Konkani Drama: गेल्या 50 वर्षांत नाट्यक्षेत्राने घेतलेली हनुमानउडी अधोरेखित होते! सुवर्णमहोत्सवी कोकणी-नाट्यस्पर्धेचे कवित्व
मिलिंद म्हाडगुत
कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी कोकणी-नाट्यस्पर्धेचे नुकतेच सूप वाजले. पन्नासावी नाट्यस्पर्धा म्हणून प्रवेशिका जास्त येतील, अशी अपेक्षा होती. पण फक्त अठराच प्रवेशिका आल्यामुळे रसिकांत थोडी नाराजी दिसत होती. पण प्रवेशिका कमी असूनसुद्धा स्पर्धा जबरदस्त रंगली. मी दैनिक ‘गोमन्तक’करता या स्पर्धेचे परीक्षण केल्यामुळे मला या स्पर्धेची उत्तरोत्तर वाढत गेलेली लज्जत अनुभवता आली.
एकूण १८पैकी एक नाटक गळल्यामुळे १७ नाटके रिंगणात राहिली. त्यातली चार-पाच नाटके सोडल्यास इतर सर्व नाट्यप्रयोग खरोखरच दर्जेदार झाले. या प्रयोगांनी रसिकांना एक वेगळी अनुभूती प्राप्त करून दिली. यातून आज कोकणी रंगभूमी किती उंचीला पोहोचली आहे, याचा प्रत्यय आला.
काही प्रयोग तर व्यावसायिक नाटकांना लाजविणारे होते. जेव्हा कला अकादमीने ही कोकणी नाट्यस्पर्धा सुरू केली होती तेव्हा स्पर्धेला आवश्यक असणाऱ्या पाच प्रवेशिका मिळवतानासुद्धा मारामारी होत असे. त्यातही जे काही नाट्यप्रयोग व्हायचे तेही खोगीरभरती केल्यासारखे असायचे. यातूनच गेल्या ५० वर्षांत कोकणी नाट्यक्षेत्राने घेतलेली हनुमानउडी अधोरेखित होते.
या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महिला कलाकारांचे वर्चस्व. अनेक महिला कलाकारांचा अभिनय खरोखर स्तिमित करणारा होता! वेदिका वाळके(जनेल), दिव्या गावस(काणी तशी जुनीच पूण),
ऋचा आमोणकर (सोनकेशी), सुविधा तोरगल(बापू -गांधी), आर्या तेली(इन सर्च ऑफ सर्व्हाइव्हल), संपदा गावस, मनीषा परब(अस्तुरी), तस्लिमा मयेकर(भोगपर्व), सुजन सावंत, स्नेहा पाटील(मरणथाव), चैता कडकडे(हिडोनिस्ट), कृत्तिका जाण(जाळे) या महिला कलाकार खरोखर बाजी मारून गेल्या. काही नाटकांतील ‘बोल्ड’ प्रसंगसुद्धा त्यांनी प्रभावीपणे साकार केले.
त्यामुळे आता गोव्यात महिला कलाकारांची वानवा आहे, ही तक्रार खंडित व्हायला पाहिजे. पुरुष कलाकारांनीही आपली चमक दाखवली. रघुनाथ साकोर्डेकर(बापू - गांधी), मिलिंद बर्वे(हिडोनिस्ट) या बुजुर्ग कलाकारांबरोबर अभिषेक नाईक(जाळे), गोविंद गावडे(देश राग), सुरेल तिळवे(बापू - गांधी),
साई कळंगुटकर(इन सर्च ऑफ सर्व्हाइव्हल), प्रज्योत महाले(मरणथाव), साईनंद वळवईकर आणि संघर्ष वळवईकर(भोगपर्व) हे कलाकार स्पर्धेत आपली छाप सोडून गेले. सादरीकरणातही नवनवे प्रयोग पाहायला मिळाले. अमोघ बुडकुले(जाळे), श्रीकांत गावडे(देश राग), नीलेश महाले(जनेल), शाबलो गावकर(काणी तशी जुनीच पूण), विनय गावस(होमखण),
दीपक आमोणकर(सोनकेशी),रघुनाथ साकोर्डेकर, कलानंद बांबोळकर(बापू-गांधी), वैभव कवळेकर(इन सर्च ऑफ सर्व्हाइव्हल), झिलू गावकर(अस्तुरी), अश्वेश गिमोणकर(भोगपर्व), रोनक गुरव(मरणथाव), नितीन नाईक(हिडोनिस्ट) या दिग्दर्शकांनी नाट्य माध्यमावर आपले किती प्रभुत्व आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले.
