा कौल भाजपा विरोधात आहे.

मग काँग्रेसच्या किंवा भाजपा विरोधकांच्या समर्थनात कौल असेल तर सरकार काँग्रेसने घडवायला हवे होते. भाजपाने त्यासाठी भरपूर वेळ दिला होता. कामत साहेब आपल्या देशात अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाही असती तर पन्नास टक्क्यांवर मते घेतलेला विजयी ठरला असता. तिकडे प्रिफरेशल मतदान असते. कामत साहेब वडाची साल काढून आंब्याला लावणे सोडा व पक्ष मजबुतीवर लक्ष केंद्रित करा पुढचे सरकार येण्यास मदत् मिळेल असा सल्ला आता काँग्रेस समर्थक नेत्यांना द्यायला लागले आहेत. ∙∙∙

फळदेसाईंना झुकते माप!

सांगेतून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तसेच ते काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जवळचे असे ओळखले जातात त्यामुळेच त्यांच्याकडे झुकते माप आहे. सांगे मतदारसंघातही उमेदवारी फळदेसाई यांना मिळवून देण्यात मोठा वाटा होता.

फळदेसाई यांच्यापेक्षा तीनवेळा निवडून आलेले आमदारही पक्षात असल्याने त्यांचे घोडे अडले आहे. भाजपचा प्रवक्ता या नात्याने ते मुख्यमंत्र्यांची स्तुतिसुमने उधळून मंत्रिपद आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सावंत हेच पुढील पाच वर्षे राज्याला स्थिर भाजप सरकार देऊ शकतात असे म्हणून इच्छुक असलेल्या भाजपच्या आमदारांवर शीरसंधान केले आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी मंत्री बनण्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यांची धडाडी व विधानसभेत सरकारची बाजू लावून धरण्यास ते फायदेशीर ठरतील या अनुषंगानेच सावंत त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार सुरू आहे. ∙∙∙

त्यांना लागली लॉटरी !

यश प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत लागतेच. मात्र, त्याचबरोबर यश संपादन करण्यासाठी नशिबाचीही साथ असावी लागते. पहिल्या मतमोजणी फेरीत हरल्यानंतरही पुन्हा मतमोजणीत विजयी ठरलेल्या रवी नाईक यांना विचारा नशीब म्हणजे काय असते ते. नशिबाने साथ दिली नसती तर दोतोर प्रमोद मुख्यमंत्री बनले नसते. असाच नशीबवान ठरला तो फातर्पा येथील एका देवस्थान समितीचा महाजन. देवस्थान समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दोनी उमेदवारांना समान मते मिळाल्याने टाय झाला. शेवटी कायद्याप्रमाणे कोण विजयी हे ठरविण्यासाठी लॉटरी पद्धत अमलात आणली आणि तो नशीबवान सुधाकर बनला अध्यक्ष. ∙∙∙

संघर्ष अजूनही कायम

राजकारण व मैत्री या दोघांमधील फरक आज पणजीत आझाद मैदानावर झालेल्या ‘धुलवडी’वेळी दिसून आला. निवडणूक झाल्यानंतर सर्व राजकारणी ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे म्हणत विरोधकांच्या खांद्यावर हात घालतात. पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आझाद मैदानावर रंग उधळणाची सुरू केलेली परंपरा कायम ठेवताना ते कधी नव्हे एवढे खुश होऊन नाचले.

सांताक्रुझचे काँग्रेस आमदार रुदॉल्फ फर्नांडिस हे सुद्धा आले होते. रुदॉल्फ व बाबुश या दोघांनी एकमेकाला रंग लावून ‘धुलवड’ साजरी केली. त्या ठिकाणी उत्पल पर्रीकर यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी बाबुश मोन्सेरात व उत्पल पर्रीकर यांच्यात पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवताना जो संघर्ष झाला होता तो आजही ‘धुलवड’वेळी दिसून येत होता. त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळा गट करून या धुलवडचा आनंद घेण्यात मग्न झाले होते. ∙∙∙

गोवा डेअरीचे घोडे गंगेत न्हाले

राज्यातील एकमेव असलेली गोवा डेअरी अर्थातच गोवा दूध महासंघ कायम चर्चेत राहिला आहे. खरे म्हणजे गोवा डेअरीचे दूध उत्पादन वाढून त्यातून संपूर्ण गोव्याला दुधाचा पुरवठा करणे शक्य होते, पण मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असा हा प्रकार गोवा डेअरीच्याबाबतीत झाला आहे. राज्यात दूध उत्पादन काही वाढत नाही, कारणापेक्षा राजकारण जास्त चालले आहे. राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे, त्यातच बाहेरून दूध आणून त्यावर गोवा डेअरीचा शिक्का मारून विकावे लागते. मागच्या काळात तर गोवा डेअरी कायम चर्चेत राहिली आहे. सध्या गोवा डेअरीवर निवडून आलेले संचालक मंडळ नाही तर सरकारनियुक्त मंडळ गोवा डेअरी चालवत आहे. मध्यंतरीच्या काळात गोवा डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून मोठा गोंधळ उडाला.