तांत्रिक बाबतीतही कलाकारांनी प्रगती केल्याचे जाणवले. काही नाटकांचे नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत इतके परिपूर्ण होते, की कोणीही दाद द्यावी. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाटकांना दिलेला ‘सिनेमॅटिक अँगल’. त्यामुळे या नाटकांना सिनेमांचा ‘फील’ येत होता. गेल्या दोन स्पर्धांच्या मानाने यंदा गर्दीही चांगली होती.
आमदार गोविंद गावडे यांचे ’देश राग’ हे नाटक हाउसफुल झाल्यामुळे लोकांना उभे राहून बघावे लागले. गोविंद यांच्या बाळा राया मापारीच्या भूमिकेला प्रतिसादही चांगला मिळाला. रंगकर्मी, साहित्यिकांबरोबर यावेळी राजकारण्यांचीही उपस्थिती दिसून आली.
मंत्री सुभाष शिरोडकर तर ‘देशराग’ व ‘होमखंड’ या दोन नाटकांच्या प्रयोगाला आवर्जून उपस्थित होते. मात्र या स्पर्धेला थोडेफार गालबोट लागले ते संहितेचे. वास्तविक निकाल देणे हा परीक्षकांचा प्रांत असतो. त्यावर बोलणे योग्य ठरत नाही. मात्र यावेळी लेखनाचे पहिले पारितोषिक न दिल्यामुळे दुसरे पारितोषिक मिळालेल्या ‘देशराग’ नाटकाचे लेखक युगांक नायक यांनी पारितोषिक स्वीकारण्याचे नाकारले व तो एक चर्चेचा विषय बनला आहे.
यातून पहिले पारितोषिक न देऊन कोकणी नाट्य लेखनाचा अवमान झाला असल्याचे युगांकना सूचित करायचे असावे असे वाटते. त्यामुळे आता पहिल्या पुरस्काराचा निकष काय, याची सूची तयार करावी लागणार असे दिसते.
त्याचप्रमाणे एका नाटकाची संहिता हुबेहूब एका इंग्रजी सिनेमा/ नाटकावर बेतलेली असल्याचे शेवटच्या क्षणी लक्षात आल्यावर ते नाटकच स्पर्धेतून बाद केल्याचीही घटना यावेळी घडली.
हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. आता श्रेयनामावलीत जेव्हा स्पर्धेकरता संहिता असे लिहिले जाते, तेव्हा ती संहिता ’ओरिजिनल’ असल्याचे ग्राह्य धरले जाते. आता ती खरेच ओरिजिनल आहे की नाही हा शोध घेणे हे परीक्षकाचे काम नव्हे; पण आता परीक्षकांना हेही काम करावे लागणार असे दिसत आहे. या नाट्यस्पर्धेसाठीच्या सहकार्याबद्दल कला अकादमीचे कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर, विशांत गावडे, अजित कळंगुटकर यांचे आभार मानल्याशिवाय राहवत नाही. काही का असेना, यंदाची कला अकादमीची सुवर्णमहोत्सवी कोकणी-नाट्यस्पर्धा चुरशीची होण्याबरोबर कोकणी रंगभूमीला एक नवीन दिशा देऊन गेली, एवढे निश्चित!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