त्यानंतर याला निलंबित कर, त्याची वर्णी लाव असा प्रकार सुरू झाला. आताही नियुक्त केलेल्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध न्यायालयाने ताशेरे मारले आहेतच, त्यामुळे या पदाच्या नावात सध्या थोडा बदल करून ‘ओएसडी‘ असे पद सध्या कार्यरत केले आहे. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे गोवा डेअरीने आता नवीन व्यवस्थापकीय संचालकपदासाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे निदान नवीन एमडीची नियुक्ती झाली तर किमान या पदाबाबतची तरी अनागोंदी दूर होईल, असे दूध उत्पादकच बोलतात. ∙∙∙

‘आपलेच दात अन् आपलेच...’

भारतीय परंपरेचे अधिष्ठान लाभलेल्या धूलिवंदन उत्सवात गोव्यात बहुतांश ठिकाणी (पाश्चात्य) संगीताच्या तालावर अक्राळ-विक्राळ स्वरूपाचे नृत्य सादर करून कित्येक जण स्वत:ची हौस भागवून घेत असतात, हे तर सर्वज्ञातच आहे.

लहानग्यांपासून काही वयोवृद्धांचाही त्यात समावेश असतो. याबाबत वैशिष्ट्यपूर्ण तथा आश्चर्यकारक बाब म्हणजे, अगदी काही युवती व विवाहित महिलांनीही ‘चुम्मा चुम्मा दे दे...’ गीताच्या तालावर नृत्य करून त्या उत्सवात स्वत:चेही रंग भरले! आहे की नाही कमाल? असे असले तरी दुसऱ्या बाजूने, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ आणि ‘पाण्यात राहून माशांशी वैर कशाला’ या उक्तींचा प्रत्यय आल्याने स्वत:ला भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवून घेणारेही त्याबाबत मूग गिळून गप्प बसले, हे मात्र नक्की! ∙∙∙

असाही उजो...

‘उजो, उजो’ करीत शबय घालणाऱ्या काही महाभागाचे आता इतर किस्सेही चर्चेत येऊ लागले आहेत. या निवडणुकीत सांगे येथे ‘दाम करी काम’ हा मंत्र जोरात चालू असताना या उज्याचा एक संदेश म्हणे मांडवली करत फिरत होता. एका महिला उमेदवाराकडे त्यांनी म्हणे 30 लाखांची मागणी केली तर एका टोपीवाल्या उमेदवाराला 20 लाखांची टोपी घालण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत सावित्रीबाई हे एक चलनी नाणे होते हे सर्वांनाच माहीत आहे. सांगेतील चिल्लर उमेदवारांकडून लाखोंची मागणी करणाऱ्यांनी सावित्रीबाईंकडे किती पैसे मागितले असावेत हा प्रश्न सध्या येथे चर्चेत आहे. ∙∙∙

दुकान भाडेपट्टीचे कोडे!

मडगाव नगरपालिका ही एकप्रकारे अलिबाबाची गुहा ठरू लागली आहे. नवे पालिका मंडळ सत्तेवर येऊन अजून दीड वर्ष उलटायचे आहे. पण, या काळात तेथील इतके प्रकार उघडकीस आलेले आहेत की त्यामुळे मडगावकर चक्रावून जात आहेत. गांधी मार्केटमधील दोन दुकाने अगदी स्वस्तात भाडेपट्टीवर देऊन टाकण्याचा प्रकार याच सदरांत मोडणारा आहे. मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा त्यावर कडी करणारा आहे. सर्व सोपस्कार पूर्त करून हा व्यवहार झालेला असेल तर तो प्रस्ताव बाजार समितीकडे का आला नाही, दुकाने घेणारे कोण असे सवाल आता केले जात आहेत. ∙∙∙

सार्दिनबाबांची कोंडी

केवळ पत्रकारपरिषदांतून आपले अस्तित्व दाखवून देणारे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा निवडणूक निकालापासून कुठेच पत्ता नाही. अन्यथा सरसकट आठवड्याला एकदा तरी ते पत्रकारांना भेटतातच, मग कोणताही विषय असो वा नसो. पण, निवडणूक निकालाने एवढी उलथापालथ होऊनही त्यांचा पत्ता का नाही आसा प्रश्न पत्रकारांना पडला आहे. या निवडणुकीत आटोकाट प्रयत्न करूनही ते स्वतःच्या पुत्राला कुडतरीत काही काँग्रेसची उमेदवारी काही मिळवून देऊ शकले नाहीत.

तेवढ्याने भागले नाही. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी रेजिनाल्ड कुडतरीतून अपक्ष म्हणून निवडून तर आलेच. पण, त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने ते मंत्री होण्याच्या मार्गावर आहेत. एकामागोमाग एक अशा पिछाडीवर टाकणाऱ्या घटनांमुळे तर सार्दिनबाब चक्रावलेले नसावेत ना?

पुन्हा एकदा फार्स

गोव्यात काँग्रेसने पराभवाची हॅट्‍ट्रीक केली आहे व अन्य चार राज्याबरोबर गोव्यातील पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी श्रेष्ठींनी आपले प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. मात्र, काँग्रेसवालेच या प्रकरणात नाराज आहेत. ते म्हणतात की, पराभवाची कारणे यापूर्वीच कळून चुकलेली असताना आता हा फार्स कशाला असेही ते आपसात कुजबुजतात पक्षाने कसलीच मदत केली तर नाहीच दुसरीकडे स्थानिक नेते सरकार आपलेच या मनोराज्यात दंग राहिले व तेच पराभवाचे खरे कारण असताना आता आणखी कसली मिमांसा करता अशी विचारणा ते उघडपणे करू लागले आहेत.

भाजपाचे जुळेना, काँग्रेसचे जमेना

राज्यात निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले. पण, अद्याप भाजपाअंतर्गत सत्ता जुळेना. तर दुसरीकडे विरोधात असलेल्या काँग्रेसकडे अकरा आमदार शिवाय मित्रपक्षांचेही सहकार्य अपेक्षीत असतानाही स्थापनेसाठी कृती होत नसल्याने राज्यात सरकार स्थापनेबाबतची विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवेळी भाजपाकडे तेरा आमदार असताना केवळ आठ तासांत सत्ता हाती घेतली होती आणि आज आठ दिवस झाले तरीही सरकार स्थापनेचा दावा अजूनही झालेला नसल्याने हे अजबच आहे.

केंद्रात भाजपा असल्यामुळे काँग्रेस पक्ष सरकार घडविण्यासाठी मागे-पुढे पाहत असेल. पण, महाराष्ट्रात कोणी केले सरकार. खरं म्हणजे गोव्यातील गोटात पुढाकार घेणारा प्रमुख म्हणून निवड केल्यास बदल होऊ शकतो. किंवा आयात केला जाणारा नेता म्हणून मान्यता दिल्यास आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे सरकार घडले असते. पण, नेते एकमेकांना पाण्यात पाहू लागल्याने भाजपाच्या पथ्यावर पडले आहे. आता आगामी दिवसांत कोण कोणाची होळी करतो ते पाहुया.

‘आरजी’चा उजो भाजपला पावला

राज्यात यावेळी भाजपा दहाच्या पुढे जाणार नाही अशीच परिस्थिती होती. काँग्रेस पक्ष जाम खुशीत होता. सरकार घडणारच म्हणून पण जे व्हायला नको तेच घडले. ख्रिस्ती बांधवांना वाटत होते की, ‘उजो’ यावेळी सत्ताधारी भाजपाला घरी पाठविणार. राज्यात अनेक आंदोलने केली या आंदोलनात ‘उजो’ सक्रिय होता. पण नियतीने वेगळेच ठरविले होते. जितका उजो अधिक नेटाने पुढे जाईल तितकी काँग्रेस मागे पडणार हे आधीच रचलेले कारस्थान होते हे आता स्पष्ट झाले आहे. कारण उजो करून काँग्रेस पक्षाला आणि अपक्ष, इतर पक्षांना दहा बारा आमदारांना घरी जावे लागले. काँग्रेस पक्षाने चांगली लढत देत वातावरण निर्माण केले होते. पण, उजो काँग्रेस पक्षाला मारक तर भाजपाला तारक ठरला. आता पुढे काय होईल हे उजोच जाणे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT